पतंग (आत्मवृत्त)
पतंग (आत्मवृत्त)


वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांतीचा म्हणजे माझ्या आनंदाचा बरं का । तसं पण संक्रांतीला दिवस कणाकणाने मोठा होत जातो व हळूहळू बोचऱ्या थंडीचा ताप कमी कमी होत जातो. मग मात्र निरभ्र आकाशी मी माझ्या नानारंगी व नानाढंगी मित्रांसोबत उंडारायला मोकळा होतो.
आज सारे जण गच्चीवर जमलेत बरं का ।।
अहो कशाला काय ? मला मुक्तपणे आकाशी विहरताना पहायला. पण पूर्वी सारखी आता खरं तर काहीच गंमत राहिली नाही. पूर्वी मकरसंक्रांत येण्या आधीच मला उडविण्याचे वेध लागून बालगोपाल मंडळी सोबत थोर पण सामील होत असत. फिरकी, मांजा सह एक्का, दुरंगा, तिरंगा, अभ्रक अशी माझी भावंडे आकाशात उतरत असू .
पंतग उडवणे, तो बदवणे, मित्रांशी स्पर्धा लावणे, त्यासोबत उडणे नाहीतर त्यापेक्षा अधिकाधिक उंची गाठणे, दुसऱ्याच पतंग काटने असे विविध प्रकारे खेळ खेळले जात होते पण त्यात मैत्री ची भावना असे. कुठेही खुनशी पणा नसे.
मैदानात, समोरासमोरच्या गच्चीतून हा आनंद लुटत असत.
अशाच उंच जाणाऱ्या पंतगाला मी म्हणालो, अरे उडताना कसं वाटतंय ? तो म्हणाला ठीक आहे रे उडताना खूप खूप भारी मजा वाटतेय रे पण एका गोष्टीचे मात्र वाईट वाटतंय रे. कशाचे ? अरे माझी दोरी दुसऱ्याच्या हाती आहे रे त्यामुळे मला त्याच्या मनात येईल तसेच उडावे लागतंय . तेवढ्यात जोराचा वारा सुटला आणि हाताचा हिसडा बसताच क्षणातच तो मोकळा झाला आणि अलगद तरंगू लागला. त्याला खूप खूप आनंद झाला . आनंदाने गिरकी घेत टाळ्या वाजवत तो चित्कारला, बघ मी स्वतंत्र झालो, आता मी माझ्या मनाप्रमाणे हवा तसा मनसोक्त उडण्याचा आनंद घेणार. मंद गतीने तो तरंगत राहिला.
शेजारी असलेला दुसरा पतंग म्हणाला, अरे थांब, आवर घाल, सावर स्वतःला. असाच स्वातंत्र करीत बसशील तर कुठेतरी रस्त्यावर, गच्चीत, घराच्या पत्र्यात, अडकून फाटशील, कचरा होऊन मातीत जाशील.
त्याला उपदेशाचे डोस आता नको झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा आनंद मिळतो आहे तो याला बघवत नव्हता म्हणून जळतोय माझ्यावर असे म्हणून त्याने चक्क दुर्लक्ष केले.
आणि थोड्याच वेळात तो सोसाट्याच्या वाऱ्यासोबत गरगर फिरत एका झाडावर लटकला. जर कुठे स्थिरावतोय तोच एक दगड कुणीतरी भिरकावला आणि तो चक्क फाटला की, दुसऱ्या मुलाने याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण तो खूप खूप फाटला मग त्या मुलाने त्याचा नाद सोडला.
म्हणून म्हणतो, माझ्या प्रमाणे आपल्या घराला कुटुंबातील लोकांना धरून रहा ,प्रेमाने तयांना बांधून ठेवा कधी कधी स्वातंत्र्याची ढिल देऊन आनंद उपभोगा पण स्वैर होऊन सर्व निर्बंध मोडून आपल्या माणसांची साथ सोडल्यास कटलेल्या पतंगा सारखी तुमची ही गत होईल बरं का !
पंतग उडवा, व संक्रांतीचा आनंद लुटा.
आपलाच पतंग