प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

2  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

आरंभबिंदू

आरंभबिंदू

7 mins
66


     एक कसदार,दमदार अन तितक्याच दिलदार मनाचा असलेला कवी प्रा.डॉ.अजय कृष्णराव खडसे (अमरावती) यांचा "आरंभबिंदू" हा काव्यसंग्रह साहित्याक्षर प्रकाशन संगमनेर, जिल्हा अहमदनगर द्वारा नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ.अजय खडसेचे हे पहिलेच साहित्यिक अपत्य असून "गुलदस्ता" काव्यसंग्रह तसेच "मराठी समीक्षा : वाटा आणि वळणे" हा समीक्षाग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.आरंभबिंदूत कवींनी साहित्यिक,शैक्षणिक,सांस्कृतिक राजकीय यासह समाजातील वैविध्यपूर्ण अंगांना स्पर्श करीत समाजमनाचा अचूकपणे वेध घेतला आहे.अर्थात मानवी जीवनाविषयीच्या विविध पैलूचा उलगडाच त्यांनी या काव्यसंग्रहातून केला आहे.

    डॉ.अजय खडसे हे नाव साहित्यक्षेत्रासाठी नक्कीच नवखे नाहीत.साहित्य पटलावर कधी काव्य सादरीकरणातून साहित्यिक रसिकांना कवेत घेणारा आणि मंत्रमुग्ध करणारा तर कधी सभा साहित्य संमेलनातून बहारदार सूत्रसंचालनाच्या माध्यमातून श्रोत्यांना साहित्याशी समरस करणारा हा व्यासंगी आणि अभ्यासू कवी कुणी बघितला/ऐकला नाही असा साहित्यिक विरळाच ! संघर्षमय जीवन पटलावर उत्तुंग भरारी घेऊनही समाजाशी अतूट नातं जपणारा हा कवी समाजमन तसेच साहित्य पटलावर गत तीन दशकापासून अधिराज्य करतो आहे.मानवी वेदनांना फुंकर आणि भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांनी झिजविलेली लेखणी हेच त्यांच्या यशाचे गमक असावेत.बेरोजगार,पत्रकार आणि वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक अशा वैविध्यपूर्ण प्रवासातही त्यांनी काव्य क्षेत्राचे बोट सोडले नाही.आपल्या या जीवन प्रवासात आलेले अनुभव जातीभेद, धर्मभेद,वर्णभेद व लिंगभेदाच्या दृष्टीतून न बघता सरसकट समाजातील दुःख,दैन्य,कष्ट, दास्य,अनिष्ट रूढी प्रथा परंपरा काव्यातून अचूकपणे मांडतानाच पुरोगामी चळवळीचा मागोवाही तितक्याच तळमळतेने घेतात.कवी जसे जगले, अनुभवले,अन दृष्टीत पडले तेच त्यांनी "आरंभबिंदू"तून व्यक्त केले.

     फुले,शाहू ,आंबेडकरी विचाराचा वरदहस्त असलेल्या कवींनी अरुण काळे यांच्या दिशादर्शक अन् प्रेरणादायी विचाराचा धागा पकडूनच वास्तव जीवनाशी निगडित काव्यरचनेवर त्यांचा अधिक भर दिसतंय.वेगळ्या धाटणीतील हा कवी विशिष्ट चौकटीत अजिबात रमताना दिसत नाही.म्हणूनच गझल सम्राट स्मृतिशेष सुरेश भट आणि अस्मितादर्शकार गंगाधर पानतावणे सारख्या नामवंत साहित्यिकांना डॉ.खडसेंची पाठ थोपटण्यासाठी हात आखडता घेता आला नाही.अशा या समाजाभिमुख कवीचा तब्बल तीन दशकानंतर "आरंभबिंदू" हा पहिलाच काव्यसंग्रह काव्य रसिकांच्या प्रांतात दाखल झाला आहे.आरंभबिंदू म्हणजे जणू काही त्यांची गत तीन दशकातील साहित्यिक तपश्चर्याच म्हणावी लागेल.प्रदीर्घ कालावधीतील चढ-उतार,सखोल चिंतन, मनन तसेच काळाच्या बदलत्या संदर्भानुसार त्यांची काव्यरचना प्रकटली असल्याचे काव्यसंग्रह अवलोकन करताना सहज दृष्टिपथात येते.ऑफलाइन ते ऑनलाइन अशा दोन्ही पिढीचे प्रतिनिधित्व त्यांची काव्यरचना करते.

    समाजाला काय हवंय हे कवी-लेखकाला समजलं,उमगलं पाहिजे आणि तेच त्यांनी काव्यात गुंफल पाहिजे.अर्थात त्यात समाजमनाचं प्रतिबिंबही तितक्याच दमदारपणे उमटलं पाहिजे.प्रगल्भ क्षमतेचा हा कवी त्या कसोटीत शतप्रतिशत खरा उतरला आहे.म्हणूनच तो स्वतःच्या अस्तित्वाच्या मर्यादेचे भानही तितक्याच नैतिकतेने ठेवतो.कविता ही आशयाची आगार असावीत.त्यात निव्वळ ओहोळाचे अन गढूळतेचे पाणी नसावेत.कवीची कविता ही आत्म-अनुभूतीतून प्रकटते.कवी "अस्तित्व" (पृ. क्र.८५) मध्ये व्यक्त होतात की,


 "तिच्याही कराव्या

 रागावून चिंध्या

 वाटल्याने मिंध्या

 आशयाने---"


"माझ्या कवितेत

आत्म - अनुनुभूती

 कशी पाळू भीती 

अस्तित्वाची------"

     सध्या सगळीकडे स्वार्थांध वृत्तीचा वनवा पेटला आहे.विज्ञान युगातही मनभेद,जातिभेद, धर्मभेद,लिंगभेद आणि वर्णभेदाला चिकटून राहणार्‍यांची संख्या काही कमी नाही.कवीला अशा व्यक्ती आणि व्यक्ती समुहाची प्रचंड चीड आहे.म्हणून कवी त्यावर जालीम उपाय शोधण्याच्या प्रवासासाठी निघाले आहेत."माझ्याविषयी" या कवितेत कवी म्हणतात की,


"हा आपला, तो आपल्यातला आपला 

असा भेद पाळणाऱ्याची मला येते चीड 

बुद्धीजीवी जनता-जनार्दनाची त्याच वाटेनं भीड 

त्याचाही येतो मला प्रचंड तिटकारा 

उपाययोजनेसाठी शोधतोय एखादा 

जालीम धर्मनिरपेक्ष उतारा---


    समाजाला सकारात्मक अशी योग्य दिशा देणे ही बुद्धिजीवी साहित्यिक कलावंत आणि प्रबोधनकाराची नैतिक जबाबदारी आहे.मात्र हा वर्ग त्या कसोटीत खरा उतरतोच असे नाही.आत्मकेंद्रित,संधीसाधू, स्वार्थी वृत्ती त्यास खरा अडसर आहे.ही वृत्ती कमी होण्याऐवजी दिवसागणिक अधिकाधिक बळावत आहे.प्रसिद्धी आणि नावलौकिकासाठी हपापलेली बरीचशी मंडळी कोणतीही सीमा पार करण्यास कधीही कचरत नाही.माणसाशी संवाद तुटला तरी चालेल मात्र स्वहित संवर्धनासाठी संबंधितांशी कायम सलगी जपणाऱ्याचे वास्तव चित्र कवींनी "झिरोबजेट" ( पृ.क्र.३६) मध्ये उत्तमरित्या रेखाटले.कुटुंबाची/स्वहिताची बाजू शाबूत अन सुरक्षित राखून समाज, संस्कृती,चळवळ,तत्त्वज्ञानावर भाष्य करणाऱ्यांची दुटप्पी भूमिकेची चिरफाड करतांनाच समाजासाठी विघातक ठरणाऱ्या अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून भावी पिढीनी कोणती प्रेरणा घ्यावी असा प्रश्नही उपस्थित करतात."सर,तुमच्यासाठी"

(पृ. क्र.७८) या कवितेत कवी व्यक्त होतात की,


 "सर, परिवर्तन विशिष्ट इझममध्ये

 जाऊच शकत नाही बांधल्या---

 लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत घेत 

तुम्हीच सडलेल्या जोंधळ्याच्या भाकरी

बुद्धीभेदाच्या तव्यावर रांधल्या--------


    काळा रंग म्हणजे वाईटाचा, निषेधाचा असं आपण मानतो.काळ्या रंगाला रुपक म्हणुनही आपण नेहमीच कमी लेखतो आणि वाईटाचे प्रतिक म्हणून दाखवितो.सगळीकडे काळ्या रंगाकडे बघण्याची दृष्टीच आपली नकारात्मक झाली आहे.कवी त्यास नक्कीच अपवाद आहे.वर्णद्वेष वा जातीद्वेष कातडीच्या रंगरूपावरून वा जातीच्या लेबल वरून श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविणे कवीच्या पचनी पडत नाही.हाच आचार-विचारातील दृष्टीभाव बदलासाठी कवीची धडपड दिसतंय."भेद" (पृ.क्र.६३/६४) मध्ये कवी उल्लेख करतात की,


 "एकदा नजरेखालून घाल

 नेल्सन मंडेलाचा इतिहास

अन साठवून घे डोळ्यात

 काळ्या पहाडतल्या 

अजिंठा- वेरूळच्या शिल्पाला 

मग तूच हिमालय होशील 

अन म्हणशील

सौंदर्य हे प्रत्येकाच्या दृष्टीत असतं----

     फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी भूमीतील मानवनिर्मित अनिष्ट रूढी,प्रथा परंपरेच्या उच्चाटनासाठी अनेक समाजसुधारकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेत.याच समाजसुधारकाचे बोट धरून अनेक पुरोगामी विचारांचा समूह अन नेतृत्वही पुढे आलेत.त्यांनी समाज परिवर्तनासाठी चळवळी केल्यात आणि करित आहे.परिवर्तन अटळ आहे असे म्हटल्या जाते.पण अपेक्षित यश का नाही या कारणांचा ऊहापोह कवी या काव्यसंग्रहातून करतात.समाज शिक्षित झाला पण मानव निर्मित अनिष्ट प्रथा परंपरेला चिकटून राहण्याची वृत्ती थांबली नाही.ही बाब कवी तसेच समाजासाठीही क्लेशदायी आहे.चळवळीचे कार्यकर्ते नेतृत्व करणारी मंडळी यास अपवाद आहे असे कुणी ठामपणे म्हणू शकत नाही.काळ बदलला पण माणसाची मानसिकता बदलली नाही." ही विज्ञान युगातली माणसं अशा भाकडकथांवर विश्वास का ठेवतात असं "कोड" कवीला पडते.म्हणून मानव जातीच्या समग्र कल्याणासाठी हे चित्र बदलण्याचा ध्यास कवींनी घेतलेला दिसतोय.परिवर्तन (पृ.क्र.५५),काडीमोड (पृ.क्र.५४),तुकारामास इत्यादी काव्यरचना ही बाब अधोरेखित करते.याच भूमिकेला "ढाचा" ( पृ.क्र.४८) या कवितेत कवी आपल्या भावनेला वाट मोकळी करून देतात.


 "आपल्याला बदलायचा आहे

 माणसानीच तयार केलेला

 हा कर्मकांडाचा साचा---

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत आलो

म्हणूनच व्यवस्थेचा बदलला नाही ढाचा----

     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन करून लाखो अनुयायांना बौद्ध धम्म दिला.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील धम्म प्रत्यक्षात रुजला असे ठामपणे म्हणणे धाडसाचे ठरेल ! धर्माच्या जागी धम्म आला पण परंपरा कायम ठेवल्यात.केवळ स्वरूप बदलले.आधुनिकता आणि विज्ञानाच्या कसोटीत धर्मा ऐवजी धम्मच श्रेष्ठच्या आभासात आपणही धर्मात कसे गुरफटत गेलो यांचा आढावा कवीने उत्तमरित्या घेतला आहे.धर्मातील हा बदल कवीला दृष्टीआड करता आला नाही.आपण धर्माच्या जागी केवळ धम्म आणून ठेवला.परंपरा कायम ठेवत केवळ स्वरूप बदलल.कदाचित आपण स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्यास मशगुल राहिलो ! राम राम च्या जागी जय भिम,भगव्याच्या जागी निळा,मंदिराच्या जागी विहार, संस्कृतच्या जागी पाली,भक्तांच्या जागी अनूयायी/उपासक, श्री/श्रीमतीच्या जागी आयुष्यमान/आयुष्यमती,सत्यनारायणाच्या कथे ऐवजी परित्राण पाठ,वैदिक पद्धती ऐवजी बौद्ध विधीने विवाह,स्वर्गवासीच्या जागी बुद्धवासी,तेरवीच्या जागी पुण्यानुमोदन,पंढरपूरच्या यात्रे ऐवजी दीक्षाभूमीवरील जत्रा झाली.एवढ्यावरच परिवर्तन मर्यादित झाले !!! कदाचित सकारात्मक प्रबोधनाऐवजी नकारात्मक प्रबोधन कारणीभूत ठरले !! आपल्याला प्रतिपरंपरा निर्माण करायच्यात की उत्क्रांती याचं उत्तर कवीसाठी अद्यापही गुलदस्त्यातच आहे.एकीकडे सर्वच परंपरेने करतायेत अन दुसरीकडे चळवळीतून बौद्धमय भारतासाठी लढतायेत.हा विरोधाभास कवी दृष्टिपटलावर आणतात.बाबासाहेबांना असा धम्म अपेक्षित होता का? असा प्रश्न कवीं उपस्थित करतांना आपण कुठे चाललो याकडे अंगुलीनिर्देश करण्यास विसरत नाही.जाती-धर्माच्या श्रुंखलाना लाथाडून समतेचा पुरस्कार करणारा धम्म स्वीकारला.डोक्यात बुद्धाचा विचार अन व्यवहारात निर्बुद्ध आचार असलेले याच धम्माचे अनुयायी आम्हीच इथले खरे सागवान,बाकी बागवान आडजात---अशा अविर्भावात समतेचा गजर करतात.म्हणून कवी "उदघोष"(पृ.क्र.१०१) मध्ये व्यक्त होतात की, 


"समतेचा उदघोष करणार्‍यांनी

 पहिल्यांदा 

आप-आपल्या बायकांच्या

 पोटजाती तपासाव्यात...

 तेव्हाच 

समता संगरात उतरावे 

तरच लोक विश्वास ठेवतील

 चळवळीच्या कार्यकर्त्यावर

 अन्यथा 

आपले ठेवावे झाकून 

अन दुसऱ्याचे पहावे वाकून...!


     बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांचे कर्तृत्व आणि विचारांना प्रेरणास्थानी ठेवून कवीची काव्यरचना पुढे सरकत जाते.कवींनी पुरोगामी विचारांची पेरणी करण्याचे व्रत स्वीकारले आहे.डॉ.आंबेडकर यांच्याच कर्तृत्वाने तत्कालीन महार आणि विद्यमान बौद्धाच्या अंधारलेल्या झोपडीत उजेड आला.डॉ. आंबेडकरांमुळेच लाखो दीन दुबळ्याच्या पंखांना उडण्याचे बळ मिळाले.समुद्राची दृष्टी लाभली.झोपडीतील माणूस आता सातासमुद्रापलीकडे जाऊ लागला.उच्च पदापर्यंत झेप घेऊ लागलेत.माणूस म्हणून नाकारलेल्या माणसांना माणूसपण बहाल करणारे बाबासाहेब आंबेडकर तळागाळातील जनमाणसापर्यंत अद्यापही पोहोचू न शकल्याचे शल्य कवीच्या काव्यातून व्यक्त होते.कवी म्हणतात की,


"भारतरत्न मिळालेल्या सूर्याचा उजेड

त्यांच्या घरापर्यंत का पोहोचला नाही 

त्याला देखील माझ्यासारखे का हसू दिलं नाही"


    कवी स्वतःला जात धर्म पंथ प्रादेशिकतेच्या मूशीत न अडकविता आपल्या काव्याला सर्वव्यापक आणि धर्मनिरपेक्षतेचे आवरण घालतात.त्यांच्या निधर्मी विचारांना हौतात्म्य मिळावे म्हणून कवी स्वतःच भुमिगत होतात. कवीला कालबाह्य व्हावी इथे गावकुस,समतेची वेस जोपासावी.. साऱ्यांनीच व्हावे इतके निधर्मी की कुणीही अधर्मी राहू नये अशी अपेक्षा ते बाळगतात.राजकीय प्रवृत्तीवर भाष्य करताना कवी म्हणतो की, लोकशाहीतील राजा कृतीत झारशाही अवलंबित असला तरी त्यायन आता हरेक पाऊल आता जपून टाकावं इथं म्हाणसाम्होरच झुकाव लागतं असा सूचक इशारा देतात.लोकशाहीत रंक-राव समान असल्याचा निर्वाळाही त्यांची कविता देते.

     जागतिकीकरणाने मानवी व्यवहारात आमूलाग्र असा बदल घडवून आणला.या बदलास कोणतेही क्षेत्र अपवाद ठरले नाहीत.अर्थात जागतिकीकरणाने संपूर्ण जगच मुठीत आणून ठेवलं आहे.असं असलं तरी जागतिकीकरणाच्या गंभीर परिणामकडे दुर्लक्ष करता येत नाही.कवीच्या शोधक दृष्टीतून ही बाब सुटली नाही. जागतिकीकरणाने अनिष्ट परिणाम आणि चंगळवादाला जन्म दिला.आर्थिक गुलामगिरीसाठी वाट मोकळी करून दिली.सेझच्या नावावर लाखो शेतकरी भूमिहीन केलेत. खाजगीकरणाने अनेकांचे जीवन प्रभावित झाले.काहींचे उध्वस्त झाले.स्वार्थांध वृत्तीने तर कळसच गाठला.या एकविसाव्या शतकात मतलबाशिवाय मुतायलाही कुणी बसत नाही ही कवीची धारणा शतप्रतिशत खरी आहे.संगणक क्रांतीने तर मानवी मेंदूच गहाण करून ठेवला आहे.मानवाच्या विचारक्षमतेला पंगू बनविले.कवी यावर भाष्य करताना "एकविसावे शतक आजचे तारखेनुसार" (पृ.क्र.३९ ) मध्ये म्हणतात की,


"मेंदूच्या मेमरीचा कॉन्फिडन्स झालाय लूज

ही तर जागतिकीकरणाच्या एकारलेपणाची

 म्हणावी लागेल सूज"


    कवींनी स्त्री मनातील सुप्त वेदनांनाही आपल्या काव्यातून वाट मोकळी करून देण्यास कसलीही कसर सोडली नाही. मासिक पाळी आली की तिला आजही काही ठिकाणी वेगळे बसावं लागतं.जे नैसर्गिकपणे येते तो प्रॉब्लेम कसा काय असू शकेल? पुरुषी अहंकाराच्या मानसिकतेतून आलेली ही बंधने स्त्रीला वेदना अन अस्पृश्यतेची वागणूक देणारी आहे.नेमकी हीच बाब कवींनी हेरली.घराची झाडलोट,सडा-सारवण,चहा, नाश्ता,जेवण,धुणीभांडी,ही सर्व कामे तिच्याकडून वर्ज्य नाही.कामूकता शमविण्यासाठीही तिची काही अडचण नाही.सगळ्याच कामांना तिचा स्पर्श चालतो मग तीच का ठरते अस्पर्श? ही असंख्य स्त्री मनातील वेदना कवींच्या काव्यातून व्यक्त झाली.कवी "खोडा" (पृ. क्र.४७) मध्ये व्यक्त होतात की ,


 "माझ्या विकासात जे-जे घालतात खोडा

अशा व्यवस्था-परंपरेला

लावला पाहिजे घोडा "


    डॉ.अजय खडसे यांच्या कवितेला हुडकायचा आहे आरंभबिंदू आदिवासी कुपोषित बालकाचा करकरीत भानहीन मेंदू, विधवेच्या कपाळावरील रणरणता उन्हाळा,साधव्याच्या मनातील कामूक घुसमट,सुंदर बायकांना नाईलाजाने आवडून घ्यावे लागणारे नोकरीवरील नवरे,तरुण पोरींना स्वप्नात येऊन छळणारा सलमान...... तिला नवता होता आलं पाहिजे..... त्यासाठी तिनं कोणताही छंद व्हावं.हेतू इतकाच की,हे अमानुष नाटक कायमचं बंद व्हावं......!

    डॉ.अजय खडसेच्या काव्य रचनेत प्रेमभाव आणि निसर्गही व्यक्त झाला आहे.सामाजिकता आणि विद्रोहाची भावनाही तितक्याच दमदारपणे व्यक्त झाली.त्यांची प्रत्येक काव्यरचना आत्मपरीक्षण आणि सामाजिक विद्रोहाला ऊर्जा देणारी तसेच समतेचा पुरस्कार करणारी आहे.एकंदरीत त्यांची काव्यरचना ही सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करते.अगदी सरळ सोपी भाषा आणि सर्वांना भावणारी आणि समजणारी आहे.मुक्तछंद,गझल,अभंग तसेच वऱ्हाडी भाषा उत्तमरित्या हाताळले आहेत.विशेष म्हणजे त्यांच्या काव्यात कसलाच कडवटपणा आणि कुठल्याच प्रकारचा पूर्वग्रहदूषितपणा नाही.म्हणूनच प्रत्येक काव्यरचना ही आपलीशी वाटते.

    "आरंभबिंदू"त एकूण ५२ काव्यरचनेचा समावेश असून मुखपृष्ठपासून ते मलपृष्ठपर्यंत केलेली मांडणी आकर्षक आहे.प्रा.डॉ.महेंद्र भवरे आणि प्रा.डॉ.अशोक थोरात यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना अंतरंग उलगडून दाखविणारी तर सरदार,उद्धव शहाणे डॉ. संजय बोरुडे यांची अंतरंगातील रेखाटने कवितेचा आशय स्पष्ट करणारी आहे.सरदार यांनी अर्थपूर्ण आणि आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे.एकंदरीत समाज मनाचा वेध घेणारा देखण्या स्वरूपातील हा काव्यसंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही. कवीला पुढील वाटचालीसाठी आणि सकस साहित्य निर्मितीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...


Rate this content
Log in