प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

3.5  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

मुक्त श्वास

मुक्त श्वास

10 mins
133


    साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे.साहित्यकृतीच्या माध्यमातून मानवी जीवनाचे अनेकविध पैलू प्रतिबिंबित होतात.त्यात मनुष्य आणि मानवी समूहाचे विविधांगी चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला जातो. साहित्यातून स्त्रीवादी जाणिवाही जिवंत केल्या जातात.जुन्या साहित्य प्रकारातील लोकगीतात, लोकसाहित्यात,संतसाहित्यात, आदिवासी साहित्यात आणि तदनंतरच्या काळातील आंबेडकरी साहित्यात स्त्रियांच्या सुखदुःखांचे अनेक पदर उलगडले आहेत.एनकेन प्रकारे बंदिस्त असलेली स्त्री कोणत्या उंबरठ्यावर उभी आहेत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि केला जात आहे.१९७० चे दशकात आणि त्यानंतरच्या काळात स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह हा कथा,कादंबऱ्या आणि काव्यात प्रगल्भपणे प्रतिबिंबित झालेला आहे आणि स्त्रीवादी जाणीवाचीही जोरकसपणे सुरुवात झालेली दिसतय.एकंदरीत स्त्रियांचे स्त्रीपण,तिच्यातील नैसर्गिक शक्ती,वैशिष्ट्ये अन अनुभव विश्व उलगडण्याच्या प्रयत्नला गती प्राप्त झालेली दिसतयं.त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे नव्या साहित्य पिढीतील अमरावतीच्या कवयित्री रत्ना यशवंत मनवरे यांच्या काव्य आविष्कारातून साहित्य विश्वात दाखल झालेला आणि स्त्री मनाचा वेध घेणारा " मुक्त श्वासांच्या शोधात " या काव्यसंग्रहाचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून त्यात स्त्री जीवनाचे अनेक पदर समर्पकपणे रेखाटल्याचे वेळोवेळी अनुभूती येते.त्यात वेगवेगळ्या धाटणीतील एकूण ८० काव्यरचना असून डॉ.युवराज सोनटक्के आणि डॉ.हबीब भंडारे यांची काव्यसंग्रहचे अंतरंग दृष्टी पटलावर आणणारी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना आहे.मुखपृष्ठ अरविंद शेलार,रेखाचित्र संजय ओरके यांनी रेखाटले असुन परिस पब्लिकेशन सासवड जिल्हा पुणे द्वारा हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.

   कवयित्री महाविद्यालयीन जीवनापासूनच काव्यरचनेचा छंद जोपासत आल्याचे निदर्शनात येतंय.तेव्हापासून ते आजतागायत सभोवतालील वातावरण,समाजात घडणाऱ्या घटना,स्त्रियांचे बंदिस्त जीवन अन उपेक्षा त्याच्या नजरेतून सुटली नाही.सोबतच पुरोगामी महापुरुष आणि महामाता/महानायिका यांच्या कार्यकर्तुत्वाचा त्यांच्यावर असलेला जबरदस्त पगडा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.म्हणूनच त्यांनी स्वतः जे अनुभवलेत,जे दृष्टीत पडले तेच त्यांनी जोरकसपणे काव्यात मांडलय.संवेदनशील मनाने सर्जनाचा शोध घेण्यासाठी लेखक आणि कलावंत धडपडतात अशी भावना कवयित्री अरुणा ढेरे ह्या व्यक्त करतात.तीच भावना कवयित्री रत्ना यशवंत मनवरे यांच्यात ओतप्रोत भरलेली असल्याची त्यांच्या काव्यरचनेवरून अनुभूती येते. प्रगल्भ स्त्री जाणीव,स्त्री संवेदना बरोबरच सामाजिक प्रश्न आणि समस्यावर सूचक असे भाष्य त्यांच्या काव्यातून येतंय.बंडखोर अभिव्यक्ती आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवणं ही त्यांच्या काव्य रचनेचं खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.सभोवतातील वातावरण आणि समाजमनाचं सूक्ष्म अवलोकन हे त्यांच्या काव्यरचनेचं बलस्थान आहे.त्यातूनच कवयित्री पुढील काव्यरचनेचा प्रवास मार्गक्रमण करीत असल्याचे दिसतयं.

    कवयित्रींनी महिला उन्नतीचा ध्यास घेतल्याचे दिसतय.समस्त स्त्रियांनी आपल्यातील अंतर्भूतशक्ती आणि कला कौशल्यांना ओळखून स्वतःचे कार्यकर्तृत्व सिद्ध करणे कवयित्रींना अपेक्षित आहे. त्यासाठी त्या स्त्रियांना महापुरुष/ महामता यांच्या कार्यकर्तृत्वाप्रती अवगत करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात.त्यांनी घालून दिलेल्या आदर्शला प्रेरणास्थानी ठेवून पुढील मार्गक्रमण करण्यासाठी प्रवृत्त करतात.आजवर पुरुषप्रधान संस्कृतीच्या दबावाखाली महिला ह्या येनकेनप्रकारे बंदिस्त राहिल्यात.घर,परिवार,सण- सणावार,उत्सव,चूल आणि मूल यातच स्वतःला गुंतवून ठेवण्यास धन्यता मानत आलीत.भारतीय संविधानाने ही सर्व बंधने संपुष्टात आणलीत आणि समस्त स्त्रियांना मुक्त श्वास घेण्याचा मार्ग सुकर केला.संविधानाने दिलेल्या अधिकाराना अनुसरून त्यांच्यात असलेल्या प्रचंड कार्यक्षमतेची जाणीव करून देण्यास कवयित्रीची काव्यरचना पुढे सरसावते.जन्म आणि मृत्यू तर अटळ आहे पण आपल्या जन्माचे ध्येय काय?आपल्या कर्माचे काय? असा प्रश्न उपस्थित करून माता सावित्रीआई,जिजाऊ, रमाई,अहिल्यादेवी,फातिमामाय इत्यादीच्या गौरवशाली कार्यकर्तृत्वाचा इतिहास अन ऊर्जादायी प्रेरक विचाराचा दाखला देत कवयित्री आपल्या मनोगतात व्यक्त होतात की,


" माझ्या सावित्रीचा जन्म शिक्षित करून गेला...!

 माझ्या जिजाऊचा जन्म शिवबा घडवूनन गेला...!

 माझ्या रमाईचा जन्म बाबासाहेबांना साथ देण्यात गेला...!

 माझ्या अहिल्याचा जन्म रितीरिवाज मोडून गेला...!

 माझ्या जन्माचे काय हा प्रश्न मला पडला ...!


   कवयित्रींना स्वतः बरोबरच महिलांच्या जन्माचे सार्थक काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.कारण विद्यमान स्थितीत महिला शिक्षित झाल्यात. उच्चपदस्थ झाल्यात.तरी सुद्धा अधिकांश महिलांना उपरोक्त महानायिकांच्या कार्यकर्तृत्वचे आणि त्यांच्या अनंत उपकाराची माहिती असूनही जाणीव नाही. त्याचे शल्य कवयित्रींना दिसतंय. अपार कष्ट आणि संघर्ष करून महिलांना प्रगतीचा मार्ग सुकर करणाऱ्या महानायिकांचा आदर्श दृष्टी पटलावर ठेवून समाज परिवर्तन आणि महिलांमध्ये आमुलाग्र बदलसाठी त्यांची कविता हाक देते.त्याच अनुषंगाने कवयित्री आपल्यातील थोडीशी रमाई,सावित्री,जिजाऊ,जागवून ध्येय निश्चित करण्याचे सुचित करते.

   कवयित्री पुरोगामी समाजसुधारकाबरोबरच विषम समाज व्यवस्थेच्या विरोधात जाऊन समाजात स्त्रीशक्तीचे अदभूत,अलौकिक,ऐतिहासिक ठसा उमटविणाऱ्या महानायिका सावित्रीआई,माँ जिजाऊ,रमाई फातिमा माय,अहिल्यादेवी यांच्यासह स्वतःच्या आईला प्रेरणास्थानी ठेवतात. त्या त्यांच्या कायम ऋणात राहू इच्छिते.हाच कृतज्ञता भाव म्हणून कवयित्रीनी त्यांचा हा काव्यसंग्रह उपरोक्त महानायिकांना अर्पण केला असावा.त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचा धागा पकडून कवयित्रीची काव्यरचना पुढे सरकत जाते.

   सावित्रीआईचे समस्त स्त्री जातीवर अनंत असे उपकार आहेत.ज्यांची कदापिही परतफेड करणे शक्य होणार नाही. विद्यमान स्थितीत स्त्रियांच्या अस्तित्वास आणि त्यांच्या प्रचंड यशास सावित्रीआईचा त्याग खऱ्या अर्थाने कारणीभूत आहे.अनेक बंधनाच्या जोखडात अडकलेल्या स्त्रियांना अंधारातून/काळोखातून बाहेर काढण्यासाठी सावित्रीआईने संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात पहिली शाळा काढली.स्वतःच अध्यापनाचे व्रतही स्वीकारले.स्त्री शिक्षणाची खऱ्या अर्थाने सावित्रीआईने मुहूर्तमेढ रोवली.प्रस्थापितांच्या प्रखर विरोधांला न जुमानता शेणा -मातीचे,दगडाचे वार झेललेत.प्रसंगी जीवही धोक्यात घातला.परंतु आपल्या ध्येयापासून तसूभरही मागे सरल्या नाहीत. उलट तितक्याच ताकदीने पुढे येत स्त्री शिक्षणाचा लढा अविरत कायम ठेवलात.म्हणूनच आजची स्त्री शिक्षित होत आहे.वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवित आहे.कवयित्रीना ही जाणीव नक्कीच आहे.हीच जाणीव समस्त महिला समोर ठेवण्याचा कवयित्रीचा आटापिटा दिसतंय.


" धर्माधाना धाडसाने दिली अग्नी

सर्वांसाठी लढणारी रणरागिणी

ना केली जीवाची कधीच पर्वा तू

सावित्री आई स्त्री शिक्षणाची जननी !"


(सावित्रीमाई पृ.क्र.२५)


   आजच्या प्रगत आणि वैज्ञानिक युगात महिला या अगदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत.स्वकर्तुत्वाच्या भरवशावर आकाशाला गवसणी घालत आहे. ज्या माऊलीच्या उपकारावर हे सर्व साध्य होत आहे त्या माऊलीच्या चरणी कवयित्री नतमस्तक तर होतेच शिवाय इतरांनाही प्रवृत्त करण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.


""लेखणीत माझ्या आले बळ 

लिहीली सावित्रीमाई तुझी गाथा

 तुझ्याच चरणी झुकत राहो

 इथल्या प्रत्येकाचा माथा"


(क्रांतीज्योती सावित्रीआई पृ.क्र.५३)


   फुले दाम्पत्याला आश्रय देणाऱ्या आणि सावित्रीआईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या,शिक्षणाचे व्रत स्वीकारलेल्या फातिमामाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसाही त्यांच्या काव्यातून व्यक्त झाला आहे.


" निर्भीडपणे भिडली संकटाला

 पळवून लावले समाजकंटकांना

 पेटवून शिक्षणाच्या मशालीला

 सलाम फातिमा तुझ्या कार्याला !


