shubham patil

Romance Tragedy

3  

shubham patil

Romance Tragedy

श्रवणधारा - भाग 9

श्रवणधारा - भाग 9

3 mins
164


“अरे दुपारची काय, रात्रीची झोपसुद्धा रद्द. चांगली मैफिल जमवू रात्री.” बर्वे काकांनी जोरदार समर्थन दिले. मग हास्यविनोद करत जेवण वगैरे झाले. परत स्वारी महाजन काकांच्या खोलीत आली. खोलीत आल्यावर जोशींनी महाजन काकांना थेट प्रश्न केला, “महाजन, मला वाटतं काळाच्या ओघात ती तुला विसरून गेली बहुतेक. मग तू स्वतःहून ओळख का देत नाहीस. आता ती तुझ्या नजरेसमोरच असते. प्रार्थनेच्या वेळी किंवा इतर कोणत्याही वेळी तू बोलू शकतोस. तेवढंच बरं वाटेल रे तुला.”

        महाजन काकांनी शांतपणे जोशींचं बोलणं ऐकून घेतलं आणि काही न बोलतच पुढे सुरुवात केली,

        

असेच दिवस उलटत होते. सुधाशी नंतर काही बोलण्याचा योग आला नाही. पण दररोज नजारानजर झाल्यावर स्मितहास्य व्हायचं. तेवढंचं बरं वाटायचं. ज्या दिवशी ती नसायची त्या दिवशी थोडं चुकल्यासारखं वाटायचं. मग परीक्षा आली, मनासारखा अभ्यास झाला नव्हता. माझ्या खोलीत भुताटकी होती बहुतेक. इतकी प्रचंड झोप यायची की काय सांगू. म्हणजे दिवसभर झोपलं तरी रात्री झोप मी म्हणायची. हे जर असंच सुरू राहिलं तर काही खरं नाही हे माझ्या लक्षात आलं. अभ्यासला लायब्ररी हा एकच चांगला पर्याय आहे हे मी ताडलं. मग दुसर्‍या दिवसापासूनच लायब्ररीत अभ्यासाला जायचं हे नक्की केलं. काही दिवस लायब्ररीत अभ्यास केला. ठरवलं त्यापेक्षा जास्त अभ्यास होत होता. मला माझीच शाबासकी द्यावीशी वाटली. एके दिवशी सुधा पुस्तकं घ्यायला आली होती आणि मीसुद्धा रॅकमध्ये पुस्तक शोधत होतो. माझ्याकडे नजर जाताच ती हसली आणि म्हणाली, “जोरात अभ्यास चाललाय वाटत?”

        आम्ही लायब्ररीत होतो याचं भान तिला नव्हतं. मी तिला खुणेनेच म्हटलो. आपण बाहेर बोलूयात. आम्ही बाहेर आलो. यावेळी मीच सुरुवात केली, “तुमचा भरपूर झाला असेल अभ्यास.”

        “कशाचं काय. सुरुवातसुद्धा नाही केली अजून. तुमचं मस्त आहे बुवा. खोलीत एकटे असतात. डिस्टर्ब करायला कुणीच नसतं.” तिने तिचे विचार मांडले.

        “नाही, रूमवर असताना प्राचंड झोप येते. काहीतरी भुताटकी आहे बहुतेक. त्यामुळे इथं लायब्ररीत येतो अभ्यासाला.” मी सांगितलं.

        माझ्या बोलण्यावर ती हसू लागली. माझ्या बोलण्यावरचं तिचं हसणं म्हणजे अगदी मनापासून असायचं. खिल्ली उडवणारं किंवा खेचणारं नव्हे. ती विनंतीच्या स्वरुपात म्हणाली, “माझा घरी काहीच अभ्यास होत नाही हो. मीसुद्धा लायब्ररीत अभ्यास करण्याचा विचार करते आहे. आपण सोबत अभ्यास केला तर चालेल का तुम्हाला? माझ्या काही अडचणी आहेत, त्यासुद्धा सोडवायला तुमची मदत होईल.”

        तिचं हे अखंड बोलणं ऐकून मी म्हणालो, “तुम्ही ही वाक्यं पाठ करून आला होतात का? म्हणजे एकदम न अडखळता बोललात म्हणून विचारलं.”

        माझ्या ह्या बोलण्यावर ती खळखळून हसू लागली आणि हसतच म्हणाली, “काय मजा घेताय आज गरिबाची.”

        “मी कुठं मजा घेतोय. मला जे वाटलं ते बोललो. तुम्हाला सोबत अभ्यासाची इच्छा असेल तर मला काही हरकत नाही.” मी म्हणालो.

        “ठीक आहे तर मग, उद्यापासूनच सुरू करुयात.” तिनेच ठरवलं.

        “चालेल,” मी अनुमती दिली.

        “एक सांगू का? संगतेच, तुमच्याशी बोललं की छान वाटतं. म्हणजे मस्त वाटतं.” असं बोलून माझ्या प्रत्युत्तराची वाट न बघता ती निघालीसुद्धा. तिच्या बोलण्याचं मला गालातल्या गालात हसू आलं. त्या दिवशी अभ्यास झाला नाही. दुसर्‍या दिवसाची वाट बघण्यात तो दिवस वाया गेला.  


        दुसर्‍या दिवशी मी खूप उत्साहात लायब्ररीला गेलो. त्या दिवशी थोडी नीट तयारी केली होती. तशी रोज करायचो, पण घाईत. लायब्ररीत माझ्या नेहमीच्या जागेवर बसलो. बाजूच्या जागेवर रुमाल टाकला आणि सुधाची जागा रिझर्व्ह करून ठेवली. पुस्तक उघडून बसलो पण अभ्यासाची इच्छा होत नव्हती. अर्ध्या तासाने सुधा आली तेव्हा थोडं बरं वाटलं. येताच तिने सुरुवात केली, “सॉरी, मला उशीर झाला.”

        “नाही, तसं काही नाही. मीसुद्धा आताच आलो. पण तुमच्याशिवाय अभ्यासला सुरुवात कशी करणार?” मी म्हणालो. तिने स्मितहास्य केलं. मग परत मी म्हणालो, “तुम्ही माझ्या रुमालावर बसलात. तो द्याल का प्लीज?”

        क्षणभर तिला समजलंच नाही. मग खुर्चीवरून उठत माझा रुमाल मला दिला आणि हसू लागली. भरपूर हसल्यावर ती म्हणाली, “तो रुमाल तिथं का ठेवला होता?”


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance