चंपा
चंपा
जून महिना, पावसाळ्यासोबतच शाळांची लगबग सुरु होती. शाळेचा पहिलाच दिवस होता.नवा गणवेष, नवे दप्तर, नवी वहीपुस्तके,नवे मित्र सगळे काही नवे नवे.
नव्या जोशात शाळेत प्रवेश घेणारी मुले पालकांचे बोट हातात धरुन येत होती. काही चेहरे हसत होते, तर काही चेहरे भेदरलेले दिसत होते. नेहमीप्रमाणे नवीन नवीन चेहऱ्याची बागडणारी फुलपाखरे आवारात फिरताना दिसत होती. मुलांच्या येण्याने निर्जीव दगडी भिंती जणू बोलक्या झाल्या होत्या. पूर्ण शाळा जणू सजीव झाली होती. खूप छान प्रसन्नता वातावरणात भरुन राहुल होती.
माझा पहिलाचा वर्ग होता. शाळा प्रवेशव्दार सजवले होते. मुलांचे स्वागत करण्यात येत होते. बालवर्गात तीन चार तास बसणारी ही मुलं आता पूर्ण वेळ पाच, सहा शाळेत बसायचे तेही आई ला सोडून याच विचाराने घाबरुन रडत होती. काही तर दुसरा रडतोय म्हणून रडत होती. काही मात्र शहाण्या मुलांसारखी न रडता छान बसली होती.
गाणी गाऊन, नाचून त्याच्यात मी मिसळून गेले. हळूहळू रडणे कमी झाले आणि सगळी मुलं खेळू लागली, पण चंपा मात्र आल्यापासून एका कोपऱ्यात बसली होती, ती तशीच बसून होती काहीही न बोलता, जवळ बोलावले,पण चेहऱ्यावर हसू नाही की कोणताही भाव नाही. मी तिच्याशी बोलली, गप्पा मारल्या तशी कळी खुलली आणी चंपा बाई बोलू लागल्या, हसू लागल्या. मला तिचे हिंदी मिश्रित मराठी बोलणे ऐकून हसायला येत होते.ती मला सुनिताबाय म्हणायची, दिसायला गोरी गोमटी, नाकेली, बोलक्या डोळ्यांची चंपा, अनाथाश्रमात रहायची, पण स्वच्छ, टापटीप असायची.
दुसऱ्या दिवशी वर्गात आले तर सगळी मुले चंपा भोवती गोळा झालेली, हातात बाहुली घेऊन नाचत ती सगळ्यांसोबत खेळत होती. अभ्यासात गती होती, वाचन लेखनाची आवड होती. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चित्र सुंदर काढायची व उत्तम रंगसंगतीने पूर्ण करायची. इतरांना मदत करायची असेल तर सगळ्यात पुढे चंपाच असायची. सतत तोंडाचा पट्टा सुरुच असायचा. पहिल्या दिवशीची ती अबोल मुलगी चंपा ती हीच आहे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही.
हल्ली चंपा थोडी हट्टी झाली होती.सगळ्यांकडे जे जे आहे ते ते सर्व मलाही पाहिजेच असा तिचा हट्ट असायचा. त्यामुळे एखादी वस्तू तिने कोणाकडे पहिली आणि तिला आवडली की ती वस्तू तिच्या दफ्तरात मिळत असे.आश्रमात शाळेच्या लागणाऱ्या सर्व वस्तू वाटल्या जात असत, खाऊ, खेळणी कपडे सारे काही पण तरीही चंपा च्या मनात एक अतृप्ततेची भावना सतत डोकावत असे. तिला अनेकदा चांगले काय, वाईट काय याची समज दिली होती आणि देतही होते.
काल वर्गात तर तिचे वेगळेच रुप पहायला मिळाले, शेजारच्या मुलीने पेन्सिल दिली नाही म्हणून तिची वहीच फाडली. वाचायला पुस्तक दिले नाही म्हणून ते खिडकीतून बाहेर टाकले.
दिवसेंदिवस तिचा आक्रमक पणा वाढतच होता.
आश्रमातील ताई दादांना विचारल्या नंतर कळले की, महिना झाला तिला आश्रमात कोणीही भेटायला आलेले नाही इतरांचे पालक भेटून गेलेत.
तेव्हा समजले मुलांना शिकवण्यासाठी बाई झाले पण त्याना समजण्यासाठी आई व्हावे लागेल.
नकळतपणे न चुकता डब्यात रोज तिच्या साठी एक पोळी, तिच्या आवडीचा खाऊ मी ठेवू लागले. तिला वर्गाचा मॉनिटर केले, माँनिटर चा बॅच लावून चंपा बाई वर्गात मिरवायची, वर्ग शांत बसवायची, सर्व कामे जबाबदारीने पार पाडायची,
मला म्हणायची सुनिता बाय अच्छी. हा हा म्हणता एप्रिल महिना आला, परीक्षा झाल्या चंपा पास होऊन दुसरीत गेली. मला म्हणाली दुसरीत पण सुनिता बाय च पाहीजे. मुद्दाम हसतच मी म्हटले, चंपा या वर्षी मला खूप छळलस आता परत नको ग,
चंपा ने देवाची प्रार्थना ऐकली आणि सलग दोन वर्षे मला तोच वर्ग मिळाला आणि चंपा स्वभावाने खूप छान झाली.लाघवी, बोलक्या डोळ्यांची बडबडी मैना आता चौथीत शिकतेय, मागच्याच वर्षी अतिरिक्त शिक्षकांच्या यादीत माझा नंबर लागला आणि मला ती शाळा सोडावी लागली. मी शाळा सोडून जाताना ती खूप रडली होती, तिला जायचे कारण सांगूनही समजत नव्हते ते तिच्या आकलनाच्या पलीकडचे होते. डोळ्यात आसवांचा समुद्र वाहत होता आणि हात हातात घट्ट पकडून म्हणत होती सुनिता बाय अच्छी मुझे भूल मत.
फोन ची बेल वाजली, पलीकडून आवाज आला हलो सुनिता बाय तू कशी हाय, मला तुझी आठवण येते हाय . चंपाने वर्गात आलेल्या नव्या बाईंना माझा फोन नंबर देऊन फोन करायला लावला अशी ही चंपा.
खरंच तिला नाही विसरु शकत मी, आजही कायम मनात ठसून राहिली आहे चंपा दरवळणाऱ्या फुलासारखी.
प्रेमाने मी तिला चंपुडी म्हणायचे ........