(ज्ञानज्योती फातिमा माई-पृ.क्र ३६ )

    कुठल्याही साहित्य प्रकारात आईची थोरवी गायिली नाही असा साहित्यप्रकार शोधूनही सापडणार नाही.मग कवयित्री त्यास कशा अपवाद ठरणार ! त्यांनी सुद्धा आपल्या काव्यातून आईची महती मांडलीच नाही तर सदरहू काव्यसंग्रहच "माय" ला अर्पण केला.यावरून त्यांची आई प्रति आस्था उजागर होते.आई म्हणजे एक निरंतर कविता आहे.तिला समजून घेणे खरोखरच अवघड आहे. माय म्हणजे त्यागाचा अन कारुण्याचा तुडुंब भरलेला सागर आहे.कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपल्या चिल्या- पिल्यावर जिवापाड प्रेमाचा वर्षाव करण्यास कसलीही कसर सोडत नाही.स्वतःचे दुःख ओठी न आणता सकल कुटुंबाला प्रेमाच्या धाग्यात गुंफून ठेवते.अंधारलेल्या भविष्यात झगडून उजेड पेरते.स्वतः डोक्यावर आभाळ धरून आपल्या पाखरांना मायेची ऊब देते.चिल्या-पिल्यासाठी सारं आयुष्य जाळते.खरोखरच तिची महानता ही शब्दापलीकडील आहे.तिचे मोलच अनमोल असल्याचा निर्वाळा माय, माऊली, आईची माया या काव्यरचनेतून व्यक्त होते.


"आईच्या मायेला ! 

नाही कुठे मोल 

आई आहे अनमोल ! 

 साऱ्या जगी ! 


" कष्ट दुःख भार ! आई सोसे सारं

ऊन पाणी वारं ! पेलवित !!


(आईची माया पृ.क्र.२७)


   पुरुष सत्ताक संस्कृतीत स्त्रियांना दैवताचं स्थान बहाल केलं आहे.(वास्तवात नाही) तिच्यातील माया,ममता, प्रेम, करुणा,वात्सल्य जिव्हाळा,आपुलकी, संवेदनशीलता, सहनशीलता,त्यागी/परोपकारी वृत्ती कुणीच नाकारणार नाही.पण वास्तवात ती कायमच उपेक्षितच राहिलेली आहे.घराबाहेर आणि घरातही सुरक्षित आहे असे आजही ठामपणे म्हणता येत नाही.कधी घरात,कधी त्या रस्त्यावर तर कधी सार्वजनिक ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या सतत बळी ठरते.चूल आणि मूल याच परिघात वावरणाऱ्या स्त्रियाना स्वातंत्र्याचा श्वास, स्वतःच्या निर्णयाचा ध्यास,स्वतत्व जोपासण्याची प्यास,स्वाभिमान आणि निर्धाराची कास जोपासू शकत नाही.कायम तिच्या वाट्याला फक्त दुःख यातना आल्यात.तिचे जीवन म्हणजे उपेक्षा,कनिष्ठ दर्जा कोंडमारा यातच त्या गुरफटल्या जातात.चुकीच्या समजूती, श्रद्धा आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या दांभिक प्रवृत्तीतून स्त्रियावरील जोर जबरदस्ती तसेच जुलूम केला जाते.लहानपणी वडिलांच्या धाकात,तरुणपणी नवऱ्याच्या ताब्यात व म्हातारपणी मुलांच्या तालावर कसरत करीत तिला जिणे जगावे लागते.तिच्या या वेदनेने नक्कीच काळीज फाटते.कवयित्रीच्या मते, स्त्री चळवळी आहेत पण त्या सुद्धा निष्क्रिय झाल्यागत आहे.अन्याय अत्याचाराची बळी ठरलेल्या तसेच जन्म देणाऱ्या देहाची मेल्यावरही तिची कुचंबना थांबत नाही,न्याय मिळत नाही,सन्मान मिळत नाही.केवळ दोन शब्दाची श्रद्धांजली, निषेध मोर्चा एवढीच काय तिच्या प्रति तळमळ आहे.स्त्री समस्या प्रती सजग असलेल्या कवयित्री मात्र स्त्रियांच्या व्यथा वेदना आणि गुलामगिरी विरुद्धच्या आक्रोशाला कवितेतून वाट मोकळी करून देते.स्त्रियांची न थांबणारी परवड काव्यातून मांडते.एवढं सर्व सहन करूनही अखेर तिला "अग्निपरीक्षा" देण्याची वेळ येते.कवयित्रीने ती उपेक्षित,वेदना, अग्निपरीक्षा इत्यादी काव्यरचनातून स्त्रियांच्या व्यथाचं व्यापक चित्रण करित नवी ओळख निर्माण करण्याचे "आव्हान" करते.


 उठ तू 

कला गुणांना दे आकार 

तुझ्या स्वप्नांना कर साकार

 परिवर्तन मशालीने मिटव काळोख

तुझ्यातल्या तू ला दे नवी ओळख !

तुझ्यातल्या तू ला दे नवी ओळख !


( ती उपेक्षितच ! पृ.क्र.२९)


   कुठपर्यंत अन्याय अत्याचार सहन करायचा.शोषणाला बळी पडायचं.आता थांबून चालणार नाही.स्वतःच "अस्तित्व" स्वतःच निर्माण करण्याचं "बळ" कवयित्री त्यांच्या काव्यातून देतेच शिवाय माथ्याला नाकारून मनगटावर विश्वास ठेवत मेहनतीच्या जोरावर प्रगतीचे शिखर पादाकांत करण्याची प्रेरणा त्यांची कविता देते.मुक्त श्वास घ्यायला प्रेरित करते.उंच भरारी, आवाहन,माणुसकी,नशिब या काव्यरचना त्याच धाटणीतील आहेत.

   भारतातील स्त्रीशक्तीतील महामाया,यशोधरा, सावित्रीआई,भिमाई,रमाई, जिजाऊ,अहिल्यादेवी, फातीमामाय आणि आधुनिक काळातील कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांचा वसा घेत अंतर्मनाला जागवून, आत्मसन्मानाला जागविण्याचे, हतबलता बाजूला दूर सारून शक्तिशाली होण्याचे,अभिमान बाळगण्याचे आवाहन कवयित्री करते.


" नित्य शोध घे स्वतःच्या अस्तित्वाचा 

आपल्या जीवनाचा हो शिल्पकार तू 

मुलगी म्हणून जन्मलीत, जपशील अनेक नाती 

माणूस म्हणून जग, इतिहासाचे पान तू "


(भारतीय स्त्री शक्ती पृ.क्र.५७)


   पिढ्यानपिढ्या चालत आलेला स्त्री पुरुषातील भेद अगदी आजही कायम आहे. पुरुषी दुटप्पी भूमिकेतच स्त्रियांच्या शोषणाचे रहस्य दडलेले आहेत.समाज वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत झाला मात्र मानसिक दृष्ट्या आजही तितकाच पंगु आहे.मुलगाच हवा या हट्टापायी स्त्रीभ्रूणाची गर्भातच हत्या केली जात असल्याचे सर्वश्रुत आहे.१९९० नंतरच्या वैद्यकीय उपचार क्षेत्रात नवनवीन शोध लागलेत हे शोधच स्त्रीभ्रूणहत्येस अधिक बळ देत असल्याचे कुणीच नाकारणार नाही.कवयित्री स्त्रियांच्या होणाऱ्या गळचेपीवर जोरकसपणे भाष्य करीत समाजाला अंतर्मुख करण्यास प्रवृत्त करते.मुलीला कसे दुय्यम स्थान दिले जाते हे ही सत्य "तो तोच असतो" या काव्यातून समर्पकपणे मांडते अन स्त्री-पुरुष समानतेची हाक देते.तिच्या सन्मानाची अपेक्षा व्यक्त करते.


"तो ती मध्ये समानता 

आता आली पाहिजे 

त्याने हात धरून तिला 

जगासमोर आणलं पाहिजे

त्यांनेच तिचा मान-सन्मान

केलाच पाहिजे...!


( तो तोच असतो पृ.क्र.४५)

    

    समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा,परंपरा,अंधश्रद्धा आणि कर्मकांड स्त्रियांच्या शोषणाला, त्यांच्या होणाऱ्या परवडीला खतपाणी घालते.त्यांच्या अभिव्यक्तीला अटकाव आणते.ही बाब कवयित्रींनी नेमकी हेरली अन काव्यात मांडली.वैज्ञानिक युगातही हजारो स्त्रिया कर्मकांड,व्रतवैकल्ये, उपास-तापास, देवऋषी,यांच्यात गुरफटलेल्या आहेत.अल्पशिक्षित बरोबरच शिक्षित महिलाही अंधश्रद्धेच्या,कर्मकांडाच्या अंधारकामय गर्तेत वावरतात. विवाहा नंतर कुलाचार, पूजा-अर्चा,नवस फेडण्याच्या नादाला लागतात.मानसिक आजार डॉक्टरांना सोडून गंडे-दोऱ्यात बांधते.अशा या काळात क्रांतीसुर्य उगवला आणि रूढी परंपरेच्या वेड्या झुगारून लावल्यात.त्यांच्या विचाराला अनुसरूनच समस्त स्त्री जातीला या गर्तेतून बाहेर काढण्याचा विडा कवयित्रीने उचललेला दिसतंय. ती उपेक्षितच,मानवता,नशीब, माणसातील पशु,क्रांती,ह्यात स्त्रियांचे अस्तित्व मांडते.


"रूढी परंपरेच्या काळोखात

 गडप झाले माझे अस्तित्व परंपरेला मातीत गाडत 

सिद्ध करत आले स्त्रीत्व !


"चूल-मूल रांधा वाढा

स्त्रियांचे आयुष्य बंदिस्त

 क्रांतीसुर्य उगवला भूवरी 

रूढी परंपरेचा झाला अस्त"


(अस्तित्व माझे पृ.क्र.२८)


   खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा अनिष्ट प्रथा परंपरांना मुठमाती देण्याचे आणि उन्नतीची,क्रांतीची मशाल पेटविण्याचे आवाहन कवयित्री आपल्या काव्यातून व्यक्त करते.

   कवयित्री वाचकाला बालपणीच्या आठवणीतही घेऊन जातात.मैत्री अन तारुण्यातील प्रेमाचे विविध भावही त्या उलगडतात.कधी कळणार तुला, प्रेम करावं,शब्दसखा,आठवणी, नाते,पहिली भेट,रम्य ते बालपण, अलवार क्षण,वैशाख,सखा गुलमोहर,पाऊस प्रेम आणि कविता या त्याच्या प्रासंगिक काव्यरचना आहेत.सोबतच वेगळ्या धाटणीतील प्रेमभावही त्यांच्या लेखणीतून अवतरते.


प्रेम हे

 बुद्धाच्या शांतीवर 

अशोकाच्या क्रांतीवर

 बाबासाहेबांच्या संविधानावर 

प्रेम करावं...!

क्रांतीच्या समतेवर

सावित्रीच्या ममतेवर 

फातिमाच्या शिक्षणावर

प्रेम करावं...!

 जिजाऊच्या समर्पणावर

 शिवाच्या त्यागावर 

मावळ्याच्या निष्ठेवर 

प्रेम करावं...!

काळ्या मातीवर 

राबणाऱ्या हातावर 

निस्वार्थ निसर्गावर 

प्रेम करावं...!


(प्रेम करावं-पृ.क्र.६५)


