Archanana Borawake

Romance Inspirational

3  

Archanana Borawake

Romance Inspirational

रंग_प्रेमाचे

रंग_प्रेमाचे

5 mins
204


      ऑफिस सुटताच नेहा लगबगीने निघाली.... आज व्हॅलेंटाइन डे! सौरभ बरोबर कुठे तरी मस्त डिनरला जावे का?नाहीतरी तो आजकाल खूप बिझी असतो... माझ्याकडे बघायलाही त्याला वेळ नसतो.... पण सासू सासरे घरात आहेत.. त्यांना काय सांगणार? त्यांना आवडेल का असं व्हॅलेंटाइन डे साठी बाहेर गेलेलं?..... त्यापेक्षा मी जाताना सौरभसाठी गुलाब आणि केक घेऊन जाते...अजून काही तरी ऑर्डर करीन . रुम मधेच करू सेलिब्रेशन! "

 स्वतःशीच विचार करत ती तिच्या टू व्हीलरवर स्वार होऊन निघाली.


            संध्याकाळचं ट्रॅफिक आणि थोड्या-थोड्या अंतरावरील सिग्नल यामुळे तिला गाडी संथपणे चालवावी लागत होती...दुकानं आणि हॉटेल्सच्या दर्शनी भागात लाल रंगाचा जणू उत्सव सुरू होता... लाल फुगे, आकर्षक सजावट, लाइटिंग आणि गुलाबांनी सुशोभित केलेली दुकाने 'व्हॅलेंटाइन डे' ची वातावरण निर्मिती करत होते....कितीतरी तरुण-तरुणी हातात हात घालून बाहेर पडलेले दिसत होते... पुन्हा गाडी सिग्नलला थांबली. ओव्हरब्रिज खाली तिला एक गरीब जोडपे दिसले.... दिवसभर कष्ट करून आता कुठे ते विसावले असतील ...उघड्यावरचा त्यांचा संसार पाहून तिला खूप दया आली.... पुढचं दृश्य बघून तर ती हेलावून गेली.... कागदात बांधुन आणलेला एकच वडापाव दोघे मिळून खात होते.... एकमेकांकडे बघत समाधानाने हसत त्यांच्या गप्पा सुरू होत्या..... दिवसभरच्या कष्टानंतरचे हे प्रेमाचे काही क्षण ते, आपल्या परिस्थितीची जराही चिंता न करता आनंदाने जगत होते.... आजूबाजूच्या जगाचे त्यांना जणू भानच नव्हते....भयंकर गरिबीत, अर्धपोटी राहूनही एकमेकांची साथ ते देत होते. 


       सिग्नल हिरवा झाला.. तिची गाडी भरधाव निघाली..... काही अंतरावर नेहमीच्या फुलांच्या दुकानाजवळ ती थांबली.... आज दुकानावर एक तरुण मुलगा होता. गुलाबाची टपोरी फुलं निवडता-निवडता तिने विचारलं, " राधा आणि तिचा नवरा असतो ना इथे?"

"हो! मी त्यांचा मुलगा. बाबांना दहा दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला ..... दवाखान्यातून आता सोडलंय... पण अजून चालता येत नाही. आई दिवसभर त्यांची सेवा करते...साध्या सीझन आहे दुकान बंद ठेवून उपयोगाचे नाही... घर कसं चालेल , म्हणुन मी बसतो आता इथे. "

नेहाचे लक्ष त्याच्याजवळ असलेल्या पुस्तकांवर गेले.

"तू एमपीएससीचा अभ्यास करतो? "

"हो... पहिल्या परीक्षेत पास झालोय... आता लेखी परीक्षा आहे पुढच्या महिन्यात..... एम ए चंही शेवटचं वर्ष आहे.... तोही अभ्यास आहेच. त्यामुळे आई मला दुकानावर येऊ देत नव्हती... तीच येणार होती... पण बाबांना अशा अवस्थेत सोडून निघताना तिच्या मनाची घालमेल मला बघवेना....मीच मग दुकानावर बसायचं ठरवलं... अशा वेळी त्यांना साथ देणं माझं कर्तव्यच आहे. "


     गुलाबांचा गुच्छ घेऊन नेहा निघाली. नवऱ्याला एरव्ही त्याच्या कामात साथ देणारी आणि आता आजारपणात त्याची शुश्रूषा करणारी राधा तिच्या डोळ्यापुढे आली....आणि हा तिचा मुलगा! शिकलेला असूनही कामाची लाज न बाळगता फुलांचे हार करत बसला आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आईवडिलांना साथ देतो आहे.... त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाला कर्तव्याची जोड आहे म्हणुन हे शक्य होतंय याची तिला जाणीव झाली. 


          केकच्या दुकानाजवळ नेहा थांबली.... सुंदर लाल रंगाचा हार्टच्या आकाराचा केक घेऊन ती बाहेर पडत होती तोच दुकानाच्या बाहेर उभी असलेली दोन मुले तिला दिसली. लहान भाऊ काचेतून आपल्या मोठ्या बहिणीला पेस्ट्री दाखवून ती घेण्याचा हट्ट करत होता. त्या पेस्ट्रीवरचा 40 रुपयाचा टॅग बघून बहिण म्हणाली, "आईने भाजी आणायला दिलेत पैसे... आपण खर्च नाही करू शकत ते पैसे ... नंतर घेऊ आपण ती पेस्ट्री! " 


  "मला खूप खावीशी वाटते गं ताई ती पेस्ट्री.... किती दिवस झाले केक आणलाच नाही आपण!" तिने काही तरी विचार केला.  

