असा साधला संवाद
असा साधला संवाद
देव जरी मज कुठे भेटला,
माग हवे जे माग म्हणाला,
म्हणेन प्रभुरे, प्रत्येक जन्मी
शिक्षक होण्याचे भाग्य दे रे मला.
शाळा आणि मी जणू एकमेकींच्या जिवलग सख्याच. शाळा माझे जीवन, आणि शाळेतील माझे चिमुकले विद्यार्थी माझा श्वास. त्यांच्या शिवाय जीवन वाटे भकास. शाळा एक फुल बाग, मुलांनी बहरलेली. दरवर्षी इथे नवनवीन फुलपाखरे किलबिलणारी, आनंदाचा, उत्साहाचा खळाळता झरा जणू. अपार कुतूहल असणारा ओला मातीचा गोळा घडवू तसा घडणारा एक हाडामासाचा जिवंत गोळा. त्याला घडवता घडवता तो जीव मलाही घडवत जातो.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. इतर लोक ऑफिस मध्ये रोज निर्जीव फाईल सोबत रटाळपणे जीवनाशी झगडत नाईलाजास्तव काम करत असतात. आणि आम्ही रोज सजीव फाईल सोबत आनंदाने, उत्साहाने नाचून, गाऊन, नकळत जीवनाचा अभ्यास करतो आणि शिकण्याचा आनंद लुटत असतो. जीवनाच्या शाळेत आपल्याला रोज नवनवे चांगले, वाईट असे सगळे प्रसंग अनुभवायला मिळतात. पण इथे रोज नवनवीन प्रयोग करुन अनुभव देत, घेत मिळवत, स्वानुभुतीचा आनंद लुटत शिकायला मिळतात. मुलांवर आपोआप संस्कार होतात. घरी हट्ट करणारे मूल इथे शेअरिंग आणि केअरिंग करायला शिकतात. हळूवार मन जपायला शिकतात.
इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मागे वळून पाहता अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. अनेक प्रसंग डोळ्यासमोर सिनेमा सारखे रिळ उलगडू लागतात. काही प्रसंग छाप पाडणारे, काळीज पिळवटून टाकणारे, सुखावणारे तर काही डोळे मिटल्यावर अलगद पाझरणारे असे कितीतरी क्षण लाभले या शिक्षकाच्या जीवनात.
आजही कित्येक वर्षानी ती मुले भेटतात पाया पडतात, ओळखतात, शाळेतील आठवणी जागवतात तेव्हा तो मोठा पुरस्कार मिळाला असेच वाटते.
असाच एक प्रसंग इयत्ता चौथीच्या वर्गातील. मराठी चा तास सुरु होता. आईवर सुंदर कविता होती. "आईच्या कुशीत जगले निवांत, कधी ना भासली कशाचीच भ्रांत", आईच्या मायेत वात्सल्य उफाळे, हासत जगावे शिकविले तिने....
कविता चालीत गाऊन, तिचे रसग्रहण करुन शिकवत होती. सर्व मुले तल्लीन होऊन कवितेचा आशय समजून घेत होती. मुलामधून फिरताना सहज तिच्या कडे माझे लक्ष गेले. होय प्रणाली च होती. नेहमी उत्सवाचा आनंदाचा धबधबा असणारी, सर्वांना मदत करणारी, स्वच्छ टापटीप नेटनेटकी राहणारी, वेळेत अभ्यास पूर्ण करणारी शांत, सुस्वभावी प्रणाली कोमेजून गेलेली पाहून मन अस्वथ झाले. जवळ जाऊन प्रेमाने तिला कुशीत घेतले. आणि गालावर हात फिरवून विचारले, "काय झाले प्रणाली" कविता समजली नाही का? तुला कोणी काही बोलले का? मारले का? काही हरवले का ? मानेनेच नकार देत ती उत्तरली. बाई मला आई नाही.
