हम दो हमारी एक
हम दो हमारी एक
ओटीत मुलगी टाकून तो तिला सोडून गेला कायमचाच..
त्याच्या अकाली मृत्यूने ती पूर्णपणे कोलमडून गेली होती, त्याच्या नंतर तिलाही असह्य विरहाने देहत्याग करावासा वाटत होता, पण निरागस बाळासाठी जगणं एकच कारण तिच्यापुढे होतं, जवळच्या नातेवाईकानी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. पण तिच्या ओटीतल्या त्याच्या प्रेमाच्या प्रतिकाला बापाची माया मिळेल का? दुसऱ्या लग्नानंतर त्या दुसऱ्या पतीची मुलं झाल्यावर या माझ्या छकुलीकडे दुर्लक्ष होईल, तिला तितकीच बापाची माया मिळणार नाही ही अनामिक भीतीच तिला दुसऱ्या लग्नापासून दूर नेत होती..
अचानक शाम तिच्या आयुष्यात आला, त्याला ती आवडू लागली, तिलाही त्याच्यावर विश्वास वाटू लागला, आवडू लागला..पण छकुलीचं कसं होईल या विचाराने ती अस्वस्थ होत होती, तिची घालमेल तोही जाणुन होता.
एक दिवस अचानक शाम तिच्या घरी रीतसर मागणी घालण्यासाठी आला, पण छकुळीसाठी तिचा नकार ठाम होता.
अचानक त्याने एक कागद तिच्या पुढे धरला, आणि लग्नाच्या मागणीसाठी हात पुढे केला. कागद वाचून अतीव आश्चर्याने तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
तिने कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, लग्नाला ती तयार झाली, तिच्या मनात त्याच्याबदल अमाप विश्वास, आपुलकी नि प्रेम निर्माण झाले..
त्याने (तिच्यासाठी नि छकुली साठी) स्वतःची नसबंदी केली होती..त्या हॉस्पिटलच्या कागदावर हम दो हमारी एक..असा मेसेज त्याने लिहून दिला होता
