शीर्षक न फिटणारे ऋण
शीर्षक न फिटणारे ऋण
" अगं रखमे , तुझं डोस्कं कसं चालत न्हाई ? कर्जाच्या वेढ्यात अडकलोय मी. तुझ्या आग्रहापायी एका तरुण मुलाला कामावर ठेवलं आता तो पगार मागतोय. ह्या आ अवकाळी पावसानी पीक पार म्हणजे पारच गेलंय गं !! मला बी सुनीलची साळा बंद कराया नगं वाटतया, पनं काय करु? कुठून आणू पैसे साळंला?"
असे म्हणत विठू घळाघळा रडायला लागला.
रखमालाही अश्रू आवरेनात. इकडे आड अन् तिकडे विहीर अशी स्थिती झाली होती.विठूला सावरत ती म्हणाली " धनी रडू नका. बघू काहीतरी मार्ग निघेल ".
विठू म्हणाला "अगं आपली चार एकर शेती आहे.माझ्या हाताखाली सुनील तयार होईल. धाड त्याला रानाकडे मी होतो पुढं".
विठू रानाकडं गेला ,पण रखमाला ब्रम्हांडं आठवलं.कसं सांगायचं सुनीलला सारं? नशिबाने इतका हुशार मुलगा आहे पण काय होणार आहे कुणास ठाऊक ?
आज स्वारी झोपली होती खुशाल !! उठवायला गेलं तर चेह-यावर चांगलेच हसू फुललेले!! तिला गुलाबी स्वप्नातून उठवणेही जीवावर आले,पण प्रखर वास्तव समोर आ वासून उभे होते. स्वप्नांची दुनिया किती जरी छान वाटली तरी, त्याने पोट थोडेच भरते?
" अरे, सुनील उठ बाळा" तिचा स्वर सदगदित झाला.
अगं आई , मला काय भारी स्वप्न पडले"
त्याला वाटले आई म्हणेल
" काय भारी स्वप्न पडले आमच्या राजकुमाराला"
मग आपण छाती पुढे काढून सारे वर्णन सांगू पण.....आईची म्लान मुद्रा आणि डोळ्यांतील पाणी बघून तो खाडकन् सत्यात आला.
"अगं आई मी आहे ना !! तू कसली काळजी करतेस? मी तुला आणि बाबांना अगदी आरामात ठेवीन. मला काय स्वप्न पडले माहिती आहे का? मला 95% मार्क्स मिळाले आणि गुरुजी माझी पाठ थोपटत मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले.ते माझं कौतुक करत असतानाच तू मला उठवलेस!!"
"अरे, सगळी स्वप्नं खरी व्हायला फार नशीब लागतं बाळा!! एखाद्या श्रीमंत आई वडीलांच्या पोटी का जन्माला नाही आलास रे? तुझ्या बुद्धीचं.....तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सुनीलने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यांतील पाणी पुसत म्हणाला " एवढं प्रेम करणारे आई बाबा मिळाले असते का मला?" मायलेक हसू
लागले.
"अगं आई उद्या शाळेत फॉर्म भरायचाय आज शाळेत गुरुजींनी तुला बोलावलंय. चल आपण शाळेत जाऊ या"
आता पुढे काय करायचे हा प्रश्न डोक्यात घेऊनच रखमा त्याच्याबरोबर शाळेत गेली
वर्गापाशी येताच गुरुजींनी त्याची पाठ थोपटतच अभिनंदन केले."अरे , तुला 95% मार्क्स मिळाले. चला ,आपण मुख्याध्यापकांकडे जाऊन सांगून येऊ.सकाळी बघितलेले स्वप्न खरे झाले म्हणून दोघांनाही परमाननंद झाला . दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.सर्व खरी परिस्थिती रखमाने सरांना सांगितली.
ते तिघेही मुख्याध्यापकांकडे गेले. मुख्याध्यापक सर खूपच खूष झाले. त्यांनी सुनीलचे मनःपूर्वक अभिनंदन केले , तसेच कौतुक करताना त्यांचा कंठ सदगदित झाला. "सुनील तुझा आम्हांला सर्वांना खूप अभिमान वाटतो."
