राष्ट्रभक्ती म्हणजे काय रे भाऊ
राष्ट्रभक्ती म्हणजे काय रे भाऊ
भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन नुकताच देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आपल्या देशाच्या संविधानाप्रती सन्मान आणि स्वाभिमान व्यक्त करण्याचा खरंतर हा दिवस. विविधतेत एकता असणाऱ्या या आपल्या देशात अनेक सण आनंदाने साजरे केले जातात. परंतू आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जाणारा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांचा अनुभव काही वेगळाच.
लहान थोरांपासून सर्वांच्या उरात देशभक्तीची जाज्वल्य भावना दाटण्याचा हा दिवस. मला आठवत शाळेत असताना पहाटे लवकर उठून कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र गणवेष परिधान करायचो. बुटाला चकचकीत पॉलिश व्हायची. शर्टाच्या खिशाजवळ राष्ट्रध्वजाची प्रतिमा लावल्यावर कमालीची राष्ट्रभक्ती उफाळून यायची. कारण ती राष्ट्राची किंवा राष्ट्रध्वजाची प्रतिमा बाहेरून जरी खिशावर दिसत असली तरी आत हृदयाजवळ अभिमानाचा ऑरा आपोआप तयार व्हायचा. जसजसे शाळेजवळ जायचो तसतसे "ए मेरे वतन के लोगो" या लतादीदींच्या आवाजातील संगीताच्या ओळी कानावर पडायच्या. नंतर शिस्तीत प्रभात फेरीतून चालताना राष्ट्रभक्तीपर घोषणा देताना कमालीचा आनंद मिळायचा. राष्ट्रध्वजाला सलामी देताना काहीकाळ आपण स्वतः स्वातंत्र्यसैनिक झाल्याचा भास व्हायचा. पाहुण्यांचे मनोगत फारसे पचनी पडायचे नाही. कारण कार्यक्रमाच्या समारोपाला मिळणार खाऊ काय असेल याचाही विचार डोक्यात यायचा. कार्यक्रमाचा समारोप झाला की पावले वेगाने घराच्या दिशेने सरसवायची.
कधी एकदाचे घरी पोहचतो आणि टीव्ही सुरु करतो असे व्हायचे. कारण त्यादिवशी दुपारी हमखास देशभक्तीपर चित्रपट पाहण्याची संधी मिळायची. एरव्ही टीव्ही पाहू नको म्हणणारे पालक त्यादिवशी मात्र चित्रपट पाहायला आमच्यासोबत बसायचे. 'क्रांतिवीर, क्रांती, चायना टाऊन, बॉर्डर, तिरंगा यासारखे देशभक्तीपर चित्रपट टीव्हीवर ठरलेले असायचे. पाहता पाहता तो आनंदाचा दिवस कधीच संपू नये असे वाटायचे आणि पुन्हा सहा सात महिन्यांनी स्वातंत्र्यदिनी हा अनुभव अनुभवायला मिळणार या आशेवर दुसऱ्या दिवशी शाळेत हजर व्हायचो. सारे काही अविस्मरणीयच. प्रत्येकाचा अनुभव थोडाफार असाच असतो.
वर्षांमागे वर्षे सरतात, बालपणाचा शिक्का पुसट होऊन मोठे झाल्याचा मोठेपणा फुटलेल्या मिसरुडांनी दिसून येऊ लागतो. कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली एक आदर्श नागरिक एव्हाना दबून जातो.
स्वतःच्या सुखासाठी धावताना देशाबद्दलची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कृतीपेक्षा फक्त शब्दांतून दिसून येतात. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन म्हटले की उत्सुकता लागते. परंतु दुर्दैव म्हणजे ती उत्सुकता असते ती सुट्टीच्या औचित्याने फिरायला जाण्याची, पार्ट्या करण्याची आणि एंजॉय करण्याची आणि मग मनाला प्रश्न पडतो की हाच का तो राष्ट्रभक्तीचा दिवस ? देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दलचा हाच का तो आदराचा दिवस?
पूर्वी टीव्हीवर प्रजासत्ताक दिनी ध्वज संचालनाच्या आणि राष्टभक्तिपर उपक्रमांच्या बातम्या झळकायच्या. पण आता सुट्टीमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी, कोकणात पर्यटकांचा माशांवर ताव अशा ठळक बातम्या येतात. यापुढेही जाऊन याच दिवशी सेल्फी काढताना जीव गमावला यासारख्या बातम्याही प्रसिद्ध होतात.
एकीकडे तो सैनिक सणवार, घरदार विसरून रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावतो आणि दुसरीकडे आपण मात्र राष्ट्राभिमानाच्या दिनी एन्जॉय करण्यात समाधान मानतो. हाच का आपला आपल्या देशाप्रती असणारा आदर?
हे जर असेच चालू राहिले तर तर एक दिवस असा येईल की, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी बोटावर मोजण्याइतके लोक उपस्थित असतील. हे आपल्याला थांबविले पाहिजे. वर्षातले हे दोन दिवस आवर्जून आपल्या गावातील शाळांत किंवा शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी हजर राहिले पाहिजे. समुद्र किनाऱ्यावरची गर्दी ध्वजारोहण सोहळ्याच्या ठिकाणी दिसून आली पाहिजे. आपल्या पाल्यांसोबत अशा कार्यक्रमांना हजर राहून देशभक्तीचे धडे त्यांना देता आले पाहिजेत.
पर्यावरण, स्वच्छता, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि देशासमोर असणाऱ्या आव्हानांवर मात करून देश महासत्ता कसा होईल याचे संस्कार विद्यार्थीदशेत बालमनांवर रुजवता आले पाहिजेत.
केवळ दहशतवाद,सैनिक,शाहिद यांच्याबद्दल कट्ट्यावरच्या बाष्कळ गप्पा बंद झाल्या पाहिजेत. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून देहसपूर्ती असणारी बांधिलकी कृतीतून जपता आली पाहिजे. चला तर मग थोडा वेगळा विचार करूया ओठांवरची राष्ट्रभक्ती बोटांवर आणून बुलंद मुठी आकाशाकडे सरसावुया. मग बघा"सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा" म्हणताना खरा अभिमान प्रत्येकाच्या मनामनांतून ओतप्रेत वाहिल्याशिवाय राहणार नाही.