सापळा
सापळा


दिवसभरचा मेडिकल कॅम्प आटपून डॉक्टर राजेश आणि डॉक्टर होता ऋचा आपल्या घरी निघाले होते. कॅम्प माहूर गावात होता, डॉक्टरांना दुसऱ्या दिवशीचा कॅम्प किनवट गावात घ्यायचा होता, म्हणून संध्याकाळ पडता-पडता डॉक्टर राजेश आणि त्यांची पत्नी डॉक्टर ऋचा आपल्या होंडा सिटी गाडीने किनवटच्या दिशेने निघाले.
माहूर गडाच्या पाटलाने डॉक्टरांना विनंती केली रात्रीचा मुक्काम माहूरलाच करा. पाटलांनी सांगितलं किनवट जंगल फार बेकार आहे. रात्रीच्या वेळेस लुटालुट, कोण काही पण होऊ शकतो.
तरुण रक्ताचे डॉक्टर दाम्पत्य मंद हसून म्हणाले की, सकाळी ड्रायव्हिंग करत गेल्यावर दिवसभराचं काम करणं त्यांना थोडं जड जाईल, त्याच्यामुळे रात्रीच किनवटला जाऊन विश्रांती घ्यायची दोघांनी ठरवलं होतं.
पाटील अनुभवी होते, त्यांनी आपल्या दोन गड्यांना स्वतःची जीप घेऊन डॉक्टरांच्या मागे जायला सांगितले. पाटलांना माहिती होतं की वाटेतच काही वेडावाकडा प्रसंग आला तर परत कुठलाही डॉक्टर माहुर गावाकडे येणार नाही.
घाईघाईने दोन घास खाऊन राजेश आणि ऋचा आपल्या गाडीने किनवटच्या दिशेने निघाले. राजेश अतिशय दमल्यामुळे ऋचा गाडी ड्राईव्ह करत होती. त्यांच्यामागे पाटलांची जीप येत होती.
हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडायला सुरुवात झाली होती. रस्ता रिकामा असल्यामुळे ऋचाने गाडीचा वेग सत्तर ते ऐंशी किलोमीटरपर्यंत ठेवला, दोन अडीच तासात पोहोचायचं असं तिने ठरवलं होतं. काहीही झालं तरी दहाच्या आत हॉटेलवर पोहोचून झोपायचं असं दोघांनी पण ठरवलं होतं.
गाडी साधारण तीस किलोमीटरपर्यंत आली, आता किनवटचे जंगल लागलं होतं, ऋचा एकदम निर्धास्तपणे गाडी चालवत होते होती. रस्ता वळणाचा, पण रिकामा होता. मधूनच एखादा ट्रक किंवा एखादी बैलगाडी रस्त्यावरती दिसायची.
मध्ये मध्ये रस्ता रुंदीकरणाचेपण काम चालू होतं, तिला बराच आधार वाटला, की आपण एकटे नाहीत, पाटलांचे गडी पण त्यांच्याबरोबर होते.
आता किनवट फक्त एक तासावर राहिलं होतं, जंगलातली शांतता, काळा मिट्ट अंधार, आणि त्यांना चिरत जाणारा होंडा सिटीचा प्रकाश, आजूबाजूला उडणारे काजवे आणि वर दूरवर घरट्यात परतलेले पक्षी एवढाच आवाज येत होता. अचानक समोरच्या झाडावरून एक माणूस लटकलेल्या अवस्थेत खाली आला आणि ऋचाच्या गाडीला धडकला.
ऋचाने गाडीचा ब्रेक दाबला, गाडी वेडीवाकडी होत थांबली, गाडी माणसावरून गेली होती, मागे वळून बघितले तर त्या माणसाचे कपडे लाल रक्ताने भिजले होते. एक्सीडेंट झाला असं वाटून ऋचाने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि ती पडलेल्या माणसाकडे धावत जाऊ लागली, तिला गाडीतून खाली उतरलेले बघितल्यावर, पाटलांचा गडी धावतच आला, तिचा हात धरून त्याने तिला तिच्या गाडीत कोंबले, तिचा दरवाजा घट्ट लावून तो म्हणाला, ”डॉक्टर थांबू नका, एक सापळा आहे कोणी माणूस मेला नाहीये...” ऋचाला वाटले की आपल्या गाडीच्या धक्क्याने वरती लटकलेला माणूस मेला की काय?
झाडावरची आकृती गाडीवर धडकून खाली पडली होती, चेहरा काही दिसत नव्हता, पण डोकं मात्र लाल झालं होतं.
"गाडी थांबवू नका, इथे कोणी नसतं, हा एक सापळा आहे, बस तुम्ही किनवट येईपर्यंत थांबू नका." पाटलांचा गडी परत परत म्हणत राहिला, जशी ऋचाने गाडी सुरू केली, तसा तो पण आपल्या जीपमध्ये जाऊन बसला.
राजेश तर गाढ झोपला होता, डोळे चोळत म्हणाला, ”काय झालं? आले का हॉटेल? तू एवढे जोरात का ब्रेक दाबला?“
ऋचा काहीच बोलली नाही, अचानक लाईटच्या प्रकाशात दोन्ही बाजूनी येणाऱ्या चार आकृती दिसल्या, त्यांच्या हातात काठ्या, कुऱ्हाडी आणि सळ्या होत्या. ऋचाला दरदरून घाम फुटला, त्या आकृती जवळ यायच्या आत तिने गाडी सुरु केली आणि भर वेगात किनवटच्या दिशेने निघाली. चाळीस मिनिटापर्यंत ती तशीच गाडी चालवत राहिली.
हॉटेलचा बोर्ड दिसल्यावर तिने सुटकेचा निःश्वास टाकला.
हॉटेलच्या आवारामध्ये, गाडी बंद करून, ऋचाने स्टिअरिंगवरती डोके ठेवले, ती तशीच बसून राहिली.
हॉटेलचा मॅनेजर धावतच बाहेर आला कारण त्याला राजेश येणार हे माहीत होतं आणि कशासाठी येणार हे पण माहीत होतं. अतिशय आदराने त्यांनी ऋचा आणि राजेशचं स्वागत केलं. गाडीचा दरवाजा उघडून त्यांचं सामान बाहेर काढलं आणि त्या त्या दोघांना घेऊन तो त्यांच्या खोलीवर गेला. पाटलांची गडीमाणसं रात्रभर हॉटेलवरच राहिली, डॉक्टर सुखरूप आहे हे बघितले नंतरच माहूरला गेले.
ऋचाने राजेशला काहीच सांगितले नाही, दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राजेश आणि ऋचा यांनी किनवटचा कॅम्प सांभाळला. दिवसभर शेकडो पेशंट तपासून त्यांना योग्य तो औषधोपचार दिल्यानंतर, राजेश आणि ऋचा यांना अतिशय समाधान वाटले.
दिवसभर ऋचा जास्त काहीच बोलली नाही, तिच्या डोक्यातून मात्र रात्री घडलेला प्रसंग काही केल्या जात नव्हता.
किनवटचे पोलीस कमिशनर, संध्याकाळी राजेश आणि ऋचा यांना भेटायला आले. तेव्हा मात्र ऋचा गप्प बसू शकली नाही, तिने धडाधड काय झालं होतं ते पोलीस कमिशनर अजिंक्य इनामदार यांना कथन केलं.
माहूरच्या पाटलांची गडीमाणसं जर डॉक्टर दाम्पत्याबरोबर नसते तर कदाचित काहीतरी विपरीत झालं असतं.
अजिंक्य इनामदारांनी ताबडतोब चक्र फिरवली, दुसऱ्याच दिवशी रात्री, ते पोलिस फाटा घेऊन, ऋचाने सांगितलेल्या ठिकाणी गेले.
गंमत म्हणजे आज तिथे कोणीच नव्हते, सावज सटकले यामुळे दरोडेखोर सावध झाले होते. त्याच्यानंतर मात्र इनामदारांनी गस्त वाढवली. अमावस्येची रात्र नजीकच होती, आणि त्यादिवशी सापळा रचून इनामदारांनी सगळ्या दरोडेखोरांना ताब्यात घेतले.