Pratibha Tarabadkar

Crime Thriller

3  

Pratibha Tarabadkar

Crime Thriller

सेल्फी भाग -१

सेल्फी भाग -१

4 mins
195


सेल्फी भाग -१


   मध्यरात्र झाली होती.सगळीकडे नीरव शांतता पसरली होती.अंधाराने आपले पांघरूण घरावर पांघरले होते.रॉकी आपल्या पलंगावर अस्ताव्यस्त पसरला होता.अधूनमधून त्याच्या घोरण्याच्या आवाजाने त्या नि:शब्द वातावरणाच्या पाटीवर ओरखडा उमटत होता.

   एकाएकी रॉकी अस्वस्थ झाला... खोलीत पाण्याचा लोंढा शिरला आहे,पहाता पहाता ते पाणी सर्वत्र व्यापून आपल्या पलंगावर चढलं आहे, नाकातोंडात पाणी शिरत आहे,आपण पाण्यात बुडतो आहोत आणि श्वासासाठी हातपाय मारत आहोत आणि तेव्हढ्यात... तेव्हढ्यात एक कवटी पाण्यातून वर येते आणि दात विचकून आपल्याकडे बघून भेसूर हसते....हीssहीsssहीsss

     रॉकी दचकून जागा झाला.त्याचे सर्वांग घामाने भिजून गेले होते.मागील काही दिवसांपासून त्याला हे स्वप्न पडत होते आणि रॉकी त्या भीतीदायक स्वप्नानंतर जागा होत असे.हे स्वप्न होते की भास की आणखी काही? नक्की कधीपासून या भयंकर स्वप्नाची सुरुवात झाली? रॉकी उठून बसला.हात लांब करुन त्याने सिगारेटचे पाकीट घेऊन एक सिगारेट पेटवली आणि तो विचारात मग्न झाला.समुद्रात सारा बुडाली त्यानंतर साधारण एक महिन्याने?

     सारा नक्की समुद्रात बुडाली की....?

     रॉकी 'टोमॅटो'कंपनीत घरोघरी फूड पार्सल पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयचं काम करीत असे.बाईकवर स्वार होऊन वेगाने रस्ता कापत जाण्यात त्याला फार थ्रिल वाटत असे.मुळात त्याची वृत्ती साहसी होती.एकदा त्याने सहज म्हणून बाईकवर उभं राहून ती चालवून, वेगवेगळे स्टंट करताना रील्स केली आणि 'किटकॅट'वर टाकली आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.तेव्हापासून तो वेगवेगळ्या साहसांची रील्स बनवू लागला आणि थोड्याच दिवसात लोक त्याला 'रॉकी द स्टार'या नावाने ओळखू लागले.अशा प्रकारची साहसं करणाऱ्या 'द अॅडव्हेंचर्स 'नावाच्या ग्रुपमध्ये सामील झाला.कधी गडकिल्ल्यांवर चढाई तर कधी धबधब्यांमध्ये उडी असे अनेक थरारक रील्स बनवून त्यांचा ग्रुप प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता.

     एकदा एका किल्ल्याच्या बुरुजाच्या भिंतीवर चढण्याचा पराक्रम करावयाचा होता.बुरुज ढासळण्याच्या स्थितीत होता.एका बाजूला खोल दरी होती.जरा जरी पाय निसटला तर कपाळमोक्ष ठरलेला.ग्रुपमधील कोणीच हे साहस करावयाला तयार नव्हते फक्त रॉकी आणि सारा नावाची मुलगी तयार

  झाले.रॉकी आणि साराने मन एकाग्र केले आणि बुरुजावर चढायला सुरुवात केली.मोडकळीस आलेल्या बुरुजाच्या निखळलेल्या विटांमुळे जी पोकळी तयार झाली होती त्या जागेत बोटं रोवून रॉकी आणि सारा चढू लागले.सर्वजण श्वास रोखून बघत होते.या अत्यंत धाडसी खेळाचं शूटींग सुरू झालं होतं.पडझड झालेल्या त्या बुरुजाच्या खबदाडींमध्ये बोटं रुतवत रॉकी आणि सारा एखाद्या घोरपडीसारखे चढू लागले.बघता बघता दोघेजण इच्छित स्थळी पोहोचले.श्रम आणि मनावर आलेला ताण याने त्यांचा ऊर धपापत होता बुरुजाच्या भिंतीवर उभे राहून त्यांनी सॅल्यूटची पोझ घेतली.टार्गेट पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.पूर्ण आसमंत दिसेल असा दोघांनी सेल्फी घेतला.पाच मिनिटांनी त्यांनी बुरुज उतरायला सुरुवात केली आणि बघता बघता ते जमिनीवर उतरलेही!सर्व ग्रुप भानावर आला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला.रॉकी आणि साराला कृतकृत्य वाटत होते.

    हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या साराबद्दल या प्रसंगानंतर रॉकीला जवळीक वाटू लागली.त्याने मनाचा हिय्या केला आणि साराला मेसेज केला,'j1 झाले का?'आणि धडधडत्या हृदयाने उत्तराची वाट पाहू लागला.

    साराचा ताबडतोब रिप्लाय आला,'माझं आत्ताच झालं,तुझं?'

    रॉकीने अंदाजाने टाकलेला खडा बरोबर लागला होता.तो खूष झाला.पुढे तासभर दोघांच्या मेसेजेसची देवाणघेवाण चालू होती.

    हळूहळू मेसेजेसवरुन संभाषण,मग एकमेकांना भेटणे या पायऱ्या भराभर ओलांडून ते एकमेकांच्या अतिशय निकट आले.

    जरी दोघांनी वाच्यता केली नाही तरी अशा गोष्टी पसरायला कितीसा वेळ लागणार?दोघेजण आता 'रिलेशनशिपमध्ये 'आहेत ही गोष्ट 'द अॅडव्हेंचर्स' मध्ये सर्वामुखी झाली होती.

     'रॉकी,आपण लग्न कधी करायचं?'साराने रॉकीच्या केसांत बोटं फिरवत लडिवाळपणे विचारले.

     'काय?'साराच्या अनपेक्षित प्रश्नाने रॉकी चमकला.थोड्या दिवसांची मौजमजा या दृष्टीने तो या रिलेशनकडे बघत होता.

     'हो रे,माझे मम्मी पप्पा माझ्या मागे लागले आहेत लग्न करण्यासाठी.मी आपल्याबद्दल सांगू का त्यांना?'

     रॉकी सटपटलाच !पण सावध पवित्रा घेत तो साराला म्हणाला,'नको,आताच काही बोलू नकोस, मी पैशांची थोडी जमवाजमव करतो,मग सांग.'

     'ओके, 'म्हणून सारा निश्चिंत झाली.

     साराच्या बोलण्याने रॉकी अस्वस्थ झाला.आज जरी काही तरी कारण सांगून वेळ मारुन नेली तरी सारा हा विषय परत नक्की काढेलच... तेव्हा तिला काय सांगायचं?

     रॉकी एक खुशालचेंडू तरुण होता.दिवसभर फूड पार्सल्सची डिलिव्हरी करायची, रात्री दारू बिरू.... आणि अधूनमधून 'द अॅडव्हेंचर्स'साठी रील्स बनवणे आणि साराबरोबर मौजमजा करणे यात त्याचे दिवस छान जात होते पण साराने मधेच लग्नाचा विषय काढून सगळाच विचका करून टाकला!

     रॉकीची भीती खरी ठरली.सारा लग्नासाठी त्याच्यामागे सतत तगादा लावू लागली.मेसेजवर,फोनवर, प्रत्यक्ष भेटल्यावर.... लग्न झाल्याशिवाय अंगाला हात लावू देणार नाही असे साराने त्याला बजावले होते.दरवेळी नवीन बहाणे शोधून रॉकी कंटाळून गेला होता.आता तर साराने त्याला धमकी दिली होती,जर एक महिन्यात त्याने निर्णय दिला नाही तर सारा सरळ पोलिसांकडे जाऊन रॉकीविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदविणार होती.ते ऐकून रॉकी पार हादरून गेला.काय करावे या विचारात तो कामातही चुका करू लागला.

     अशाच विनमस्क स्थितीत रॉकी बांद्रा बॅंड स्टॅण्डवर एका खडकावर येऊन बसला.आज कितीतरी दिवसांनी रॉकी निवांत,एकटा होता.इतरवेळी सारा सतत त्याला चिकटलेली असायची.सारा....गोचिड साली..... रॉकी तिच्या आठवणीसरशी पचकन् थुंकला.

     पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरण कुंद होते.खडकांवर जागोजागी प्रेमी युगुलं प्रेमालापात गुंग होती.समोर रौद्रावतार धारण केलेल्या समुद्राच्या उंचच उंच लाटा उचंबळत होत्या आणि किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या.काहीजण त्या लाटांपाशी येऊन चिंब भिजण्याचा आनंद घेत होती.

     रॉकीची नजर विस्फारली.तो डोळे फाडफाडून समोरचे दृश्य पाहू लागला.

     एक खडक समुद्राच्या आत होता.सभोवती सर्वत्र पाणीच पाणी असलेल्या त्या खडकावर एक जोडपं बसलं होतं.खवळलेल्या समुद्राच्या लाटा त्या खडकावर आदळत होत्या आणि वेगाने परतत होत्या.पाण्याच्या वेगाने खडकाभोवती पाण्याचा पडदा तयार होत होता.चिंब भिजलेले ते जोडपे उत्तेजित होऊन खिदळत होते.पापणीही न लवता कितीतरी वेळ रॉकी ते दृश्य बघत राहिला.

    हळूहळू अंधार पडू लागला होता.जोडप्यांची गर्दी वाढतच चालली होती.बॅंड स्टॅण्डच्या त्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरील प्रत्येक खडकाच्या खोबणीत एकेक जोडपे दिसत होते.रॉकी उठला आणि बाईकवर स्वार झाला.समुद्राच्या आत असलेल्या खडकावर बसून समुद्राच्या लाटा अंगावर झेलत खिदळणारे जोडपे रॉकीच्या डोळ्यासमोरून हलत नव्हते.तो खोलीवर आला आणि त्याने साराला फोन लावला.

    'हॅलो सारा....


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime