जरा विसावू या वळणावर
जरा विसावू या वळणावर
भले बरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे आपण,
जरा विसावू या वळणावर , या वळणावर.....
इतकं सोपं होतं का घडून गेलेलं विसरुन जाणं. शक्यच नाही........ दीर्घ श्वास सोडत रोखून धरलेला सारा धीर उच्श्वासात पाक विरुन गेला.
विनू एकुलती एक लाडाकोडात वाढलेली, दुःखाची झळ नसलेली, शांत, सालस, मनमिळाऊ, प्रेमळ ...किती किती गुणवर्णने तिच्या विषयी सांगावी तितकी कमीच. अभ्यासात हुशार, चित्रकला, हस्तकला, शिवण,टिपण सगळ्यात निपुण बरं. नावाप्रमाणेच विनयशील विनया. प्रेमाने सगळे तिला विनू म्हणत असत. छोट्याशा खेड्यातील ही मुलगी शहरात जाऊन खूप खूप शिकण्याची स्वप्ने पहात असे. दहावीची परीक्षा झाली की शहरातील मोठ्या कॉलेजात शिकायचं व मोठी सरकारी नोकरी करायची हे तिचं स्वप्न होतं.
त्या दिवशी संध्याकाळी विनू शाळेतून घरी आली ती शांतच. रोज तिच्या चिवचिवाटाने अखंड घर दणाणून सोडणारी चिमणी आज शांत होती. आईच्या काळजाचा तर ठोकाच चुकला. पोटात दुखतंय इतकं सांगून बळेबळेच तिने आईची बोळवण केली होती.
पण वरवर काहीच झाल नाही असं दाखवणारी ही मुलगी आईशी काहीच बोलत नव्हती.
यंत्रवत न बोलता सर्व दैनंदिन व्यवहार करत होती. तिच्या वागण्यातील बदल तिच्या वर्गशिक्षिका राणे बाईच्याही लक्षात आला. त्यानी अभ्यासाच्या जादा तासांसाठी तिला उशिरा पर्यंत थांबण्यास सांगितले. ती नाही म्हणाली पण बाईच्या आद्देपुढे तिचे काही चालले नाही. जसजसा उशीर होऊ लागला तसतसा तिच्या मनात भीती वाढू लागली व ती रडू लागली. बाईंनी मायेने विचारताच तिचा बांध फुटला व ती ढसाढसा रडू लागली. थोड्या वेळाने शांत झाली व तिने मनात दाबून ठेवलेली गोष्ट कथन केली.
त्यादिवशी असेच विज्ञानाच्या सरांनी उशिरा पर्यंत थांबवले व घरी जाताना शाळेच्या शिपाया सोबत पाठवले. घरी जाताना वाटेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला व कोणाला सांगितलंस तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्या दिवसापासून अधून मधून तो मला त्रास देत असतो.
विनू च्या वागण्यातील बदलाचे कारण लक्षात येताच बाईंनी त्या शिपायांवर नजर ठेवून अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न करताना त्याला रंगे हाथ पकडले, व पोलिसांच्या मदतीने कायद्याची अंमलबजावणी केली व त्याला शिक्षा देऊन चांगलीच अद्दल घडवली. आता विनू पुन्हा पहिल्यासारखी झाली. पण कोणालाही कसलाच सुगावा न लागू देता बाईंनी मोठया हिकमतीने हे सारे घडवून आणले होते .
खरे तर मनावरचा हा ओरखडा पुसून विनू पुन्हा नव्याने उभी राहिली व जगात यशस्वी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली.
आता घडून गेलेले सार सार विसरुन ती या वळणावर स्थिरावली होती
मनात गाण्याच्या त्या ओळी रुंजी घालत होत्या जरा विसावू त्या वळणावर....
