प्रवास सुधाचा
प्रवास सुधाचा
ती सुधा. लहानपणापासूनच तशी भित्र्या, हळव्या स्वभावाची. सर्वजण तिला त्यावरुन खूप चिडवायचे देखील. तिची आई मात्र खूप मोठी डॉक्टर होती. आपल्या डॉक्टर आईचा खूप अभिमान वाटायचा तिला. त्याला कारणही तसेच होते तिची आई लेखी प्रसिद्ध डॉक्टर असूनही सर्वांशी मिळून-मिसळून हसून खेळून आहात असे तिच्या स्वभावामुळेच थोड्या दिवसात तिची आई एक नामांकित डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाली होती. आईला सुधाने नकळत्या वयात रात्री अपरात्री रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी धडपडणारी, तळमळणारी डॉक्टररुपी आई पाहिली होती. तेव्हाच तिने मनोमन ठरवून टाकले होते की, आपणही आईप्रमाणेच डॉक्टर होऊन रुग्णसेवा करायची आणि समाजातील दुःख वेदना दूर करायच्या.
पाहता पाहता कळीचे फुलात रूपांतर झाले आणि वयोपरत्वे सुधा मोठी झाली आणि भित्र्या स्वभावाची ती मुलगी ऑपरेशन करू लागली न घाबरता. आईप्रमाणे तीही रुग्णसेवा करण्यात गुरफटून गेली.
कधीकाळी लग्नाचे स्वप्न पाहिले होते तिने, आणि मनासारखा जोडीदार निवडला होता. तिचे ते स्वप्न नुकतेच सत्यात साकारले होते. तिचा पतीही तिच्याच व्यवसायतीलच होता. आणि त्यालाही रुग्णसेवेची आवड होती.
लग्नानंतर परदेशी फिरायला जाण्याचे स्वप्न डोळ्यांत नाचत असतानाच अचानकपणे घरात जगभरात आणि देशात कोरोनाच्या महामारीने आपले अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची रांग संपतच नव्हती, अथक रुग्णसेवा सुरू होती. सर्वत्र युद्धपातळीवर मदतकार्य सुरुच होते. सलग अनेक महिने न थकता अखंडपणे सेवेचा यज्ञ सुरुच होता. होमात समिधा जळत होत्या.
या सर्व कार्यात आनंदाची व जमेची बाजू ही होती की तोही तिच्यासोबत होता आणि या युद्ध क्षेत्रात कार्यरत होता.
कित्येक दिवस ते हॉस्पिटल मध्ये च रुग्ण सेवा करत होते, आणि अत्यावश्यक सेवा असल्यामुळे कित्येक महिने ते घरीही गेले नव्हते.
सततच्या कामामुळे दोघेही प्रचंड थकली होती, आणि आज विश्रांतीसाठी ते घराकडे निघाले. कोरोनाच्या संकटामुळे समाजधारणा बदलल्या होत्या. माणसातली माणुसकी संपली लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते स्वतःच्या पलीकडे जग दिसत नव्हतं. कालचीच गोष्ट ताजी होती, तिची सहकारी डॉक्टर घरी गेली तेव्हा तिच्या कॉलनीतील लोकांनी संस्कार विसरुन डॉक्टर मैत्रिणीला प्रवेश नाकारला होता. आता आपले काय होईल ? या विवंचनेत असतानाच गाडी कॉलनीत गेटजवळ आली.
प्रचंड थकवा आणि तिच्या डोळ्यावर ग्लानी आली होती. तिने गेट कडे पाहिले, समोर 10 जण विशिष्ट अंतर राखून उभे होते. आणि खिडकीतून सारे जण डोकावून पाहत होते.
गाडी पार्क केली व आम्ही दोघेही उतरलो, गेटवरचा वॉचमन पळत आला आणि नमस्कार करुन thank you डॉक्टर दिदी म्हणाला, आणि कडक सलाम ठोकत आनंदाने टाळ्या वाजवत होता. तेवढ्यात आमच्या वर काहीतरी पडले चमकून वर पाहिले आणि आश्चर्याचा धक्का बसला. सर्व लोक खिडकीतून गुलाब पाकळ्याची वृष्टी करत होते, काहीजण टाळ्यांचा, थाळ्यांचा कडकडाट करीत होते आणि आमचे डोळे अश्रुंचा अभिषेक करत होते...........
आणि सारे मास्कच्या आडून डॉक्टर सुधा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो हेच डोळ्यांनी सांगत होते.