   कवयित्री रत्ना यशवंत मनवरे जनतेच्या हलाखीकडेही आवर्जून समाजाचे लक्ष वेधते.त्यांच्या लेखणीतून सामाजिक आशय, सामाजिक जाणिवेचे प्रकटीकरणही तितक्या ताकदीने आले आहे.सामाजिक,आर्थिक विषमतेतून समाजाची विदारक स्थिती त्यांच्या भेदक दृष्टीतून सुटली नाही.यातूनच त्यांची सामाजिक तळमळ अधोरेखित करते.त्यांच्या सूक्ष्म अवलोकनातून समाजाचे वास्तव लेखणीतून उमटते.देश महासत्तेची स्वप्ने बघू लागला परंतु सर्वसामान्याच्या भाकरीचे गणित अद्यापही सुटले नाही.याकडे लक्ष केंद्रित करते.त्यातच भौतिक सुखाच्या नादात माणूस माणूसपण विसरलात. भेद-भावाच्या इर्षेत माणसाचा श्वास कोंडला.जाती धर्म,पंथ वर्णाच्या भेदभावात तसेच गरिबी, दारिद्र्य,अन्याय अत्याचार, भ्रष्टाचार,स्वार्थीवृत्ती,दंगली लूटमार,स्वैराचार, विटंबना,दहशत,नीतीमूल्याचा ऱ्हास,अंधश्रद्धा,यातच सर्व सामान्यांचा श्वास कोंडला. कवयित्रींना यातून मुक्त श्वास घ्यायची आस लागलेली दिसतंय. त्यासाठी त्यांची लेखणी ही स्वातंत्र्य,समता,बंधुता न्यायाच्या स्थापनेसाठी पुढे सरसावते. भाकरीसाठी,माणुसकी, श्वास, गणित जीवनाचे,खंत,माझ्या जीवा, यात त्यांचे प्रतिबिंब उमटलेले आहे.समग्र परिवर्तन आणि समतेच्या लढ्यासाठी त्यांची कविता नक्कीच प्रवृत्त करते.


"धर्मासाठी नाही अन्यायाविरुद्ध

 एकजुटीने लढा रे लढा 

समतेच्या लढ्यासाठी 

उचल क्रांतिकारी विडा


( समानतेच्या लढ्यासाठी पृ. क्र. ६७)

   आईच्या महतीशिवाय कुठलंच साहित्य पुढे सरकत नाही.त्यातुलनेत चंदनाप्रमाणे झिजणारा बाप मात्र नेहमीच दुर्लक्षितच राहतो.कवयित्री मात्र माय बरोबरच कणखर पण हळवा बापही "बाप लेक" "बाप माझा" या काव्यातून रेखाटतो बळीराजाच्या व्यथा आणि वेदना त्याचे अहोरात्र कष्ट "माझ्या जीवा" तून मांडले. सोबतच निसर्गाप्रती असलेली आस्था ही त्यांच्या काव्यातून आली आहे.सोबतच कोरोनाची विदारक स्थितीही मांडते.महाराष्ट्राची महती अन दर्शन घडविते.

   भारतातील महानायिका/ महामाता बरोबरच समाज सुधारक आणि महापुरुषाचे कार्यकर्तृत्वही त्यांच्या काव्यात आले आहे.कवयित्रीनी त्यांना प्रेरणास्थानीच मानले आहेत. त्यांचाच विचाराचा वैचारिक वारसा जपत त्या एक पाऊल पुढे टाकत आहे.भारतातील विषमतावादी समाज रचनेत अडकलेल्या बहुजन समाजाच्या कल्याणासाठी भगवान गौतम बुद्धाचा मुक्तीचामार्ग,अष्टांगिक मार्ग आणि बुद्धाची शिकवण अंगीकारण्याचे सूचित करते. "बुद्धाची शिकवण" "बुद्ध कोरते" या काव्यातून बुद्धाची तत्वे अतिशय समर्पक शब्दात मांडलीत.क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले,अण्णाभाऊ साठे,छत्रपती शाहू महाराज,संत गाडगेबाबा यांचे लोकहितकारी कार्यही दृष्टिपटावर आणून त्यांचा वैचारिक वारसा पुढे रेटण्याचे पोटतिडकीने आव्हान करते. त्यांच्या अधिकांश काव्यरचनेत बुद्ध, फुले,शाहू आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसते.भारताच्या जडणघडणीत आणि समाज परिवर्तनाच्या लढाईत डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं अतुलनीय असं योगदान आहे.विद्यमान स्थितीतही त्यांच्या विचाराची तितकीच गरज ओळखून अधिकांश काव्यरचनेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी केल्याचे दृष्टी पटलावर येते.संविधान,ऋण, साथ भीमा रमाची,झेप,अमर्त्य, बळ,बाबासाहेब शोधते मी,ऋण, अस्तित्व माझे या काव्य रचनेतून प्रकट झाले आहे.


