रेल रोको आणि आमचा साखरपुडा
रेल रोको आणि आमचा साखरपुडा
एक मार्च 1992. बरोबर तीस वर्षे झाली आमच्या साखरपुड्याला. त्याची पण एक मोठी गंमतच झाली.एक मार्चला साखरपुडा करण्याचे ठरवले, माझ्या काकांच्या घरी डोंबिवली मुक्कामी.आणि असेच काहीतरी महागाई वाढ, पेट्रोलचे भाव, इत्यादी कारणांमुळे शिवसेनेने अचानक बंद पुकारला. त्या काळी शिवसेनेचा बंद म्हणजे मुंबई अघोषित बंद.
सकाळी सकाळीच रेल रोको, त्यावेळी मुलुंडला शिशिर शिंदे एकदम फॉर्मात होते .कोणताही शिवसेनेचा बंद असला, की शिशिर शिंदे रेल्वे रूळात
उतरून बसणार आणि सर्व वाहतूक ठप्प. आमचे नवरोजी आणि त्यांची फॅमिली सकाळी नऊ वाजता लोकलमध्ये बसले. भांडुप ते डोंबिवली यायला जास्तीत जास्त 30 मिनिटे किंवा चाळीस मिनिटे. पण त्यादिवशी मात्र नऊ वाजता निघालेली मंडळी तीन वाजता आमच्याकडे डोंबिवलीला पोहोचले. ट्रेन एकदम हळूहळू चालल्या होत्या. जिथे जिथे पोलिस बंदोबस्त असेल, तिथे तिथे शिवसैनिकांना ट्रॅक मधून बाजूला हटवून गाड्या पुढे चालू होत्या. त्यावेळी काही घरोघरी लँडलाईन नव्हते. मोबाईलचा तर प्रश्नच नव्हता. यांच्या घराशेजारी एक गुजराती दुकान होते त्यांच्या दुकानातला नंबर आम्हाला दिलेला होता.
मी सकाळी सकाळी फोन करून विचारले, तुम्ही मंडळी येणार आहात का? आज साखरपुडा ठेवायचा का पुढे ढकलायचा? तर मला म्हणाले आम्ही लवकर निघतो. एवढ्यात काही बंद होणार नाही. आम्ही पोहोचल्यानंतर दहा अकरा च्या पुढे बंद/ मोर्चे जोरावर असतील. त्यानुसार गोसावी मंडळी भांडुप वरून लवकर निघाले देखील, पण त्यांचे चार पाच तास ट्रेनमध्ये गेले. शिवाय सासूबाईंनी हार, फुले, गजरा,जाळी काय ऑर्डर दिली होती तो फुलवाला त्यादिवशी आलाच नाही. साधे पेढे आणावे म्हटले तरी जमले नाही. साखरपुड्याची साडी पाच फळे यांनी रात्रीच बॅगेत भरून ठेवलेली तेवढेच घेऊन आले. शिवाय या मंडळींचा स्वयंपाक काय करता येईना कारण जर नाही आले तर इतका दहा-बारा लोकांचा स्वयंपाक वाया जायचा. म्हणून आम्ही कचोरी, चिवडा, फरसाण, अशी सुक्या नाश्त्याची तयारी ठेवली होती. शेवटी दादा बाबा करत चार वाजता आले. पाच सहा तास ट्रेनमध्ये गेल्यामुळे सगळेजण तहान भुकेने व्याकूळ. मग त्यांना होते ते आधी खायला दिले. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम अगदी घरगुती पंधरा-वीस माणसांमध्ये केला. त्यामध्ये भटजींचे काम माझ्या वडिलांनीच केले. कारण बंदमध्ये भटजी तरी कोठून आणणार.?
मग रात्री कधीतरी सात आठ नंतर ही मंडळी भांडुपला परत गेली. आणि घर माझ्या काकांचे होते त्यामुळे त्यांना काही स्वयंपाक पाणी करून जेवण घालता आले नाही. असो तेव्हा ही गोष्ट तेव्हा गोसावी ना देखील खटकली नाही आणि आम्हाला देखील खटकले नाही. परंतु काल एक मार्चला या सगळ्या गोष्टीची पुन्हा आठवण आली. तेव्हा अगदी सगळी मंडळी डोळ्यात तेल घालून यांची वाट बघत बसलो होतो. संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग नव्हता. आता येतील, मग येतील, का नाही येणार? आज साखरपुडा होईल का? नाही होणार. हे काही समजत नव्हते. पण येनकेनप्रकारेन एकदाचा झाला बाबा आमचा साखरपुडा... आणि त्यानंतरही पुढची सुखी संसाराची तीस वर्षे. तीदेखील कधी आंबट कधी गोड अशी गेली.
म्हणतात ना ज्याचा शेवट गोड त्याचं सारं काही गोड...
