देवमाणूस
देवमाणूस
नेहमीसारखाच नानानानी पार्क लहानथोर मुक्तपणे बागडणाऱ्या फुलपाखरांनी बहरला होता. सर्वच वयोगटातील लोकं तिथे येत असत.
तिथे अर्थपूर्ण असा सूचना फलक लावला होता,
खाली पडलेल्या सुक्या पानांवरून हळुवार चालत जा, उन्हात याच पानांच्या सावलीत तुम्ही निर्धास्त उभे होता!
सर्व आजी आजोबा गृप करून आपापल्या आठवणीत गप्पामध्ये रमलेले होते.
तिथे रोजच कोणासोबतही मिक्स न होता, एक आजोबा थोडेसे लंगडत का होईना आपल्या 5-6 वर्षाच्या नातवाबरोबर खेळत असत. नातूही अगदी लडिवाळपणे त्यांच्याशी गप्पा मारी, त्याला हवे तसे खेळ आपल्या लाडक्या आजोबांकडून खेळून घेई. खेळून झाल्यावर गोष्टी सांगण्याची वेळ आजोबांवर येई. माकडाच्या गोष्टी सांगताना आजोबा स्वतःच माकड असल्याचे हावभाव करीत, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतांना तर त्यांच्या अंगात महाराजच संचारत असत. लहानगा नातूही आनंदाने उडया मारीत गोष्ट ऐकत असे सोबत आजूबाजूला असलेले आजीआजोबाही रमून जात.
खेळून झाल्यावर व गोष्टीचा तास संपल्यावर रोजच तिथे गेटवर असणाऱ्या भेळपुरीवाल्याकडून आजोबा स्वतःसाठी ओली भेळ नि नातवासाठी कमी तिखट सुखी भेळ घेत असत.
मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचे तोंड पुसणार आणि बॅगेतून छोटीशी बाटली काढून त्याच्या तोंडाला लावणार. त्यानं पूर्ण पाणी पिल्यावर शिल्लक राहिलं तर एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडल्या गल्लीत अंधारात नाहीसे होणार.
त्यांचं ते निर्व्याज प्रेम आणि त्या नातवाच्या बाळलीला बघून बरेच जण तृप्त होत होते.
असेच रोजचा दिनक्रम चालू असे. फक्त नातू नि आजोबा !
मात्र काही दिवस आजोबा नि नातू दोघेही गायब झाले.
बाकीच्यांना मात्र त्या दोघांचीही अनुपस्थिती बेचैन करत होती, त्या दोघांचे खेळच त्यांच्यासाठी आठवणी नि करमणूक होती. जसं एखादं सुंदर कारंज अचानक थांबल्यावर किंवा एखादी गार वाऱ्याची झुळूक अचानक थांबल्यावर , एखादी सुरेल लकेर वरच्या पट्टीत गेल्यावर मध्येच रेडिओ खरखरल्यावर हमखास जस होत अगदी तस्स!
काही दिवसानंतर आजोबा एकटेच फिरतांना दिसले, नंतर आपला लाकडी पाय अलगत बाजूला काढून तिथेच एका बाकड्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी उदासी, कदाचित नावासाठीच असावी! त्यांना पाहून तिथल्या गृप मधील सर्वांना आश्चर्य वाटले. पायाबद्दल माहिती काढण्याच्या निमित्ताने एकाने पुढे येऊन विचारलेच, हे कधी झाले काका!
हलकेच हसून ते बोलले, 'मी आर्मीत असतांना युद्धात मला माझा एक पाय गमवावा लागला.' आणि बस्स! एवढीच जुजबी माहिती देऊन, लाकडी पाय लावला नि तिथे खेळत असलेल्या छोट्या मुलांकडे कौतुकाने पहात, थोडावेळ रेंगाळून रोजच्या सारखी भेळवाल्याने ऑफर केलेली भेळही नाकारून ते आजोबा निघूनही गेले.
स्वतःबद्दल जास्त बोलायला आवडत नसावे कदाचित! म्हणूनच गृप मधील जोशी काकांनी चौकशीसत्र हाती घेतले.
भेळवाल्याकडे मोर्चा वळवून जोशीकाकांनी, "एक सेवपुरी देना .. उसमे शेव कम डालनेका और कांदा थोडा जास्ती .. तिखट मेडीयम रखना " असं त्या भेळवाल्या भैय्याला सांगितलं.
"ही घ्या साहेब तुमची कमी शेव, जास्त कांदा आणि मध्यम तिखटाची शेवपुरी .. " त्याच अस्खलित मराठी ऐकून, जोशीकाकांच्या अस्तर लावून बोललेल्या हिंदीची लक्तरे टांगत होतं ..
"ते आजोबा नाही थांबले आज ... छान खेळतात रोज नातवाशी आणि भेळपुरी खातात तुझ्या गाडीवर ... त्यांचा नातू नव्हता नाही का आज बरोबर ?" जोशीकाकांनी अस्वस्थता बोलून दाखवली.