"जहरी विषमतेचे मुळे

उपटून फेकून दिले 

भीमा, आम्हास तू

झेप घेण्यास पंख दिले !


(झेप पृ.क्र.५१)


"कसे ऋण फेडू तुझे ?

 केले गुलामास मोकळे 

जागृतीची ज्योती पेटवून

 फुलविले असंख्य मळे "


(ऋण-पृ.क्र.७९)


   ज्या पोटतिडकीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर लढलेत ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणलेत.माणसाला माणूसपण बहाल केले.हक्क मिळवून दिलेत.गावकुसा बाहेरील झोपडीतील व्यक्ती समूहांना लढण्याचे "बळ" दिले. बाबासाहेबांचे "ऋण" फेडण्यास कवयित्रीची काव्यरचना पुढे सरकते.म्हणूनच कवयित्रीला बाबासाहेबांच्या विचारांची नशा करणारा आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठणारा/प्रखर विरोध करणारा अनुयायी अपेक्षित आहे.यावरून कवयित्रीची काव्यरचना ही बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे रेटण्याचे महत असे कार्य करीत असल्याचे दिसतंय.त्यांच्या काव्यरचनेतील स्त्री जाणीवाही आंबेडकरी विचाराला प्रभावित करते.

   शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक अन सम्यक विचाराची मशाल असतो.अंधारातून प्रकाशाकडे नेणारा अन प्रेमाचा निरंतर वाहणारा झरा असतो.त्यांचा हा शिक्षकाप्रती असलेला भाव आणि कृतज्ञता शिक्षक दिन या काव्यातून अधोरेखित होते.


    जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून भारत देशाचा उल्लेख केला जातो.लोकशाहीत "मतदार" हा खऱ्या अर्थाने "राजा" असतो. सध्याची ढासळती राजकीय परिस्थिती,नैतिक मूल्याचा ऱ्हास, नेत्याच्या खोटारड्या आश्वासनाची खैरात अन संधीसाधूपणा यामुळे सर्वसामान्य मतदार राजा नाडविला जात आहे.म्हणूनच दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी घसरत असल्याची विदारक स्थिती आहे. ही बाब लोकशाहीसाठी नक्कीच चिंताजनक अन घातक तसेच धोक्याची घंटा असल्याचे मत नोंदवत लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदाराना जागृत होण्याचे पोटतिडकीने आवाहन करते. 


"आता तरी व्हा जागृत मतदारांनी

 देशाच्या उपयोगी पडेल द्या निवडूनी

प्रलोभन देणाऱ्याला द्या हाकलूनी एकमताने ठेवा लोकशाही टिकवूनी "

 

( मतदान - पृ.क्र.७६)


    कवियत्रीने आपल्या दमदार लेखणीतून बुद्ध,शिव,फुले, शाहू, आंबेडकर,जिजाऊ, सावित्रीआई,भिमाई,रमाई, फातिमामाय यांच्या विचारांचा वारसा जपत काव्यातून सामाजिक आशय मांडला.चिंतन मननातून स्त्रियांचा संघर्ष तसेच व्यथा मांडत स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांना प्रगतीचा मार्ग सुकर करतात.स्वतःचे अस्तिव स्वतःच निर्माण करण्याची जाणीव आणि ताकद देते.स्त्रीवादाशी निगडित हा काव्यसंग्रह सर्वच बंधने तुडवीत स्त्रियांना "मुक्त श्वासाच्या शोधात" घेऊन जाते.कवियत्रीचा हा प्रामाणिक प्रयत्न सर्वाच्याच पसंतीत नक्की उतरेल आणि स्त्री उन्नती/स्त्री मुक्तीसाठी मैलाचा दगड ठरेल याची मला पूर्णपणे खात्री आहे.


Rate this content
Log in