आईचे ऋण
आईचे ऋण


कोंबड्याने बांग दिली. सुमन पटकन उठली. आज तरी पोरांना काहीतरी गोड खायला मिळेल. या आशेने भरभर आवरून लागली. थर्टी फर्स्ट साजरा झाला आहे. बऱ्याच पार्ट्या झाल्या असणार. बाटल्या व कागद मिळेल. हा विचार करत होती. तेवढ्यात बाबू उठला."आई आज मी शाळेत जाणार नाही बघ. रोज डबा देते म्हणतेस. रिकामा डबा देते. सगळी पोरं डब्यात भाजी चपाती घेऊन येतात. मी असा". बाबू तक्रारीवर तक्रार करत होता."आज मी डब्याला बिस्कुट देणार आहे". हे ऐकताच बाबू नाचायला लागला.
"अरं मी इथं बिस्कुट ठेवलं होतं. कुठे गेलं?"
"मी खाल्लं"बाबू म्हणाला.
"अरं माझ्या कर्मा, मी काय करू?"तिच्या डोळ्यातून पाणी आले.
"आई मी नाय जाणार शाळेत. रोज डब्बा देत नाही. मधल्या सुट्टीत मुलं भाजी चपाती खात असतात. म्या मग तोंड बघत बसतो. पोटात कालवाकालव होतं. तू येते म्हणते आणि येत नाहीस."बाबू रडत रडत पाय आपटीत म्हणत होता. तिलाही वाईट वाटत होते काय करणार होती बिचारी.
"माझं सोनुलं आज शाळेत जा बाबा. मी नक्की येईन. नवं वर्ष सुरू झालंय. पहिल्या दिवशी खाडा. नग असं करू नग बाबा."बाबू कोपऱ्यात रुसून बसला.
"काल थर्टीफर्स्ट होतं बाळा. आज आईला लय कागद आणि बाटल्या मिळतील. काल रात्री लोकांनी पार्ट्या केले असतील. लवकर निघाले ना तर मला कागद व बाटल्या मिळतील. मी गेले नाही ना दुसरे घेऊन जातील. म्या आल्यावर गोड-धोड करते. चालेल. बाळा जा शाळेत. माझं छकुलं."तिने बाबूला खूप लाडी गोडी लावली. कसंबसं शाळेत जायला तयार केलं.तिनेही आवराआवर केली. एका खांद्याला गोणीची झोळी बाटली जमा करण्यासाठी तर दुसऱ्या खांद्याला कागद गोळा करण्यासाठी गोणीची झोळी अडकवली. घराला कुलूप लावलं. बाबुचा हात पकडला. शाळेकडे धाव घेतली. बाबु दिसायला गोरा त्याचं कपाळ फार मोठं होतं. त्यामुळे तो वर्गात उठून दिसे.
"बाई मला जरा उशीर झाला तर, बाबूकडे लक्ष द्या "
"तुम्ही जा, मी लक्ष देईन" बाई म्हणाल्या.
सुमन भरभर चालू लागली. रस्त्याच्या कडेने पडलेले कागद वेचू लागली. आज पुट्टे खूप मिळाले होते. लोकांनी पार्ट्या केल्या होत्या. समोसे, पाणी बॉक्स मधून आणले होते. आज कागदी पुठ्ठे खूप मिळाले होते. तिला माहित होते चौकात, हॉटेल या ठिकाणी कागद, बाटल्या, कागदी बॉक्स मिळतील. खरंच आज खूप साहित्य मिळाले होते. ते विकून आज तिला पैसे मिळणार होते. पोरांना गोड खायला मिळणार. बाबुला आनंद होईल. या विचाराने तिचे पाय भरभर चालू लागले.
दोन्ही खांद्यावर ओझ वाढलं होतं. भंगाराच्या दुकानात जाऊन ते विकलं. पैसे कमरेला खोचले. तिने शाळेकडे धाव घेतली. पोरगं सकाळपासून उपाशी आहे. जाताना थोडं सामान घेतलं त्याच्यासाठी बिस्किट घेतलं."बाई माझी आई आली". बाबू म्हणाला.
"अरे आला तुम्ही"
"आई मला आज बाईंनी डब्बा दिला."बाब आनंदाने म्हणाला.
"मधल्या सुट्टीत मी वर्गात होते. सगळ्या मुलांनी डबा उघडला. बाबू चा डबा रिकामा. त्यामुळे त्याला विचारलं आईने चुकून रिकामा डबा दिला वाटतं. म्हणून मी माझा डबा त्याला खायला दिला."बाई म्हणाल्या.
सुमनचे डोळे पाण्याने डबडबले. "बाई मी खरं सांगते. माझ्या घरात काहीच त्याला द्यायला नव्हतं माझं घर चालत माझ्यावर. मी कागद वेचण्याचं काम करते . कधी पोटाला मिळत कधी नाही. मला माझ्या पोराला खूप शिकावायचं आहे."असे म्हणत ती रडू लागली. बाईंचे डोळे पाणावले.
"तुम्ही रोज बाबूला शाळेत पाठवा. डब्याची अजिबात काळजी करू नका. मी त्याच्यासाठी रोज डबा घेऊन येईल. तो खुप शिकेल. हुशार आहे, चल बाबू जा ."
"बाबू नमस्कार कर बाईंना."बाबूने नमस्कार केला आईबरोबर हसत-खेळत घरी आला. त्याला खूप "आनंद झाला होता. आई आईने शिरा बनवला.
"बाबू खूप शिक्षण घे. माझ्यासारखा तू कचरा नाय उचलायचं". तिने बाबुला जवळ घेतले. त्याच्या गळ्यात पडून रडू लागली.आज सुमन लवकर उठली. दूरवर भूपाळी ऐकू येत होती.
IIउठी उठी गोपाळा
पूर्व दिशेला गुलाल उधळून
ज्ञानदीप लाविला.II
सुमन ऐकत होती. तिला भूतकाळ आठवला. बाईंनी ज्ञानदीप लावला होता. बाबूला तयार केले होते. तो सर्व स्पर्धेत भाग घेत होता. त्याची तयारी बाई करत होत्या. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम येई. आज त्यामुळे पुढे गेला होता. आज तो महापौर झाला होता. आज शपथविधी होणार होती. कचरा उचलणारी बाईचा मुलगा महापौर झाला होता. आईचे ऋण मुलाने फेडले होते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती धन्य धन्य झाली.