श्रवणधारा
श्रवणधारा
सायंकाळ होत आली होती. प्रार्थनेची वेळ जवळ येत होती. महाजन काकांनी तसं सांगितलं. सर्वजण उठून मग हळूहळू मंदिराकडे जाऊ लागले. आज महाजन काकांचा दिवस होता. आज फक्त तेच बोलणार होते आणि बाकी सर्वजण ऐकणार होते. प्रार्थनेला अजून काही वेळ होता आणि कुणी आलं नव्हतं त्यामुळे जोशीकाकांनी अतिशय उत्कंठेने विचारलं, “मग पुढे काय झालं?”
महाजन काकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “जोशी, अरे दिवसभर लेक्चर देऊन दामलोय मी. कॉलेजमध्ये शिकवायला असतांनासुद्धा इतका बोललो नव्हतो कधी.” त्यांच्या ह्या वाक्यावर सर्व मंडळी खळखळून हसू लागली. त्यांना असं हसताना पाहून बर्वेकाकू जवळ आल्या आणि बर्वेकाकांना म्हणल्या, “काय चाललंय आज? आम्हाला कळू तरी द्या. दिवसभर महाजनांच्या खोलीत आहात तुम्ही.”
“तो चरित्र सांगतोय.” बर्वेकाकांच्या तोंडातून अचानकपणे बाहेर पडले.
“चरित्र म्हणजे, आत्मचरित्र वगैरे कसं लिहितात?” त्याबद्दल माहिती देतोय. जोशींनी वेळ मारून नेली.
बर्वेकाकू गेल्यावर जोशी चिडून म्हणाले, “बर्व्या, आता भांडेफोड झाली असती ना, तर तुला सोडलं नसतं बघ.”
प्रार्थना झाली, आज सुधाकाकू आल्या नव्हत्या. महाजन काकांचे डोळे त्यांनाच शोधत होते. त्या आल्या नाहीत असं बघून त्यांनी चेहर्यावर नाराजीचे भाव न आणू देता प्रार्थना म्हटली आणि पाटांगणाकडे जाऊ लागले, मंडळी सोबत होतीच. मग एका बाकावर बसून महाजन काकांनी उत्तरार्धाला सुरुवात केली,
नशीब आमच्या सोबत होतं. यावेळी सुद्धा आम्ही एकाच वर्गात होतो. त्यामुळे आमच्या आनंदाला पारावार नव्हता. आता आम्ही एकमेकांना नावाने हाक मारायला लागलो होतो. त्यामुले अजून जवळीक वाढली होती. कॉलेजच्या पहिल्या दिवशीतर आम्ही लेक्चरला बसलोच नाही. दिवसभर गप्पा मारत बसलो. तिने पहिलाच प्रश्न केला, “अरुण, तू मला तुझा पत्ता का नाही दिलास?”
“अगं पत्ता दिला असता तर तू मला पत्रं पाठवली असतीस. मगं मला उत्तर पाठवावं लागलं असतं. माझ्या घरी जाऊ दे, कुणाला वाचता नाही येत. तुझ्या घरी कुणी बघितलं असतं तर तुझ्या बाबांनी आमच्या इथल्या पोलिस स्टेशनला फोन लाऊन मला बेड्या ठोकायला लावल्या असत्या. मग लग्नाच्या बेड्यांऐवजी दुसर्याच बेड्या पडल्या असत्या हातात.” मी सांगितलं.
या बोलण्यावर ती आधी हसली आणि मग थोडी गंभीर झाली, “खरंय, रे तुझं. मी या सार्या गोष्टींचा विचार केलाच नव्हता. यावर विचार करावा लागेल आणि तुला कसं सुचतं रे इतका दूरचा विचार करायला?”
“एकाच गोष्टीचा सतत विचार केला तर ती गोष्ट आपल्या मनात खोलवर जाते आणि त्या गोष्टीची विचार करण्याची सूत्रं मेंदुकडून हृदयाकडे जातात आणि प्रेमाच्या बाबतीत हृदयाचं नाही ऐकणार तर कुणाचं?” मी सविस्तर खुलासा केला.
माझ्या ह्या वाक्यावर ती माझ्याकडे स्तिमित होऊन बघू लागली आणि म्हणाली, “तुला असं बोलायला कसं सुचतं रे?”
“ही एक ईश्वरदत्त देणगी आहे, कुणालाही नाही मिळत. तुझं नशीब चांगलं की तुला आयुष्यभर अशीच वाक्यं ऐकावी लागणार आहेत.” माझ्या ह्या वाक्यावर मात्र तिने माझ्या दंडाला जोरात चिमटा काढला.
मग परत ते सोनेरी दिवस सुरू झाले. तीन वर्ष कशी गेली ते कळलंसुद्धा नाही. या तीन वर्षांत आणि मागील तीन वर्षांत आमच्यात कधी भांडण झाल्याचं मला आठवत नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो पण इतरांसारख्या भल्यामोठ्या अपेक्षा नव्हत्या. आम्ही कधीच कॉलेजच्या बाहेर भेटलो नाही. कधी सिनेमाला गेलो नाही. फक्त आमचं एकमेकांसोबत असणं हे आमच्यासाठी खूप होतं. तिने फूल मळावं आणि मी त्याची स्तुती करावी. कधी फूल नसलंच तर त्याचं नेहमीचं कारण मी ऐकावं. कधीकधी तर मीच तिच्या ढंगात कारण सांगताना तीला हसताना बघण्याचा एक वेगळाच आनंद होता. आम्ही दोघांनी खूप स्वप्न पहिली होती. स्वप्न खूप होती पण लहानशी होती. हां, एक स्वप्न मोठं होतं, आम्हाला दोघांना प्राध्यापक व्हायचं होतं. त्या दृष्टीने तयारी सुरू होती.
क्रमश:

