Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Abstract Inspirational


2  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Abstract Inspirational


साहित्यक्षेत्रातील तेजोमय तारा

साहित्यक्षेत्रातील तेजोमय तारा

4 mins 110 4 mins 110

     विषमतावादी स्वभावाने केलेला अन्याय आणि या अन्यायाला प्रखरतेने लढा देणारे वैचारिक विद्यापीठ आणि ग्रामीण दलित साहित्य चळवळीतील तेजोमय तारा म्हणजेच कालकथित अशोक परसरामजी ढोले होय.एक बंडखोर आणि आंबेडकरी विचारांचा प्रचंड ऊर्जा/तळमळ असलेला कवी,साहित्यिक,आणि विचारवंत असलेला हा तारा वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१७ ला अचानक मावळला.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.


    समाजाप्रती प्रचंड आस्था असलेला आणि आंबेडकरी विचार नसानसात भिनलेले अशोक ढोले यांचे बालपण अगदी छोट्याशा गावात म्हणजेच तिवसा तालुक्यातील वरखेड या गावी गेले.अशोकराव यांचा जन्म हा साठच्या दशकातील.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर संपूर्ण भारत तसेच महाराष्ट्रवर या घटनेचे प्रतिसाद उमटले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आयुष्यभर मनुवाद्याशी निकराशी संघर्ष करित भारतीय राज्यघटनेच्या रूपाने समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.हाच समतेचा धागा पकडून महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारधारेने प्रेरित साहित्यिकांनी विशेषतःदलित साहित्यिकांनी विषमतेच्या विरोधात रणशिंग फुंकले.याच विचाराचा वारसा अशोकराव सारख्या साहित्यिकाने वरखेड सारख्या ग्रामीण भागातून चालविला.ग्रामीण दलित साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारधारेच्या प्रवाहाला गतीमान करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनच थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कृतीत सुद्धा उतरविले.आंबेडकरी चळवळीचा सच्चा कार्यकर्ता कशाला म्हणतात हे अशोक ढोले यांच्या जीवन संघर्षावरून आपणास सहज निदर्शनात येते.


    नवतरुणांना आंबेडकरी विचारधारेच्या प्रवाहात आणणे तसेच त्यांना योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडले.त्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन हा एक राजमार्ग आहे.परंतु उद्दिष्ट मात्र आंबेडकरी विचार पेरणे,तसेच भगवान बुद्धाचा समता,शांती आणि करुणा हा संदेश देण्याचे कार्य अशोक ढोले यांनी अखेरच्या क्षणापर्यंत केले.आपण हे कार्य करीत असताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे याची सुद्धा त्यांनी कधी तमा बाळगली नाही.घरावर तुळशी पत्र ठेऊन चळवळी साठी हा सच्च्या कार्यकर्ता तण,मन आणि धनाने आयुष्यभर राबला.संपूर्ण आयुष्यच त्यांनी चळवळीसाठी घालविले.शासकीय सेवेत असतानाही त्यांचे बँक खाते नेहमी रितेच राहिले.


    साहित्य निर्मिती आणि साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांचा जीव की प्राण होता.त्यांनी विविध कथा-कथने,चळवळी साठी प्रबोधनात्मक लेख आणि एक हजारांहून अधिक काव्याची निर्मिती केली आहे.शरीराने पूर्णपणे अपंग असतानाही कुठल्या साहित्य संमेलनात ते हजर नाहीत असे कधी झाले नाही.विविध साहित्य संमेलनात सहभाग आणि प्रत्यक्ष साहित्य संमेलन आयोजनात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे.त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण दलित साहित्य चळवळ मुंबई,मुख्यालय वरखेड या नावाने साहित्य चळवळीची स्थापन केली होती आणि त्याच चळवळीच्या माध्यमातून विविध दलित साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.त्यांच्या हयातीत १५ फेब्रुवारी १९८७ ला दुसरे दलित साहित्य संमेलन तिवसा येथे भरविले.संमेलनाध्यक्ष म्हणून प्रख्यात साहित्यिक सुधाकर गायधनी,उद्घाटक म्हणून दिलिप नानवटे उपस्थित होते आणि स्वागताध्यक्ष म्हणून डॉ.बी.आर.वाघमारे यांनी जबाबदारी स्वीकारली होती.दोन राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलने त्यांच्या मूळ गावी म्हणजेच वरखेडात भरविलीत.तिसरे दलित साहित्य संमेलन १४ फेब्रुवारी १९८८ ला वरखेड येथे पार पडले.संमेलनाध्यक्ष ताराचंद खांडेकर,उद्घाटक नेताजी राजगडकर तर स्वागताध्यक्ष दे.झा.वाकपणजर होते.चवथे दलित साहित्य संमेलन सुद्धा वरखेडलाच १० फेब्रुवारी १९९१ रोजी पार पडले.संमेलनाध्यक्ष म्हणून नामवंत साहित्यिक बाबूराव बागुल,उद्घाटक बाबा मोहोड तर स्वागताध्यक्ष म्हणून बाबासाहेब बोके होते.नामवंत साहित्यिकाना वरखेड सारख्या लहानशा गावात आणण्याची किमया शरीराने अपंग आणि विचाराने आणि मनाने संपग असलेल्या अशोक ढोले यांनी घडवून आणली होती.

