shubham patil

Romance Tragedy

3  

shubham patil

Romance Tragedy

श्रवणधारा - भाग 11

श्रवणधारा - भाग 11

2 mins
276


दुसर्‍या दिवशी लवकर तयार होऊन पुणे स्टेशनला गेलो. तीन वर्षांपूर्वी आलो तेव्हा कसा होतो मी? काय गमावलं, काय कमावलं? याचा विचार करत मी माझ्या जागेवर बसलो. गाडी सुटायला अजून अवकाश होता. मी समान वगैरे ठेवत होतो. भरपूर समान आणलं होतं घरून. पण फक्त आणलंच होतं, आता सर्व एकाच वेळी घेऊन जात होतो. मी पेट्या वगैरे नीट ठेवत असताना माझ्यासमोर एक सावली दिसली. वर बघून पाहतो तर ती सुधा होती. माला आश्चर्याचा धक्का बसला. मी तिला बघून क्षणभर थबकलोच.


        मला काही बोलू न देताच ती म्हणाली, “मी विचार केलाय. अरुण, मला आवडेल तुझ्यासोबत संसार करायला.” असं म्हणून तो लाजेने लाल झाली आणि लाघवी हसू लागली. नजर मात्र खालीच होती आणि उगाचच केसांच्या बटेशी चाळा करत होती. तिने मला एकामागून एक दोन अनपेक्षित धक्के दिले होते. एक म्हणजे मी विचारसुद्धा केला नव्हता, ती मला थेट पुणे स्टेशन वर भेटायला येईल असा आणि दुसरं म्हणजे तिला माझ्याशी संसार वगैरे करण्याची इच्छा होईल. तिचं बोलणं ऐकून मी सीटवर बसलो. माझ्यासमोर ती बसली. नेहमीप्रमाणे गहन प्रश्न, काय बोलावं?

        तिची खेचवी या उद्देशाने मी म्हणालो, “ठीक आहे, तुझा विचार झाला. पण माझं काय? मला वेळ हवा विचार करायला.” माझ्या ह्या वाक्याने ती बुचकळ्यात पडली. मी मजा घेतोय की खरं बोलतोय हे तिला कळत नव्हतं. माझ्या चेहर्‍यावरचे भाव मी अगदी निर्विकार ठेवले होते. आतून कितीही गुलाबी गुदगुल्या होत असल्या तरीही. मग ती म्हणाली, “गाडी सुटेपर्यंत वेळ आहे.”

        यावेळी मी खळखळून हसलो. मी तिची मजा घेत होतो हे लक्षात येताच दोघं हसायला लागलो आणि हसता हसता केव्हा हातात हात घेतले तेच कळलं नाही. मग भानावर आल्यावर तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी म्हटलो, “राहू देत आता. कायमचेच.” ती परत लाजली.

        मी हात सोडत म्हणालो, “तू घरी सांगितलं का?”

        “वेडा आहेस का? कशाला इतक्यात. वेळ आल्यावर सांगेन. अजून तीन वर्ष काढायचे आहेत तुझ्यासोबत आणि नंतर संपूर्ण आयुष्य.” तिचं हे बोलणं ऐकून मी लाजलो. गाडी सुचण्याची सूचना झाली तशी ती उठून गाडीच्या बाहेर आली आणि खिडकीपाशी येऊन थांबली. मी तिला म्हणालो, “मी परत येईपर्यंत काहीतरी आठवण म्हणून दे.” तिने लगेच तिचा रुमाल दिला. मी तो पेटीत ठेवायला लागलो तेव्हा ती म्हणाली, “आणि मला काय?” तेव्हा मला त्या माझ्या रुमालाची आठवण झाली, ज्याच्यावर ती बसली होती. मी पेटीच्या एका कोपर्‍यातून काढून तो दिला. मीसुद्धा रुमाल दिला हे पाहून ती हसली तेव्हा मी म्हणालो, “ह्या रुमालाला लायब्ररीत तुझा स्पर्श झाला म्हणून मी जपून ठेवला होता. आपल्या सोबतच्या पहिल्या अभ्यासाचा साक्षीदार आहे तो.” माझं बोलणं ऐकून ती खली बघत स्मितहास्य वगैरे करू लागली. गाडी सुटण्याची शेवटची सूचना झाली, भोंगा वाजला आणि गाडी सुटली. मी तिला बघितलं तेव्हा ती डोळे टिपत होती. तिने हात हलवून मला निरोप दिला. मीसुद्धा हात हलवला. प्रवास तिच्या आठवणीत कसा गेला हे कळलंसुद्धा नाही. मग कशाबशा सुट्ट्या ढकलल्या आणि मास्टर्ससाठी म्हणून परत एकदा पुण्यनगरीत आलो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance