शृंखला
शृंखला


जानवी खिडकीत उभी होती. तेवढ्यात डफली चा आवाज येऊ लागला.
दार उघड बया दार उघड
कडकलक्ष्मी आली दारी दार उघड
पुढे पोतराज उभा. हातातल्या कोरड्या हंटर अणे स्वतःच्या शरीरावर प्रहार करत होता.
कपाळभर मळवट भरलेला कमरेला अनेक छंद यांपासून तयार झालेला घागरवजा वस्त्र नेसलेला. गळ्यात मण्यांच्या माळा कमरेला सहील भर घुंगराची माळ बांधलेला आणि पायात खुळ्या घातलेल्या.
असा पोतराज पाहिला किम छोट्या मुलांना ही भीती वाटे.
"दान करा मायबाप दान करा". असा पोतराज म्हणत सगळ्यांच्या पुढे हात पसरत होता. जाताना कोणीही न पाहिल्यासारखे करत पुढे जात होते. कोणी एक दोन रुपये टाकत होते. भल्यामोठ्या इमारती पण त्यातून कोणीही खाली येत नव्हते. किंवा कोणी सुपात धान्य देत नव्हते.
आजच्या पिढीकडे सूपचं नव्हते. सुपातून दान काय करणार.,? वेळ आहे कोणाकडे?
जानवी ला भूतकाळ आठवला .
त्याच्या वर्गात विकास नावाचा मुलगा होता . तो पोतराज होता. शाळेत खूप हुशार होता. त्याचे घारे घारे डोळे, नाक तरतरीत होते. गोरा पान. लगेच नजरेत भरणारा होता. फक्त एकच मुलींना आवडत नसे. त्याचे केस. त्याचे लांबलचक केस होते. तो अंबाडा बांधून शाळेत येई. त्याला मुले चिडवत.
"काप ते केस काय मुलींसारखे केस ठेवलेत?".
"अरे आमच्या केस कापत नाहीत आम्ही पोतराज आहोत. देवी कोपेल ना. आमच्या पिढ्यान पिढ्या असं चालत आलेला आहे." विकास म्हणाला.
मंगळवार शुक्रवार शाळेला उशीर होत असे
"काय रे अ शाळेत यायला उशीर झाला"
सर आज मंगळवार आहे ना मंगळवारी शुक्रवारी मला जरा उशीर होतो. बाबांबरोबर जावं लागतं ना. मी सुद्धा पोतराज चे कपडे घालतो.
स्वतःच्या अंगाला फटके देतो."
"तुला लागत नाही का रे?"सर म्हणाले
"आता नाही लागत. सुरुवातीला पाठ लाल झाली होती. थोडसं एका ठिकाणी रक्त आले होते. आईने मग हळद लावली आणि विटेने शेक दिला. हळू हळू शरीर कडक बनत गेलं. सवय लागली."
"विकास तू मात्र खूप शिक्षण घे. हुशार आहेस मध्ये शाळा सोडू नको. या पोतराजने काय तुझं पोट भरणार नाही" सर म्हणाले.
"होय मी शिकणार आहे."
"घरात कधी कधी उपाशी दिवस काढावे लागे. सुगीच्या दिवसात धान्य मिळत. कोणी पीठ देई. कोणी ज्वारी देई. भात सणासुदीलाच आई विकत आणत असे."
"म्हणूनच म्हणतो बाळा तुला शिकलं पाहिजे. पुढचं युग आणखी बदलेल. घरं जातील इमारती येतील टॉवर येतील. तेव्हा कोण दान देईल?."
"होय सर मी खूप शिकेल"
जानवीला आज खरं वाटत होतं. खरंच इमारतीतून कोणी खाली उतरलं नव्हतं. पोतराजला धान्य मिळाले नव्हते.
विकास दहावी झाला. कॉलेजला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. शेटे सर त्याला चांगलेच भेटले.
"विकास तू विज्ञान युगात वावरत आहे. सायन्स ला प्रवेश घेतला आहे. अजूनही तो अंबाडा सोडला नाहीस."
"आई म्हणते आपली पिढीजात परंपरा आहे प्रथा आहे ती सोडायची नाही. देवी आपल्यावर कोपेल. तुला शाळेत पाठवलं तेच लय झालं."
"ते खर आहे. तुला शिकलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितले नीटनेटके रहा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि तो पिल्या वर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तू विचार कर तुला वेळ देतो."असे म्हणत सर निघून गेले.
त्याच्या मित्रांनी त्याला दुजोरा दिला. सगळ्यांनी त्याला केस कापण्यासाठी तयार केले. कमरेपर्यंत असणारे केस त्याचे कापले. तो छान दिसू लागला.
सरांसमोर आला. त्यांनी ओळखलंच नाही.
"सर"
"विकास छान म्हणजे या परंपरेचा रूढीच्या शृंखला तोडल्या शेवटी. बंधनातून मुक्त झालास. आता तू घे भरारी."सर म्हणाले
"सर आज मला खूप आनंद झाला आहे. आकाश ठेंगणे झाले आहे. जणू माझे हात आकाशाला पोहोचले असे वाटते."
"आता घरी जा बाळा घाबरू नको आलेल्या परिस्थितीला सामोरे जा. शेवट चांगला असेल."
विकास धावतच घरी गेला. आईने त्याच्याकडे पाहिले
ओरडलीच.
"अरे माझ्या कर्मा काय केलं"?
परंपरागत पिढीजात आलेली प्रथा मोडलीस. आता लक्ष्मी आई आपल्यावर कोपेल. सगळ्या घरादारावर खराटा फिरेल."
"अगाई तू शांत हो. देवी आई सगळ्यावर प्रेम करते. ती आपल्या लेकरावर कशी रागवेल.? मी काही चूक केली नाही. फक्त केस कापलेत."
अरे बाबा आता काय होईल? असे म्हणत आई जोरजोराने रडू लागली. आयाबाया जमा झाल्या. त्यांनाही सांगू लागली.
काही दिवस गेले. सरही घरी आले. त्यांनी समजून सांगितले.
"तुमची पिढी ठीक आहे पुढची पिढी कशी जगणार?. त्यांना दान कोण देणार? सगळे स्टेटस मध्ये जगणार.
तुमच्या मुलांनी केले ते योग्य केले आहे. त्याला सांभाळून घ्या."सर म्हणाले.
बऱ्याच वर्षांनी जानवी गावी गेली. तेव्हा विकासची
आठवण आली.
""आई विकासच काय झालं?"
काय झालं म्हणजे शाळेचा मुख्याध्यापक आहे तो. गावात बंगला बांधलाय. आई-वडील सुखात आहेत."
विकास'ने सरांमुळे पिढ्यान पिढ्या चालत आलेली शृंखला तोडली होती. बंधने झुगारून दिली होती. तो मुक्त झाला होता. गगन झेप घेण्यासाठी. ते सत्यात उतरवले. धन्य ते सर आणि धन्य तो विकास.