"पेन घ्यायला दहा रुपये कसे तरी आईकडून घेतले आहेत मी... माझं जुन्या पेनवर भागेल अजुन काही दिवस. आपण तुझ्यासाठी एक कप केक घेऊ.. तेव्हढेच पैसे आहेत माझ्याकडे.... चालेल ना तुला? "

 भावाच्या चेहर्‍यावर आनंद पसरला... दोघेही हातात हात घालून दुकानात गेले. 

 

      ते भावा-बहिणीचे प्रेम बघून भारावलेली नेहा घरी पोहोचली. सासू सासरे देवघरात होते. त्यांचं संभाषण तिच्या कानावर पडलं. 

   "अगं मी लावणारच होतो देवाला दिवा, तू कशाला बसली तिथे खाली.... तुला खाली बसलं की उठायला किती त्रास होतो! " 

"अहो, माझ्या त्रासासाठी तर तुम्ही सकाळची देवपूजाही स्वतःकडे घेतली... संध्याकाळीही तुम्हीच दिवाबत्ती करता.... मी आपली खुर्चीवर बसुन हात जोडते.... बरं नाही वाटत असं.... "

"अगं, पण तुझी गुडघेदुखी किती वाढलीये आता... आयुष्यभर आमच्यासाठी करत गेली...तेव्हा मला वेळ तरी होता का तुझ्यासाठी? आता मी थोडी मदत करतो तर काय बिघडले? "

   "दिवसभरही किती कामे करता तुम्ही... रात्री माझे गुडघे दुखायला लागल्यावर तेलाने मालीशही करता... किती वाईट वाटतं मला! मी तुमची सेवा करायची, तर तुम्हीच करता माझी.... "

   "परत जर तू असं म्हणाली ना तर मी बोलणारच नाही तुझ्याशी.... अगं आपणच एकमेकांना आधार द्यायचा.. कधी तू मला, कधी मी तुला! "

      नेहा फ्रेश व्हायला गेली. तिच्या डोळ्यांपुढे संध्याकाळपासूनच्या घटना येऊ लागल्या. मला आजच ह्या घटना का दिसाव्यात? की मी आजच या गोष्टींचा विचार करतेय? रस्त्यावर राहणार्‍या त्या पती-पत्नीचे निर्व्याज प्रेम, राधाच्या कुटुंबाचं एकमेकांना बांधुन ठेवणार आपुलकीचं प्रेम... त्या बहिणीचं आपल्या भावावरचं निरागस प्रेम आणि इथे आई-बाबांचं एकमेकांच्या काळजीतून दिसणारं मुरलेल्या मुरंब्यासारखं अवीट गोडीचं प्रेम! या प्रेमात ना कोणती अपेक्षा, ना कसला फायदा.... फक्त निखळ प्रेम! एकमेकांवरील प्रेम शब्दाने व्यक्त न करता या सर्वांच्या वागण्यातून त्यांच्या मनातील प्रेमाची प्रचिती नेहाला आली. 

 

माझं प्रेमही तसंच आहे का? मला का मग माझ्या प्रेमाची पावती असं सेलिब्रेशन करून द्याविशी वाटते ? खरंच गरज आहे का याची? तेवढ्यात तिला सासुबाईंनी आवाज दिला. 

"नेहा, सौरभचा फोन आला होता... तुला तयार रहायला सांगितलंय.... बाहेर घेऊन जाणार आहे तो तुला.... आज व्हॅलेंटाइन डे आहे ना!" 

"मग आई, आपण सगळेच जाऊ आज डिनरला बाहेर... " 

 सासरे लगेच म्हणाले, "आज तुम्ही दोघंच जा.... या दिवसाच्या निमित्ताने तुम्हा दोघांना एकत्र वेळ मिळेल.... तुला वाटेल बाबा आज असं काय म्हणताहेत?.... मला असला दिखाऊपणा कधी आवडला नाही..... पण आयुष्याच्या या टप्प्यावर मला जाणवतंय, आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण खुपदा पूर्ण बुडून जातो.... आपल्या माणसांना हवा तितका वेळ देऊ शकत नाही.... आणि नंतर त्या हातातून निसटून गेलेल्या क्षणांबद्दल हळहळ व्यक्त करतो... म्हणून असे क्षण तुम्ही गोळा करा... त्यांना हृदयात जतन करा.... यातून प्रेम तर वाढेलच पण नात्याला एक ताजेपणाही मिळेल. आपला सगळा ताण विसरून एकमेकांबरोबर घालवलेले असे आनंदी क्षण , एक नवी ऊर्जा तुम्हाला देऊन जातील. "

   "आणि आमची काळजी करू नका.... दुपारीच मी यांच्या आवडीचा मसालेभात आणि माझ्या आवडीचा गाजराचा हलवा बनवलाय ..... आम्ही टीव्हीवर आमच्या आवडीचा जुना सिनेमा आज बघणार आहोत..... तुम्ही नवीन आठवणी जोडा.... आणि आम्ही जुन्या आठवणींना उजाळा देऊ. "

        नेहाला आज व्हॅलेंटाइन डे खऱ्या अर्थाने कळला .... प्रेमाचे सगळे रंग आज तिने अनुभवले. त्याग, आपुलकी, कर्तव्य, काळजी, ममता, निस्वार्थभाव आणि समर्पण या सगळ्यातून जे जन्म घेते ते प्रेम! आजचा व्हॅलेंटाइन डे नेहासाठी स्पेशल ठरला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance