सावळ्या रंगात रंगले
सावळ्या रंगात रंगले
"हे हाय कल्लू.."
"काय काळे कशी आहेस..?"
असा हा रोजच्या जीवनात येणारा शब्द सकाळ सकाळी दररोज कानी पडायचा. इतकी आपुलकीने विचारपूस केल्या नंतर देखील ही माझ्या आंतरिक नाही तर बाहेरील वर्ण पाहून माझ्याशी संवाद साधला जात. कंटाळले होते मी, कोणालाही दुखवण्याचा स्वभाव नसल्याने तोंडावर जिथे च्या तिथे उत्तर देखील देता येत नसे. कामावर, रस्त्यावर, फिरतीच्या ठिकाणी, अगदी घरात सुद्धा ह्या वर्णामुळे मला काही गोष्टींसाठी कॉम्प्रोमाईज करावे लागत.
लग्न जमवताना खुप अडचणी आल्या. टेबलावर असलेला नाश्ता ज्याच कौतुक आलेले पाहुणे थकत नव्हते. एकाएकी मला पाहून मला तोंड कसं द्यावं असे वागत. कळवतो म्हणून निघून जात. म्हणतात की, काही पदार्थ बनवताना आपलं मन त्यात उतरत. मग माझ्या स्वभावाची गोडीची चव नसेल लागली का त्यांच्या जिभेला..?
चण्याच पीठ लाव, सतत पाणी पी त्याने ग्लो येईल, ही क्रीम लाव, तो फेस पॅक वापर, हे सगळं ऐकून आणि करून खुप खचले होते. का टिव्ही वर काळया रंगावरून उजळ होण्याच्या जाहिराती दाखवतात..? वर्ण कसाही असू दे त्या त्वचेला जपा अश्या जाहिराती का नाही..? चांगली नोकरी आणि सगळ नीट असूनही ह्या गोष्टीच एक सतत मानसिक दडपण होत मनावर. माझ्यावर सतत सगळे उपकार केल्यासारखे बोलत. मानसिक आधाराची उणीव भासत होती. पण तो देखील कोणाकडून घेणार. उलट मागून हसतील. त्या तणावामुळे तब्येत ही ढासळू लागली.
अश्यातच मला तो भेटला. माझ्या चेहऱ्यावर आलेल्या दुःखाला कदाचित ओळखलं असावं त्याने बहुतेक. स्वतःवर प्रेम कर आधी, हलकेच रागात बोलून गेला. बोलून नाही तर बिंबवून गेला. आरशात पाहताना स्वतःच्या नशिबाला दोष ठेवणारी मी आता आरश्यात पाहून स्वतःच मन पाहत होते. त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर खरा आतून ग्लो आला. कामात स्वतःला इतकं एकाग्र ठेवलं की ज्या मुळे कोणाच्याही बोचऱ्या शब्दांकडे लक्ष गेलं नाही. आणि अश्यातच मला "एम्प्लॉइ ऑफ द इअर" चा पुरस्कार मिळाला.
काही महिन्यांनी माझ्या स्वच्छंदी मनाला बाहेर खेचून काढणाऱ्या "त्या" ला जाऊन भेटले. बोलतानाही शब्दांची जुळवाजुळव करून बोलणारी मी, आज मला इतक्या आत्मविश्वासाने बोलताना पाहून तो ही चकित झाला. माझ्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली आज त्याने दिली. लग्नासाठी घरी येऊन मागणी घातली. इतक्या देखण्या रूपाचा जोडीदार कसा मिळाला मला, सगळ्यांना अजुनही हे कोडचं..! पण हाच तर फरक होता. त्याने माझ्या आंतरिक सौंदर्यावर प्रेम केलं. आज दोन मुलं आहेत आम्हाला. छान सुखाने नांदत आहोत. वळणावळणावर त्यांनाही आंतरिक सौंदर्याचे धडे देत आहोत.
न बाळगता तमा जगाची
मी माझ्यातच पार गुंतले...
उजळ रंगाचा अट्टाहास न करता,
सावळ्या माझ्या रंगात रंगले....