"तो नातू नाहीच त्यांचा साहेब ... समोरच्या वस्तीतला पोरगा आहे तो . .. सैनिक स्कुलला गेला काल तो .. एकदा चोरी करताना या आजोबानी त्याच्या बापाला आणि त्याच्या मित्राला पकडले .. प्रकरण पोलिसांत गेलं. घरची गरीबी बघून आजोबांनी केस मागे घेतली. त्याला चार चांगल्या गोष्टी सुनावल्या आणि पदरमोड करून त्याला सैन्यात भरती केलं. लग्न लावून दिलं, आणि वर्षाचा पोरगा मागे ठेऊन काश्मीरमधून तिरंग्यात गुंडाळून परत आला. सरकारी मदत जी मिळायची ती मिळालीच पण त्याची बायको आणि पोरगं वाऱ्यावर उघडे पडू नयेत म्हणून स्वतःच्या घरात घेतले. स्वतःच्या नातूसारखे त्याला आणि पोटच्या पोरीसारखे त्याच्या आईला जपतात .. आपल्या या लेकीचे आपल्या नंतर आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी चांगले स्थळ पाहून तिचे दोन दिवसांपूर्वी लग्न लावून दिले, आणि तिच्या लेकराला सैनिक स्कुल मध्ये घालून तिथल्याच होस्टेलवर ठेऊन त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करणार आहेत. आज दोघेही, लेक नि नातू लांब गेलेत म्हणून त्यांच्या आठवणीत हरवले होते आजोबा! पण कर्तव्यपूर्तीचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते."
"मग आजोबांच्या स्वतःच्या घरचं कोणी ... ?"
"रिटायर्ड कर्नल आहेत ते! हयात शत्रूशी लढत गेली सीमेवर .. शत्रूला डावपेचात मागं टाकण्याच्या विचारात संसाराचा डाव मांडणं जमलंच नाही ...
वडिलोपार्जित संपत्ती भरपुर असलेले, पैशाने श्रीमंत असूनही, मनाने अफाट श्रीमंत असलेले हे आजोबा, अजून पण सगळी पेन्शन आणि वेळ अशा या रुळावरून खाली घसरू लागलेल्या पोरांना सावरण्यात घालवतात. आपली वडिलोपार्जित संपत्तीचा काही भाग अनाथ मुलांकरिता अनाथाश्रम काढण्यासाठी खर्च केला. किंचितही दिखावा न करता, बरेंच काही लोककल्याणकारी कामं करीत असतात हे आजोबा!
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
करोना महामरीच्या काळातही हा देवमाणूस धावून आला होता. आधी ते सुद्धा करोनाच्या सावटातून गेले होते, तब्येत खूप खराब झाली होती त्यांची! पण म्हणतात ना, जो दुसऱ्यांसाठी चांगलं करत असतो, त्याचेही कुठेतरी चांगलंच होत असतं! लोककल्याणासाठीच या आजारातून ठणठणीत बरे झाले आजोबा!
वडिलोपार्जित संपत्तीचा काही भाग अनाथाश्रमासाठी खर्च करून उरलेला भाग त्यांनी या महामरीत लॉकडाउनच्या काळात खर्च केला.एनजीओ उभारून त्यांच्या मदतीने धान्याची पोती , गरिबांच्या दारात फक्त नेऊन ठेवत, कडी वाजवून बाजूला होत, जेणेकरून दारातल्या धान्याकडे त्यांचं लक्ष जावं. बस्स !कुठेही जाहिरात केली नाही की मदतदारासोबत फोटो नाहीत. फक्त निष्काम देशसेवा!
या पार्क समोरच्या देवीच्या मंदिरच्या बाजूला तो सदा हारवालाचे दुकान आहे, कधी भेटला असेल ना काका तुम्हाला, तो मंदिराबाहेर भीक मागून भिकाऱ्याचे जीवन जगत होता, सकाळी भिका मागूनही पोटाची खळगी भरत नव्हती, मग रात्री भुरट्या चोऱ्या करीत होता, या आजोबांनी भांडवल उभारून त्याला फुले हार विकण्यासाठी मंदिराजवळ एक खोपचा मिळवून दिला, आज तोच भिकारी आजोबांमुळे मानाने जगतो आहे. अश्या अनेक भरकटलेल्या तरुणाईला रुळावर आणण्यासाठी झटणारा हा देवमाणूस!
प्रसिद्धीसाठी खोटेपणाचा दिखावा करणारे राजकारणी नि स्वतःला समाजसेवक मानणारे कुठे! नि हे आजोबा कुठे! "
साहेब! हेच खरे समाजसेवक! खरा देवमाणूस!
"आजोबा तर कुणाशी काहीच शेअर करीत नाहीत! तर तुला इतके तपशीलवार कसे रे माहित?" जोशी काका.
"साहेब, तो चोरी करताना पकडलेला दुसरा पोरगा मीच होतो .. ही भेळेची गाडी त्याच देव माणसाने टाकून दिली ... आणि त्यांनी लॉकडाउन मध्ये चालू केलेल्या एनजीओ मध्येही मी होतोच. तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता." असे बोलून आजोबांच्या जाण्याच्या दिशेला नकळत त्याने हात जोडले.
तेव्हाच भेळवाल्याच्या रेडिओवर जगदीश खेबुडकर यांचे गाणे वाजले,
_धरमशाळंचं देऊळ झालं, चमत्कार झाला,
देवमाणूस देवळात आला !
या उजाड माळावरती माझ्या देवानं केली प्रीती,
फुलबागेचं रूप पाहुनी हरपून जीव गेला..
देवमाणूस देवळात आला !
गेला अंधार सरली रात, नारायणाचा फिरला हात,
दळिंदराच्या अंगावरती किरणांचा शेला..
देवमाणूस देवळात आला !
वस्ती-वाडी ही खुळी झोपडी, मायलेकरं ही येडीबागडी,
भगवंतानं भोळेपणाचा उद्धार लई केला..
देवमाणूस देवळात आला !
नकळत जोशी काकांनीही आजोबांच्या वाटेकडे पाहून त्या देवमाणसाला हात जोडले.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जागं होणारं बेगडी देशप्रेम, कुठतरी जोशीकाकांचे डोळे ओले करून गेलं...
