बाप्पाचं पत्र
बाप्पाचं पत्र
बाप्पा कडून आलेलं पत्र: गृहिणीसाठी
गौरीपुत्र गणेशा
कैलासधाम।
प्रिय सखी,माता, गृहिणी
पृथ्वीवरचे सात दिवस खूप मजेत गेले, माझ्या गौराईमाते सोबत आम्ही सुखरूप पोहोचलो घरी। खरं सांगू, साऱ्या भक्तांपेक्षा तुझी कष्टकरी प्रेमभक्ती भावली मला! कन्या, बहीण, सून, आई, सासू,आजी अशा अनेक रुपात तू वावरत असतेस म्हणूनच तुला खास पत्र लिहितो आहे
तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास! हा तुझा उत्साह मी याची हेही याची डोळा पाहिला. तुझी धडपड नि अविरत कामं नि मी येणार म्हणून पाळी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार.. माझ्या नजरेतून सुटले नाहीत. माझ्यासाठी नि माझ्या गौराईमातेसाठी पंचपक्वान्न, सोळा भाज्या, 21मोदक नि अनेक प्रकारचे मिष्टान्न नैवेद्य म्हणुन बनविलेस पण स्वतः उपाशी राहून शिळ पाकं खाऊन हसतमुखाने आमचे नि दर्शनासाठी घरी येणाऱ्या माझ्या भक्तांचे आनंदाने स्वागत करीत होतीस. कसं जमतं ग तुला?? स्वतःसाठी मिळवतेस का ग असा आनंद? आम्हाला जेवढा मान देतेस तेवढा मान स्वतःला देतेस का ग? दुसऱ्यांसाठी भरभरून देत असतेस, पण स्वतःच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी वेळ देतेस का ग?
तुझ्यात मी माझी माता गौराई पाहतो, म्हणून मलाच काळजी असणार ना तुझी! बरं! आता मात्र तुला माझं ऐकावंच लागेल! तुझ्या बाप्पाची आज्ञा समज हवं तर!
तू आधी स्वतःवर प्रेम करायला शिक! स्वतःचा आनंद उपभोगायला शिक, तू तुझे छंद जोपासून त्यातून आनंद मिळवं, स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम कर, घरकामं म्हणजे व्यायाम नाही ग! मित्रमैत्रिणींचा गृप बनव मस्त बाहेर हुंदडायला जा! बाहेरच्या आयत्या आवडत्या जेवणावर मस्त ताव मार!.. एक दिवस स्वतःसाठी जग! बघ किती मस्त वाटेल तुला!!
मला माहित आहे तू तुझ्या संसारात इतकी गुरफटून गेली आहेस की तू स्वतःसाठी स्वार्थी विचार करूच शकत नाही, म्हणूनच सारं घर तुझं ऋणी तू आहेस गृहिणी!
म्हणूनच माते! तू तुझं मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य जप!!
पुढच्या वर्षी मी येईन तेव्हा तुझं नवीन तेजाळलेल रूप नि आत्मविश्वास मला दिसला पाहिजे!!
आपलाच,
बाप्पा..
