शिक्षकदिन
शिक्षकदिन
अरे बाळ गणू! उठ बाळा! किती झोपशील! तू नि हा छोटा मुशु पृथ्वीवरून आल्यापासून तुमची सारी दिनचर्याच बदललीय बाळा! खूप मोदक खाल्लेस का? सांगितले होते ना अति खाऊ नकोस म्हणून आणि हो, त्या पृथ्वीवरन कसलं तरी प्रकाश देणारं खेळणं घेऊन आलात नि रात्रभर जागून त्यात डोकं खुपसून बसलात दोघेही!
मातेचा आवाज ऐकून गणुबाळ डोळे चोळत उठला। आई! इकडे बघ! उठल्याबरोबर हातात खेळणं घेऊन गणू पार्वती मातेला जवळ ओढून त्या खेळण्यात पाहु लागला
तर काय आश्चर्य! त्या खेळण्यात दोघांचेही प्रतिबिंब आरशाप्रमाणे दिसत होते माता पार्वती अति आश्चर्याने पाहु लागली, बाळा गणू! हा प्रकाश देणारा आरसा कसा आहे रे! काय आहे हे?
माते! याला सेल्फी म्हणतात सेल्फी. माझ्यासोबत सारे पृथ्वीवासी भक्तगण हे खेळणं घेऊन सेल्फी काढत होते, तुला माहितीय का मोबाईल म्हणतात या खेळण्याला!
एका लहानग्या भक्ताने मी जाताना रडत रडत मला हे गिफ्ट दिले, आणि रात्री माझ्याशी चॅटिंग म्हणजे गप्पा मारायला सांगितले. म्हणून तर मी पण त्या छोट्या भक्तांबरोबर रात्रभर या खेळण्याद्वारे चॅटिंग करून गप्पा मारत होतो, (जांभई देत) म्हणून लेट झाला झोपायला, नि उठायला बघ!
गणूचे हे नवीन रूप पाहून आश्चर्य नि चिंतेने माता ध्यानस्थ झाली. गणू बाळा! आलं लक्षात, पृथ्वीवरील सारी लहानगी मंडळी या खेळण्याच्या आहारी गेलीय, तूच काहीतरी कर बाळा! बघ ना, या पाच दिवसातच तू पूर्णपणे बदलून गेलास,मग तासनतास हे खेळणं हाती धरून त्या लहानग्यांची काय अवस्था होत असेल। सर्व चांगल्या गोष्टीवरून लक्ष उडून फक्त या खेळण्यात वेळ घालवीत आहेत।
बाळा!तू बुद्धीचा देवता, तूच काहीतरी कर..वाचव या पृथ्वीला नि तिच्या लेकरांना!
गौरीमातेने मागे वळून पाहिले, नि कपाळावर हात मारून घेतला।
मातेच्या बोलण्याकडे लक्ष न देता बाळ गणू नि त्याचा प्रिय मुषु मोबाईल मध्ये डोकं घालून गेम खेळण्यात व्यस्त!
.
.
.
आज गुरूंचा दिवस (आपला शिक्षक दिन) पृथ्वीवर सर्वत्र टीचर्स डे साजरा होतोय असं छोट्या गणुला मोबाईल status वरून कळले।
माता प्रथम गुरू तिच्या पासुनच आपले अस्तित्व सुरु याची महती गणुला कळाली। आता आपल्या गौराईगुरूमातेला गुरुदक्षिणा तर द्यायलाच हवी। काय द्यावी बर! छोट्या गणुला प्रश्न पडला? अरे मूषका! ऐक ना! तुला कळलं का आज गुरूंचा दिवस आपली पहिली गुरू आपली माता गौराई
चल लवकर तयार हो बर! आपण आज खूप वेळ घालवला या खेळण्यात आता मातेचा आशीर्वाद घेऊ! तू सांग ना, मातेला काय बरं गुरुदक्षिणा द्यायची? काहीच सुचत नाहीय मला तूच सुचव की!
मुषुही डोकं खाजऊ लागला, अरे गणू! माझा मेंदू केवढा! कसं सुचणार तुझ्या साऱ्या भक्तांनी त्यांचे गाऱ्हाणे माझ्या कानात सांगून सांगून माझ्या मेंदूची पार वाट लावलीय आता काहीच सुचतं नाही रे!
आपण मातेलाच विचारूयाना! त्याच सांगतील।
इथे गौराई माता चिंतेत होती कसं करावं या मुलाचं! काहीच सुचत नाही, नाथ पण कैलासावर तपश्चर्या करीत आहेत त्यांना पण विचारू शकत नाही आता.
इतक्यात गणू नि मुषु धावत आले, दोघानीही वाकून नमस्कार केला माते! आशीर्वाद दे
आज गुरु दिवस! आम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे.
माते! तूच माझा प्रथम गुरू तुझ्या पासुनच माझे अस्तित्व सुरू! सांग ना! काय गुरुदक्षिणा देऊ? या मुषु ला विचारले तर त्याचं डोकच चालत नाही म्हणतोय आणि माझं पण🫣
गणूचे लडिवाळ बोलणं ऐकून गौराईमातेला गहिवरून आले, काहीच नको रे बाळ मला! असं बोलणार इतक्यात तिला कल्पना सुचली, प्रेमाने गणुला जवळ घेऊन बोलली, हो बाळा!आज तर गुरुदक्षिणा द्यायलाच हवी।
तू बुद्धीचा देवता! पण तू आज पूर्ण वेळ तुझी कुशाग्र बुद्धी त्या मोबाईल खेळणं खेळण्यात वाया घालवलीस, मातेला काय गुरुदक्षिणा द्यायची याचा साधा विचारही करू शकत नाहीस आता। तुझा अमुल्य वेळ नि कुशाग्र बुद्धी निरर्थक ठरली या कुत्रीम खेळण्यापुढे! हो ना!
बरं मग, आज मला तुझ्याकडून एक गुरुदक्षिणा हवीच आहे या मोबाईलचा नाद तू कायमचा सोडला पाहिजे, तुझ्यामुळे हा छोटासा मुषु पण बिघडत चाललंय हो ना!
मला वचन दे आज पासून मोबाईल मध्ये वेळ घालवणार नाहीस।
छोट्या गणुला आपली चूक कळून चुकली, माते! माफ कर! मी पुन्हा असं करणार नाही। आणि माझ्या सर्व छोट्या भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांना मोबाईल वेडापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन।