नंतर सरांकडे वळून म्हणाले "तुमची सोलापूरला बदली झाली आहे. मी रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केला . ह्यावेळची दहावीची बँच चांगली आहे.आली असती काही मुले बोर्डात ,पण शिक्षणाधिकारी ऐकायला तयार नाहीत हे फॉर्मचे काम पूर्ण झाले की दोन दिवसांनी तुम्हांला तिकडे रुजू व्हायचे आहे."
त्या दोघांना काही बोलायचे असेल तर आपण कशाला बसायचे? ह्या विचाराने सुनील व रखमा तेथून बाहेर पडले.आता तर सरांचाही आधार तुटला. सुनीलचे डोळे भरुन आले. दोघेही खालमानेनेच घरी आले.आलिया भोगासी असावे सादर ह्या न्यायाने सुनीलही शेतावर जाऊन वडिलांना मदत करुन आला. मूकपणानेच रात्रीची जेवणे झाली. बोलण्यासारखे आता काही उरलेच नव्हते.
तेवढ्यात दारावर टकटक झाली. परांजपे सर घरी आल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
सर म्हणाले "सुनील म्हणजे कोहिनूर हिरा आहे. तुम्ही भाग्यवान आहात ,तुमच्या पोटी तो जन्माला आला. माझे मुख्याध्यापक सरांशी बोलणे झाले आहे. तुमची दोघांची परवानगी असेल तर, मी ह्याला सोलापूरला घेऊन जातो.काहीतरी भागवून घेईन , पण इतका हुशार मुलगा ,तुम्ही शेतीमधे कृपया राबवू नका. हा शिकला तर,ह्याच्या बुद्धीचे चीज होईल. "
विठू आणि रखमाचे चेहरे उजळले. सुनीलही त्याचे स्वप्न खरे झाले ,म्हणून आशा लावून होताच. त्यांनी लगेचच संमती दिली.
दुस-या दिवशी जड मनाने सुनील मित्रांचा निरोप घेतो. सुनील हुषार , चुणचुणीत , उत्तम खेळाडू , दिलखुलास गप्पा मारणारा , त्यामुळे साहजिकच सर्वांचा लाडका , आवडता!! त्याला चांगल्या ठिकाणी शिकायला मिळतेय म्हटल्यावर सर्वांनी आपल्या भावना आवरल्या त्याला शुभेच्छा देऊन प्रेमळ निरोप दिला .
मुख्याध्यापक सरांच्या केबिनमधे आल्यावर , सुनीलला आपल्या भावना आवरल्या नाहीत.तो हमसाहमशी रडू लागला .
सर त्याला प्रेमाने थोपटून म्हणाले " अरे तुला शहरातली चांगली शाळा मिळावी, आहे त्यापेक्षा तुझी जास्त प्रगती व्हावी म्हणून मीच परांजपे सरांशी बोलून घेतले. सर खूप प्रेमळ आहेत. हुषार विद्यार्थ्यांना फक्त चांगले शिकवले म्हणजे शिक्षकाचे कर्तव्य संपत नाही. त्याला शिक्षणात काय अडचणी येतात हे पण पहावे लागते.यशस्वी हो. जा ,तुझ्यापुढे उज्वल भविष्यकाळ आहे.एक गोष्ट मात्र विसरु नकोस. मोठा झाल्यावर , आपल्या शाळेसाठीही काहीतरी करावेस असे मला वाटते. "त्यांचेही डोळे पाणावले.
जड अंतःकरणाने निरोप घेऊन दोघेही सोलापूरला आले. शाळेजवळच एक खोली मिळाली. रखमाने दिलेल्या कापण्या व चिवडा आल्यावर खात असत. आईने दिलेली शंभरची नोट सुनील सरांना पहिल्याच दिवशी देऊ लागला .
तेव्हा भावविवश होऊन सर म्हणाले "ही तुझ्या आईने काटकसरीतून दिलेली ठेव आहे. नोकरी लागेपर्यंत ही नोट खर्चू नकोस. नोकरी लागल्यावर आई-वडीलांना काहीतरी घेशील , तेव्हा ह्याची भर घाल."दोघांचेही डोळे पाणावले.
