सारे काही तिच्यासाठी
सारे काही तिच्यासाठी
सारे काही "ती" च्यासाठी चपाती आणि नाती!!!!!
ती, ती आणि ती.... सारं घर जणू तिच्या तालावर नाचतेय. तिच्या शब्दापुढे जाण्याची घरातल्या कोणाचीही बिशाद नाही. तिचा दरारा आणि धाक होताच तसा. ती आमच्या घराची one woman army होती. थोरामोठ्यांवर तिची हुकूमत असायची पण आम्हा लहानांसाठी मात्र मायेचा अथांग सागर जणू. पण कडकं शिस्त म्हणजे शिस्तच असायची तिची, सगळ्यांसाठी एकच समानता व नियम असे तिथे विषमता, दूजाभाव नसे.
तुम्हीपण विचारात पडला असाल कोण ही आसामी ?
दुसरी तिसरी कोणी नसुन ही माझी आईची आई माझी आजी बडीआजी बर का !!!!
आजोबा पोलीस खात्यात होते. पिळदार शरीरयष्टी, भारदस्त व्यक्तिमत्व, डोळ्यात जरब, स्वच्छ, टापटीप राहणीमान. त्याकाळातील नटाला लाजवेल असे उमदे देखणे, कडक शिस्तीचे माझे आजोबा. आणि तशीच त्यांना शोभेल अशी सुंदर, सालस, शालीन, घरंदाज, कुलीन, सुस्वभावी, ठेंगणी ठुसकी माझी गोड आजी.
आजोबांच्या कडक शिस्तीच्या तालमीत तयार झालेली माझी आजी, पण फणसासारखी. वरुन काटेरी पण आतून गऱ्यासारखी मऊसुत, लुसलुशीत आणि गोड.
गळ्यात गळसरी, वजरटिक, मोहनमाळ, कानात झुबे, लवंगा, केसात आंबोडा त्यावर फुलांचा गजरा, पायात चांदीचे जाड पैजण, बोटात मासोळ्या, आणि खणाची साडी नेसलेली आजी पाहून आजोबांचा चेहरा विलक्षण खुलत असे. आम्ही त्यांच्या जोडीला आम्ही ऋषि कपुर आणि नीतू सिंग अशी फिल्मी जोडी म्हणंत असू. पण त्यांच्या समोर तोंड उघडायची भ्रांत होती. तिच्या डोळ्यातील धाका पुढेच आमचा थरकाप उडत असे. गावात आजोबांचा मोठा दरारा होता. तसाच दरारा आजोबांच्या माघारी तिने जोपासला होता. पण कडक शिस्तीच्या तालमीत तिने नव्या बदलांचे, सुधारणेचे पण सुयोग्य असे बदलही अंमलात आणले होते.
त्यातीलच एक म्हणजे स्त्री पुरुष समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. प्रत्येक गोष्ट प्रयत्नांच्या कसोटीवर तपासून मग ते अमलात आणायची.
आजीचा एकच फंडा होता की, प्रत्येकाला घरातील कामे ही आलीच पाहिजेत, मग तो वंशाचा दिवा असू दे नाहीतर पणती. सगळ्याना नियम एकच. *नवे चांगले बदल स्वीकारणे, पण जुने तेही सोन्यापरी जपणे.*
संसारात चपाती बनवायची आणि नाती जपायची एकसारखीच कामे असतात. पीठ नीट मळले की चपात्या छान फुलतात आणि नाती नीट जपली की फुलांसारखी फुलतात आणि सुगंध देऊन दृढ होतात. कुटुंब एक होते आणि संसाराची गोडी वाढते.
लहान असताना आजी आम्हा सर्व भावंडाना चपाती, भाकरी करताना जवळ बसवायची आणि शिकवायची. तिचे शिकवणे म्हणजे अमृताचा ठेवा जणू. खूप सुंदर आठवणी आहेत तिच्या. साधी चपाती सारखी चपाती. पण ती सुद्धा सुंदर, सुबक आणि नेटकी. प्रत्येक सुंदर कलाकृती निर्माण करता करता ती कृती शब्दातून, उदाहरणातून अशी छान समजावून सांगायची की, ऐकतच रहावेसे वाटायचे. ती म्हणायची हे बघा संसारात चपाती करायची तशी नाती पण जपायची. तेव्हा आम्हाला काहीच कळायचे नाही. आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहायचो आणि हळूच हसून ती म्हणायची, बघा चपाती बनवताना पिठाला कसं निगुतिने मळावं लागतं तसं घरातल्या सगळ्या माणसांनाही निगुतीने सांभाळावे लागते. पीठ मळायला घेताना मोठी परात घ्यायची आणि परातीखाली कापड ठेवायचे, कापड का माहिती आहे का परात घट्ट बसावी म्हणून, पीठ मळताना परात सरकू नये. मग परातीत थोडे पाणी घालून चवी पुरते थोडे मीठ घालावे. मग चाळणीने पीठ चाळून घ्यायचं म्हणजे कचरा चाळणीत वर राहतो. थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. मग सुके पीठ लावून परातीला चिकटलेले पीठ एकसारखे करून तेलाचा हात लावून घ्यावं. परात कशी लखलखीत दिसली पाहिजे आणि पिठाचा गोळा पण. मग तसच 5 मिनिटे पीठ झाकून ठेवले की चंगल्या मऊसूत चपात्या होतात. तवर चुलीवर तवा तापत ठेवायचा. एका वाटीत तेल घ्यायचे. पोळपाट, लाटणे घ्यायचे. चपातीचे छोटे छोटे गोळे करून एक एक लाटी लाटून घेऊन, तिला तेल लावून त्यावर सुके पीठ लावून तिचा त्रिकोण करून मग थोडे थोडे पीठ लावून गोलाकार लाटून घ्यावी. चपाती लाटताना जास्त दाब न देता हळूवार हाताने लाटावी लागते. मग हलक्याच हाताने गोलाकार चपाती उचलून अलगद तव्यावर टाकावी. चापतीवर छोटे छोटे भाजल्याचे फोड दिसले की चपाती पलटी करायची. मग दुसऱ्या बाजूने पलटी केली की तेल लावायचे. सारखी उलती पालती करायची नाही, जादा तेल लावायचे नाही. तिला अलगद टोपल्यात ठेवायची तिची वाफ काढायची, तिला निवू दयायची मंग डब्ब्यात मऊसुत कापडात तिला ठेवायची.
नात्याच बी तसच असतं. लगीन करुन सासरी गेली की पोरीला समद्यांची मन सांभाळावी लागतात. कुणाला काय हव, नको ते बघावं लागत. मोठ्या कुटुंबात तर नाना तरहेची, नाना स्वभावाची माणसे असतात. त्यांना नीट जपावं लागतं, मने न दुखवता सांभाळावी लागतात. स्वतःच्या मनाला मुरड घालावी लागते. परिस्थितीचे चटके सहन करावे लागतात.
चपाती सारखं नात्यातील माणसांना प्रेमाने एकत्र आणण्यासाठी तेलाचे मोहन घालावे लागते. कधी प्रेमाने तर कधी हक्काने पोळी सारखे हळूवार स्पर्श करत लाटावे लागते, कधी प्रेमाचे सारण भरून भाजावे लागते, भावनेच्या रेशमी कापडात नात्यांना चपाती सारखे प्रेमाने गुंडाळून ठेवावे लागते.
आणि हे समजलं का रे पोरांनो. आपली पोरगी सासरी गेली आणि लोकाची पोरगी सासरी आली तरी तिच्याशी नीटच वागायचं. भेदाभेद करायचा नाही.
स्त्री पुरुष समानता जपायची. तिचा मान ठेवायचा. अपमान करायचा नाही.
चला या आता गरम गरम चपात्या खायला या सगळ्यांनी.
तर अशी माझी बडी आजी. असे वाटतेय बडी आजी आज भिंतीवरच्या फोटोत बसून माझ्याकडे मिश्किल पणे बघतेय जणू.........