    

वरुड तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेत कार्यरत असताना तेथेही त्यांनी समविचारी लोकांची एकत्रित मोट बांधली.त्यातूनच अक्षरज्वाला साहित्य मंचाची (१९९६) स्थापना केली.याच अक्षरज्वाला साहित्य मंचाच्या माध्यमातून ८ व ९ जून १९९६ रोजी शेंदुरजना घाट येथे पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण दलित साहित्य संमेलनाचे सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या आयोजन केले होते.संमेलनाध्यक्ष म्हणून शिवा इंगोले तर उद्घाटक म्हणून प्रख्यात साहित्यिक डॉ.भाऊ लोखंडे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून नीलकंठ यावलकर यांनी जबाबदारी स्वीकारली होती.अशा या ध्येयवेड्या साहित्यिकांनी दलित साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रातील नामवंत आणि दिगग्ज साहित्यिकाना गावपातळीवर आमंत्रित करून आंबेडकरी विचाराची सुपीक अशी पेरणी केली.साहित्यक्षेत्रात अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.आंबेडकरी विचारधारा हाच त्यांचा प्राण होता.त्यांच्या कविता किंवा काव्यसंग्रहातून हेच प्रतिबिंबित होते.

  

सन २००० च्या दशकात माझा त्यांच्याशी अत्यंत निकटचा संबंध आला.त्यांच्यातील आंबेडकरी चळवळी प्रती असलेल्या तळमळतेने मला सुद्धा प्रभावीत केले होते.कालांतराने माझ्यावर त्यांनी तिवसा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. तसेच सहाव्या राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव माझ्या समोर मांडला.मी सुद्धा त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला.पुढे संमेलनाच्या पूर्व नियोजनाबाबत समविचारी साहित्यिक,विचारवंत आणि कार्यकर्त्यांची तिवसा येथील यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रा.डी. एच.मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. बैठकीत सर्वाच्या संमतीने तिवसा शहरात संमेलन आयोजनाबाबत एकमत झाले.मे २००१ मध्ये दोन दिवसीय *सहावे राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलन* आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.संमेलनाध्यक्ष म्हणून प्रख्यात सत्यशोधक विचारवंत हरी नरके,उद्घाटक म्हणून तत्कालीन कॅबिनेट मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे तर स्वागताध्यक्षाची जबाबदारी तत्कालीन तिवसा पंचायत समितीचे सभापती दिलिप बालाजी काळबांडे यांनी स्विकारली होती.नियोजनानुसार संमेलनाची पूर्णपणे तयारी झाली होती.त्यासाठी सर्वानी अथक परिश्रम सुद्धा घेतले.परंतु आपसी आणि व्यक्तीगत महत्वाकांक्षेमुळे अचानक संमेलन स्थगित करण्याची वेळ आली.संमेलनाच्या स्थगितीने अशोक ढोले कधी नव्हे इतके दुःखी झाले होते.संमेलन स्थगितीचे शल्य त्यांना कायमच राहिले आहे !!!! तसे त्यांनी वारंवार बोलून सुद्धा दाखविले होते! कदाचित साहित्य संमेलनाची स्थगिती त्यांच्यासाठी नेहमीच वेदनादायक ठरली !!!


    शरीराने दिव्यांग असले तरी मन आणि मनगट हे एखाद्या तरुणाला लाजवेल असेच होते.उत्साह आणि चैतन्याचा झरा त्यांच्यात ओतप्रोत भरलेला होता.म्हणूनच त्यांनी आंबेडकरी चळवळी बरोबरच स्वतःअपंग असल्याने त्यांच्या वेदना त्यांनी स्वतः भोगल्या व अनुभवल्या म्हणून त्यांनी अपंग मानव उत्कर्ष सामाजिक व बहुउद्देशीय संस्था तिवसा आणि तिवसा तालुका अपंग कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांना हक्क आणि न्यायासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे."आमचा संघर्ष अपंग मानव उत्कर्ष" या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या ब्रीद वाक्यातुन सहज लक्षात येते.


    समविचारी सहकार्‍याच्या मदतीने १९९६ ला अक्षरज्वाला साहित्य मंचाची स्थापना केली. १९९७ ला जेव्हा प्रथम कन्यारत्न जन्माला आले तेव्हा स्वतःच्या अपत्याचे "ज्वाला" असे त्याच्या विचाराला साजेसे असे नामकरण केले.साहित्याची अक्षरे कशी असावी तर धगधगत्या ज्वालेसारखी असावी म्हणून जेव्हा १९९९ ला पुत्र प्राप्ती झाली तेव्हा मुलाचे नामकरण सुद्धा "अक्षर"असेच केले.असा हा साहित्यप्रेमी रसिक किंबहुना दर्दी माणूस,तनमनधनाने साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेला झंजावत म्हणजे अशोक ढोले.साहित्य क्षेत्र,समाजसेवा,अशा विविध क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांनी कधीही टीकेची पर्वा केली नाही.मात्र सर्वांशी जिव्हाळ्याचे अन सलोख्याचे संबंध आयुष्यभर जपले."माझे मी पण गळून जावे" या उक्तीप्रमाणे आयुष्यभर हे ब्रीद त्यांनी सांभाळले. 


  आंबेडकरी चळवळीच्या क्षितिजावर चमकणारा हा तारा अखेर ३१ डिसेंबर २०१७ ला वर्षाच्या अखेर पडद्याआड झाला.त्यांनी आरंभलेले महत कार्य इतरांसाठी आणि पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.त्यांच्या या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन.


Rate this content
Log in

More marathi story from प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Similar marathi story from Abstract