तिच्या या उत्तराने ह्रुदयात कालवाकालव झाली. या आधी ती कधीच मला बोलली नव्हती की वर्गात मैत्रिणीला सुद्धा बोलली नव्हती. चटका लावणारा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला. तिला जवळ ओढून प्रेमाने पाठीवरून हात फिरवून म्हणाले, मी तुझी आई. डबडबलेल्या डोळ्यांनी गोड हसून तिने घट्ट मिठी मारली मला.
प्रणाली म्हणाली, बाई आई नाही मला, मी आणि माझी बहिण काकांकडे राहतो इथे जवळच बकरी अड्डा येथे. काका आमचे खूप प्रेमळ आहेत. ते आम्हाला आई ची माया देतात. आम्ही खूप शिकावे, मोठे व्हावे ही त्यांची इच्छा आहे. आज त्या दोघी बहिणी शिकून परदेशात स्थायिक झालेल्या आहेत आणि माझ्याशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आहेत.
30 वर्षांपूर्वी इयत्ता तिसरीच्या वर्गात सुंदर हस्ताक्षरा साठी एक उपक्रम राबविला होता. रोज परिपाठ झाला की 10 ओळी शुद्ध लेखन लिहिणे. शब्द चुकला तो 10 वेळा लिहिणे.मग ते तपासून मुलांना शाब्दिक शाबासकी देणे. एकही चूक नाही त्याला सार्वजानिक शाबासकी आणि फळ्यावर स्टार मध्ये नाव. घाणेरडे, अस्वच्छ लेखन त्याची वही जमिनीवर ठेवली जाई. मग यातून सगळेजण शाबासकी साठी धडपडत असत. परिणामी सर्वांची अक्षरे सुंदर,वळणदार, टपोरी व्हायची. 8 वर्षे हा उपक्रम राबविला होता.
आजही ती मुले, पालक भेटले की आवर्जुन उल्लेख करतात, बाई तुमच्यामुळे आमच्या वर अक्षर संस्कार झाला. कॉलेज मध्ये प्रोफेसर झालेली माझी विद्यार्थिनी मैथिली सावंत आठवणीने तिला मिळालेली सुंदर अक्षराची शाबासकी गर्वाने, अभिमानाने सांगते तेव्हा भरुन पावल्याचे सार्थक वाटते.
असाच एक प्रसंग मन हेलावणारा. योगेश अभ्यासात कच्चा पण मनाने सच्चा. खूप प्रेमळ इतरांना मदत करायला धावायचा नेहमी. सतत मागे लागून लागून, गोड बोलून, खाऊचे आमिष दाखवून योगेश अभ्यासात लक्ष घालू लागला होता. अचानक काय झाले काय माहित हळू हळू तो शांत, अबोल झाला. अभ्यास लिहायला सांगितला तर लिहायचा पण सारखे फळ्याजवळ जाऊन बसायचा. जवळ घेऊन विचारले काही बोलायचे नाहीत साहेब. खूप मुडी झाला होता. निबंधाच्या तासाला लिहायला वही दिली. शाळा सुटायची वेळ झाली तरी योगेश फळ्याजवळ घुटमळत होता. माझा संयंम सुटला आणि मी रागाने ओरडले, तसा थरथर कापत योगेश रडू लागला. किती वेळ झाला अजून लिहून झाले नाही तुझे. रडता रडता तो उत्तरला. मला अक्षर दिसत नाहीय. आईला भेटून विचारले असता समजले, बाबा काम सुटले म्हणून रोज घरी दारु पिऊन येतात. मुले रात्रभर झोपत नाहीत भीतीने. पालक संपर्क साधून पालकांना समजावले. मुलाच्या भविष्याची चिंता घडविण्यात आवश्यकता पटवून दिली. असे एक ना अनेक प्रसंग डोळ्यासमोर जणू मालिकाच उभी राहिली.
आणि म्हणूनच वाटते,
प्रत्येक मुल असते आगळे,
प्रत्येकाचे आभाळ वेगळे,
जितके असते ज्याचे बळ,
तितकेच त्याला मिळते फळ!!!
असा साधला संवाद आणि अनुभवांचा मांडला प्रवास