सुनीलला वाटले किती निःस्वार्थी आहेत सर!!आम्ही दोघेही एकच डबा खात आहोत, तरीही ह्यांनी पैसे घेतले नाहीत.आई-वडीलांनाच नंतर काही कर असे निस्वार्थीपणे सांगतायत.
काही दिवसांनी सगळे सुरळीत मार्गी लागले . एक दिवस सुनील डबा आणायला गेला तर , डबेवाल्याने दोन डबे दिले. सुनीलला आश्चर्यच वाटले
घरी आल्यावर त्याने सरांना विचारले .सर म्हणाले "अरे तुला सांगायलाच विसरलो . माझा महागाईभत्ता वाढल्याने आपण आता स्वतंत्र डबा खाऊ शकतो. दोघांच्याही चेह-यावर हसू फुलले.
सुनील एकएक पायरी सर करत पुढे गेला. प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून नियुक्त होऊन , समाजासाठी काहीतरी काम करायचे हेच ध्येय उराशी बाळगलेले!! ,त्यामुळेच भरपूर मार्क्स मिळूनही तो डॉक्टर /इंजिनियरिंगला गेला नाही. आज निकालाचा दिवस!!मनात खूप भावना उंचबळून आल्या. निकाल बघितला तर, घवघवीत यश मिळवून त्याचा पाचवा क्रमांक आलेला!! त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रुच आले.
आता आधी परांजपे सरांना भेटायला हवे. मधे खूपच काळ लोटला . सरांचे लग्न झाले. सुनीलही चांगल्या मार्कांवर स्कॉलरशिपवर पुढे गेला.
सरांच्या घरी गेल्यावर प्रथम त्याने सरांच्या पायावर डोके ठेवले .त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले ."सर , मी I AS
परीक्षेत पाचवा आलो. "त्याचा कंठ सदगदित झाला. तोंडून शब्द फुटेनात. सरांनाही भावना अनावर झाल्या. डोळ्यांत आनंदाश्रू दाटले.
"सर , तुम्ही होतात म्हणून जमलं सारं !!नाहीतर शेतीशिवाय मी काहीच करु शकलो नसतो."
"अरे ,कर्ताकरविता परमेश्वर आहे.आम्ही फक्त तुला शेतात राबू द्यायचे नाही असे ठरवले होते."आम्ही म्हणजे सर.......
"हो महत्वाचे सांगतो. तुला शिक्षणासाठी जे जे काही लागेल , ते सर्व मुख्याध्यापक सरांनी दिले. आपले एका डब्याचे दोन डबेही त्यांनीच केले. तुला आधी काही सांगायचे नाही अशी कडक तंबी मला दिलेली , त्यामुळे तुला आधी काही सांगू शकलो नाही.एका हाताने दिलेले दुस-या हाताला कळू नये ,इतक्या उच्च विचारांचे आपले सर. जा आता गावी जाऊन आईवडीलांची , सरांची
गाठ घेऊन ये."
सुनील गावी आल्यावर त्याचे प्रचंड स्वागत झाले.आईवडीलांना स्वर्ग ठेंगणा झाला. इतकी वर्षे केलेल्या कष्टांचे चीज झाल्यावर आनंद गगनात मावेना.
मुख्याध्यापक सरांचे आता वय झाल्याने , ते घरी झोपूनच असत. सुनील आल्यावर त्यांना परमानंद झाला व त्यांनी सुनीलला आनंदातिशयाने मिठीच मारली.
"आम्हांला माहितच होते , हे अनमोल रत्न इथे ठेवून उपयोग नाही. तुला शिकताना माझ्या मदतीचे ओझे वाटायला नको , म्हणूनच मी सरांना निनावी मदत करत राहिलो. ह्या जगात अशी खूप निःस्वार्थी माणसे आहेत , ज्यांना गाजावाजा न करता मदत करत असतात
सुनील भारावल्या स्वरांनी म्हणाला " सर तुमचे व परांजपे सरांचे ऋण कधीही न फेडता येणारे आहे.मी कायम आपल्या ऋणातच राहणे पसंत करीन.आपल्या शाळेसाठी ,हुशार मुलांसाठी मी नक्कीच मदत करीन.तुम्हीच शिकवलंय ना , घेता घेता एक दिवस , देणा-याचे हात घ्यावेत.