shubham patil

Drama Romance Tragedy

3  

shubham patil

Drama Romance Tragedy

श्रवणधारा - भाग 5

श्रवणधारा - भाग 5

3 mins
202


      दूर कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. दाट धुकं पडलं होतं. गुलाबी थंडी सर्वांना सुस्तावून सोडत होती. सूर्य नेहमीप्रमाणे उगवला होता. नव्हे, तो त्याच्या जागेवर अनादि काळापासून अविचल आणि अविरतपणे होता तसाच होता. एखाद्या चक्रवर्ती सम्राटासारखा. खरं तर पृथ्वी त्याच्याभोवती फिरते आणि आपल्याला वाटतं सूर्य उगवला. पृथ्वी फिरते हे माहीत असूनही सगळे सूर्य उगवला असंच म्हणतात. त्रिकालबाधित सत्य असूनही ते नाकरतात. आयुष्याचं सुद्धा असंच नाही का? एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा आपण या जगात नसू, आठवणी असतील पण काही काळाने काळपुरुष त्यांना आपली शिकार बनवेल. हे सर्व सृष्टीला ज्ञात आहे. पण तरीही मायमोहाची लक्तरं काही गळून पडायला तयार नसतात. काही गोष्टी, वस्तु, ठिकाणं यांचा मोह कालपरत्वे सोडलेलाच बरा. नाहीतर ऐन वेळी खूप त्रास होतो. जो या वृद्धाश्रमातल्या लोकांना होत होता. सूर्य उगवला असं म्हटल्यासारखं ते म्हणत होते, आम्ही बरे आहोत असं. पण ती जखम कधीही भरून न येण्यासारखी होती.


        “काय रे अण्णा, एकटाच आलास? तो तुझा रूम पार्टनर महाजन नाही आला का?” बर्वे काकांनी किचनमध्ये येत असलेल्या अण्णांना विचारलं.  

        “रात्री नीट झोपला नाही तो, दर एक-दीड तासाने उठून बसायचा. त्याला विचारलं तर काही बोलायचाच नाही. काही नाही रे, बरा आहे मी असं सांगायचा. आता पहाटे झोपला. झोपू देत. नको उठवायला त्याला.” अण्णा बर्वे काकांशेजारी बसत म्हणाले.


        “मी कालपासून गंमत बघतोय त्याची. त्या सुधा कदम आल्यापासुन काहीतरी विचारात पडलाय तो. असा भूतकाळात हरवल्यासारखा वाटतोय. काल बोलतानासुद्धा मध्येच काहीतरी अगम्य बोलायचा. आम्ही विचारलं त्याला आधी. नंतर जाऊ दिलं. त्याला सांगायचं नसेल बहुतेक आम्हाला. तो काहीतरी लपवतोय हे मात्र नक्की.” जोशीकाका थोडं गंभीर होत म्हणाले.


        “खरंय तुझं. त्याला वहिनींची आठवण येत असावी बहुतेक. अण्णा, तुला काय वाटतं? तू कधीचा आहेस त्याच्यासोबत.” बर्वेकाकांनी अण्णांना प्रश्न केला.


        “नाही रे. आम्ही गेल्या वर्षभरपासून सोबत आहोत. पण या विषयावर काही बोलणं नाही झालं कधी. भूतकाळच्या काही गोष्टी विचारल्या तर एवढंच सांगतो, मी विसरलो आता सगळं. मला काहीही आठवत नाही. हे माझं नवीन आयुष्य आहे. याला काही कीड लगायला नको.” अण्णा खिडकीतून येणार्‍या सूर्यकिरणांच्या तिरीपीकडे बघत म्हणाले.

        “त्याच्या मनाचा ठाव लागणं कठीण आहे रे. तो प्राध्यापक होता. विद्वान माणूस. त्याचं दुःख तो आपल्यासमोर कसं आणेल?” जोशीकाका म्हणाले.

        “त्याच्या मनातलं काढावं लागेल. जे असेल ते. नाहीतर तेच घोकत राहील तो बिचारा,” अण्णा दरवाज्याकडे बघत म्हणाले. ते महाजन काकांची वाट बघत होते.

        “हो, बरोबर आहे तुझं. यावर विचार करायला हवा.” बर्वेकाका म्हणाले.   

        असं बोलणं सुरू असतानाच तिथे महाजन आले. जोशींशेजारी बसताना एकदा घड्याळात पहिलं आणि म्हणाले, “भरपूर उशीर झाला रे मला आज.”

        “चालतं रे एखाद्या दिवशी. पहाटेच्या थंडीत झोपण्याची एक वेगळीच मजा असते बघ.” जोशींनी महाजन काकांना प्रत्यूत्तर दिलं. कारण बर्वेकाका पोह्यांमधल्या मिरच्या अण्णांच्या डिशमध्ये टाकत होते. हा मिरच्यांचा व्यापार सुरू असताना महाजन आले याच्याकडे त्या दोघांचं लक्षच नव्हतं.  


        नाश्ता वगैरे झाल्यावर चौघंजण बाहेर पटांगणात आले. कोवळं ऊन पडलं होतं. थंडीच्या दिवसांत असं कोवळ्या उन्हात फिरायला कुणाला नाही आवडणार? एका ठिकाणी बसण्यापेक्षा ऊन खाल्लेलं बरं, असा विचार करून ते फिरायला लागले. आधी कुणीच काहीच बोलत नव्हतं. मग जोशींनी कोंडी फोडत सुरुवात केली, “महाजन, तुला रात्री झोप नाही आली म्हणे? अण्णा सांगत होता.”


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama