शीर्षक शिक्षण
शीर्षक शिक्षण
ओल्या दुष्काळापुढे सर्वच शेतक-यांनी हात टेकले. इतका ढगफुटीसारखा पाऊस कधीच आला नव्हता. पांडूपण त्यातलाच एक शेतकरी. जसे अवर्षण, अतीवर्षण वाईट तसेच अवकाळी पाऊसही वाईटच. ह्या अवकाळी पावसाने भातशेती , ज्वारी , कापूस ,ऊस ह्या पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेली पिके गेल्याने पांडू रुक्मिणी हतबल झाले.
अवकाळी पावसाने नुकसान तर झालेच , पण मुलांच्या शिक्षणाचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न उभा राहिला.खरंतर अमितपेक्षा अस्मिता खूपच हुशार !! आता आपल्या शेतातील पीक गेल्यावर दुसरीकडे काही काम बघणे दोघांना जरुरीचेच वाटले. अगं तुझी धुण्याभांड्याची कामं अस्मिताला करु दे. एक बांधकाम निघतंय. तिथे करु दोघं काम. रखमाला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. ती कोणत्याही कामाला तयार असे पण अस्मिताला शाळा सोडून कामाला लावायचे म्हटल्यावर तिच्या डोळ्यांत पाणी तरारले.
" अगं प्रश्न रोजी रोटीचा आहे. बांधकामात बी पैसे पाडूनच देणार. आपण गरजवंत आहोत हे ते ओळखूनच आहेत. मला पण वाईट वाटतंय , पण माझा नाईलाज आहे गं!! " असे म्हणून पांडूपण रडू लागला.
आत्तापर्यंत शांत राहिलेली अस्मिता वडिलांना सावरत म्हणाली " बाबा रडू नका वो.मी पण आईची कामं करीन. एवढं मोठं संकट आल्यावर काय करायचं!!" वडिलांचे डोळे पुसून त्यांना धीर देणाऱ्या अस्मिताचे रखमाला खूप कौतुक वाटले." कशाला गं आमच्यासारख्या गरीबाच्या पोटी आलीस?" " अगं तुमच्याइतकं प्रेम कुठेतरी मिळालं असतं का मला? माजी माय ती" असं म्हणून ती आईच्या कुशीत शिरली.
पुन्हा उद्या उगवतंच असतो. नशिबाने दोघांना बांधकामावर कमी पैशात का होईना काम मिळाले.आईची कामे अस्मिता करु लागली. तिचा सगळा दिवस त्यात जाई. पोर दमली तरी संध्याकाळी आईला स्वयंपाकांत मदत करु लागली.
एक आठवडा झाला , तरी अस्मिता का येत नाही? बाईंना प्रश्नच पडला. पुढच्या सोमवारी संध्याकाळी त्य घरी आल्या. बाईंना बघूनच अस्मिताचा सारा धीर गळाला. ती हमसाहमशी रडू लागली .
तिने सर्व हकीगत बाईंना सांगितली.
तेवढ्यात पांडू आणि रखमा आले. पांडूने खालच्या मानेने "शाळेत न्हाई धाडता येत"" असे सांगितले.
बाईंच्याही डोळ्यांत पाणी आले. अस्मितासारखी हुशार मुलगी शिक्षणाला वंचित होते आहे , हे त्यांना सहन होईना.
चहापाणी झाल्यावर बाई म्हणाल्या " अस्मिताला शाळा वह्या पुस्तके फी पुरवतेच आहे.बाहेरची कामे करण्यापेक्षा मला घरकामात मदत करेल. माझ्याबरोबर शाळेला येईल. तिचे जेवणखाण डबा मी बघते. तिला चार ठिकाणी मिळणारे पैसे मी तुम्हांला देते, पण पोरीला शिकू द्या. खूपच हुशार आहे अस्मिता" बाई घळाघळा रडू लागल्या.
रखमा अन् पांडूला रडू आवरेना. रखमा म्हणाली " बाई तुम्ही ख-या गुरु आहात तिच्या. तुमच्यामुळे आज तिला शिकायला मिळतंय. तुमचे उपकार कधीच फिटणार नाहीत."
"अहो मला एकीकडे गुरु म्हणतायं आणि दुसरीकडे उपकाराची कशाला भाषा करताय!! प्रत्येक गुरुचे कर्तव्य असते, शिष्याला अडचणींतून मार्गावर आणण्याचे. मी फक्त माझे कर्तव्य केले. कर्ताकरविता परमेश्वर आहे "
अस्मिता बाईंना नमस्कार करुन म्हणाली " बाई परमेश्वर तुमच्या रुपाने भेटला मला. देव देवळात नसतो , गरजूंना मदत करायला तुमच्या रुपाने धावतो"
बाईंनी अस्मिताला थोपटले.जवळ घेतले.उद्यापासून सकाळी ९ वाजता ये घरी. आपण बरोबरच शाळेला जाऊ ".
