लॉकडाउन - एक प्रवास
लॉकडाउन - एक प्रवास
आज रात्रभर झोप येत नव्हती. गावी कसं जाता येईल हाच विचार मनामध्ये होता. रमा आपल्या लेकीकडे आली होती. दोन दिवस राहिली आणि लॉकडाऊन झालं. लेकीच्या घरचं पाणी पीत नाही. तिच्याकडे दोन महिने राहावं लागलं होतं. तरी सुटका नव्हती. मजुरांना सोडत होते. बराच वेळा ऑनलाइन तिकीट काढायचा प्रयत्न केला. पण होत नव्हतं. तिच्याबरोबर मंदा आली होती. तिच्या बहिणीचं ऑपरेशन झाले होते. तिला पाहण्यासाठी आली होती.
बहीण आपली होती पण तिचा नवरा. तो काय म्हणत असेल?
काय करावं ते कळत नव्हतं. "ताई बघ ना जरा ऑनलाईन तिकीट मिळतंय का?"
"अग मंदा रेड झोन आहे. कळतय का? डेंजर झोन त्यामुळे कोणाला जाता येत नाही येता येत नाही. ऑरेंज किंवा ग्रीन झोन असता तर जात आलं असतं"एवढ्यात रमा आली.
"रमा ताई बघ काय म्हणते?"
"अगं खरं आहे ते सांगते. आपल्या देशावर कोरोनाच संकट आहे जिथे कोरोनाचा कहर झाला आहे. म्हणजे जिथे पेशंट जास्त आहे तो भाग सिल केला जातो. तिथे दुकाने बंद, घराबाहेर पडणे बंद. मग तुम्ही कसे जाणार? हा भाग ऑरेंज किंवा ग्रीन झाल्याशिवाय जाता येणार नाही."
"अग पण मजुरांना कसे सोडत आहे एसटीने?"मंदा म्हणाली.
"त्यांना सोडता येत तुम्हाला नाही."
"पेशंट कधी कमी होणार ?आणि हिरवा विभाग केव्हा होणार ?तोपर्यंत आम्ही इथेच राहायचं का?"
"अग हो हो हो किती प्रश्न विचारशील ये तुला
आहे ना? रहा ना थोडे दिवस."
रमाने डोळ्याने खुणावले. तशी दोघी बाहेर आल्या. "तिचं काय ऐकते. ?उद्या आपण पहाटेला निघू तु तयारीत रहा मी पण तयारीत राहते"रमा म्हणाली.
"हिरवे पिवळे लाल विभाग काय व्हायचे ते होऊ दे आपल्याला निघायला हवं."
दोघी पहाटेच्या वेळेला बाहेर पडल्या. भरभर रस्त्याने चालू लागल्या. तीन तास चालून थकल्या. एका झाडाखाली विसावल्या. एक दोन माणसे जाताना दिसली.
"भाऊ बस आजरा झाडाखाली कुठे निघालात?"
"लातूरला"
"आम्ही पण तिकडेच निघालो. बरं झालं तुमच्या पाठी पाठी आम्ही पण येतो."
रस्त्याने कोणी जेवणाचे पाकीट देत होते. पाणी देत होते. मधे थोडा विसावा घे जेवण करून पुन्हा निघत असे. रात्रीच्या वेळेला एखादं गाव पाहून त्याठिकाणी विसावा घेत. पुन्हा पहाटे निघत. असे करत तीन दिवसांनी दोघी लातूरला पोहोचल्या. घरी जाऊन ताईला फोन लावला.
"आम्ही पोहोचलो व्यवस्थित शमाला पण सांग तिची आई पण व्यवस्थित पोहोचली."
ताईला खूप राग आला. तीन दिवस आम्ही इथे रडतोय.
काय करत असतील कशा असतील कोरोनाचा संसर्ग झाला नसेल ना एक ना दोन अनेक विचार मनात येत होते आणि आता तुम्ही फोन करताय?"
"अग जाऊ दे तुझा तो हिरवा विभाग कधी व्हायचं आम्ही कधी पोहोचायचं?"
"यामुळेच देवानेसुद्धा आपली दारे बंद केलेत. माणूस काय ऐकायला मागत नाही. कोरोना कसा थांबणार?"ताई म्हणाली.
"असं म्हणू नको देव आहे ग. माणसात देव आहे. म्हणून रस्त्याने आम्हाला जेवण पाणी काही कमी पडू दिलं नाही. बरोबर देवदूत आमच्याबरोबर पाठवला रस्ता दाखवण्यासाठी. देवा तुझे फार उपकार."
"कोरोना जात धर्म काही पाहत नाही. लहानथोर वृद्ध तेही पहात नाही. देश-विदेश तेही पाहत नाही. सगळ्याला पछाडला आहे. पहाते फक्त पृथ्वी. पृथ्वीवरचा माणूस. आतातरी माणसाने सुधारावं." असे म्हणत ताईनी रागाने फोन ठेवला.