अतूट मैत्री
अतूट मैत्री


सकाळी सगळे मॉर्निंग वाक करत होते. थोडा कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. सगळे तिकडे पाहू लागले. पांढराशुभ्र कुत्रा त्याच्या गळ्यात लाल भडक सेटिंग पट्टा. एखाद्या तरुणींनी लालभडक लिपस्टिक लावल्यानं सारखं वाटत होतं. तोही दोरीला हिसके देत होता. त्याची दोरी ज्याच्या हातात होती. तिने मिनी स्कर्ट घातला होता. बाप कट केलेली सुंदर तरुणी होती.
गल्लीतले कुत्रे त्या कुत्र्याला पाहून भुंकत होती. तोही त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होता. तरुणी त्याला"रॉकी, रॉकी चल इकडे"असे म्हणत ओढू लागली.
रोज असेच घडे. आता रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची व त्याची ओळख होऊ लागली. एके दिवशी ती तरुणी व्यक्तीबरोबर बोलत असतान रॉकी दोर ओढत होता. ती बोलण्यात इतकी गुंग होती की तिच्या हातातून दोर कधीच सटकला तिला कळले नाही. रॉकीने धूम ठोकली. सरळ मोतीकडे. मोती व रॉकी खूप जुने मित्र असल्यासारखे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून उभे होते. जणू खूप गप्पा मारत असावे असे वाटत होते.
इतक्यात तरुणीचे लक्ष आपल्या हाताकडे गेले. अरे "रॉकी, रॉकी कुठे गेला?"ते शोध घेऊ लागली व आवाज देऊ लागली. रॉकीने तिचा आवाज ऐकला.
"निघतो रे बाबा माझी मालकीन येते. तिने जर तुझ्याबरोबर पाहिलं मला पुन्हा आणायची नाही."
तो तिच्याकडे धाव घेऊन आला. तिने त्याला जवळ घेतले. रॉकी कुठे गेला होतास कुत्र्यांनी तुला फाडलं असतं. सरू तिथेच उभी होती. तिला आपलं बालपण आठवलं. सरूचं नाव सरस्वती. नावाप्रमाणे ती फार हुशार होती. तिला एक मैत्रीण होती. तिचे नाव लक्ष्मी. त्याप्रमाणे ती खूप श्रीमंत होती. तिच्याकडे बंगला गाडी नोकर चाकर सगळे होते. सरू व लक्ष्मी एकाच वर्गात होते. लक्ष्मीला गाडी घ्यायला यायची. गाडीला चुकवत सरस्वती बरोबर चालत घरी जायची.
"लक्ष्मी गाडी पाठवली होती चालत का?"
"आई मला गाडी कुठे दिसलीच नाही मग चालत निघाले"अशी थाप मारत असे.
सरुचे घर साधे होते. घराच्या वर पत्र होता. एकाच घरात आई-वडील पाच भावंडे राहत होते. पण अभ्यास मात्र खूप करायची.
"सरू तू मला खूप आवडते माझी प्रिय मैत्रीण आहेस."लक्ष्मी म्हणाली.
वर्गातही सर्वांना माहीत होते. कृष्ण सुदामा ची जोडी असे त्यांना चिडवत.
"हा घे माझा डबा आज शिरा केलाय गोड आईने तू खा"
"तू काय खाणार?"सरू म्हणाली.
"तुझ्या डब्यांत जे आहे ते मी खाईन".
"माझ्या डब्यातआहे मी आज चपाती आणि शेंगदाण्याची चटणी दिली."
."मला आवडते चटणी आणि चपाती खायला. आणि इकडे डबा मी खाते".
"हे बघ संपवली चटणी चपाती आईला सांग खूप छान झाली होती."
शाळेत येताना सरु बाभळीच्या झाडाची फुले कानात घालत असे. लक्ष्मीला त्या कानातले पिवळी फुले खूप आवडत.
"तुझी मजा आहे रोज ताजी फुले कानात घालून येते."
"अग तुझ्या कानात सोन्याचे रिंग आहेत."
"मला नाही आवडत पण आई घालते."
"उद्या तुला फुले मी आणते कानात घालायला". दुसऱ्या दिवशी सरूने फुले नेली. तिच्या कानात ते फुले घातली. घरी गेल्यावर आधी आरशासमोर उभी राहिली. कानातली फुले निरखून पाहू लागली. खरच सुंदर दिसत होती. आई बघेल म्हणून पटकन तिने काढून ठेवले.
एके दिवशी लक्ष्मी गाडीतून उतरली. तिने पाहिले समोर सरू खाली बसली आहे. धावत असते तिच्याजवळ गेली.
"अग काय झालं का बसली"?.
""काटा टोचला."
"थांब मी पाहते."असे म्हणत तिचा पाय आपल्या गुडघ्यावर घेत पायातला काटा काढला.
"घरी गेल्यावर डॉक्टरांकडे जा."
"अग डॉक्टरांकडे कशाला जायला हवं आई गुळाचा चटका देईल. मग बरे वाटेल."
"चल पटकन प्रार्थना सुरू होईल."
शाळा सुटल्यावर सरु घरी आली."आई आज पायात काटा गेला."
"काटा काढला का?"
"हो लक्ष्मीने काढला".
पण आई माझी चप्पल बघ तिलाच टाच नाही पूर्ण झिजून गेली.
सरूचा वाढदिवस होता. बाबांना यावेळेसही चप्पल घेणे शक्य नव्हते. लक्ष्मी आली तिने सरू च्या हातात चप्पल दिली. सरूने लक्ष्मीला मिठी मारली. रडू लागली.
"अगं रडतेस काय? मी तुझी सखी मैत्रीण आहे. तुझ्या वेदना मला कळणार नाही." लक्ष्मी म्हणाली. कुत्रा भुंकण्याचा आवाज आला. सरू भानावर आली. बाकाखालून रॉकी पळाला.
"थांब रोज पळतोस उद्या तुला माझ्या हाताला दोर बांधून ठेवते."
जाताना रॉकी मोतीकडे पाहू लागला. कोणास ठाऊक उद्या आपली भेट होईल की नाही. त्यांची ही अतूट मैत्री शेवटपर्यंत टिकेल न टिकेल. खरंच होतं ते... आजपर्यंत लक्ष्मी भेटली नाही. कशी असेल लक्ष्मी तिच्या आठवणीने मन गलबलून गेले. सुदामा तरी कृष्णाला भेटला होता. सरूला मात्र लक्ष्मीला भेटता आलं नाही. तिथे बंगला नव्हता आता इमारती तयार झाल्या होत्या. शोध घेणार कुठे.?