पूर्णत्व..!
पूर्णत्व..!
सुहास आणि संजना शाळेच्या दिवसांपासून सोबतच. पुढे दोघांनीही विज्ञान शाखेतून बारावी केली. एकमेकांना कच्चा असलेल्या विषयावर मार्गदर्शन करुन चांगल्या मार्काने पास झाले. आणि पुढे एकाच कॉलेजला ईजिनिअरिंग केलं. एकाच कंपनीमध्ये नोकरीला रूजू झाले. शिक्षण घेत असताना मनाची तार कधी जुळत गेली हे लक्षात आलं नाही. बस, प्रितीच्या वाटेवर दोघेही पार बुडालेले...! प्रेमाची कबुली देत दोघे सात वचनांचा गाठी मध्ये घट्ट बांधले गेले.
घरात कशाचीही कमी नव्हती. पैसा, घर, बांगला, गाड्या आणि जमीन जुमला काशाचीही कमी नाही. प्रेम करणारा नवरा, समजून घेणारे सासू सासरे, मानसन्मान सगळं संजना जवळ होतं. पण गेल्या दहा वर्षात तिची कूस भरली नाही. सगळे डॉक्टर झाले, अनेक उपचार करून झाले तरीही पदरात असफलताच येत होती. इतक्या सुंदर भरलेल्या घरात, बहरलेल्या नात्यात लहान बाळाची कमी सतत तीला खळत होती...तिला तिच्या अपूर्ण तेचि जाणीव खलत होती...
मित्र - मैत्रिणीचा गाठी भेटी झाल्यावर सगळ्यांना आपल्या लहान मुलांमध्ये गुंतलेल बघून तिला अजून मातृत्व न मिळाल्याने ती बेरस होत. सुहास ही तिचे दुःख चांगलेच ओळखून होता. त्याला लहान मुलांची खूप आवड आणि आई वडिलांना घरात लहान मुले आवडतात. पण तिला आई होता येत नाही म्हणून कोणीही तिच्यावर रोष काढला नाही. या उलट नेहमी प्रमाणे तिला प्रोत्साहन देत तिचा मानसिक आधार बनत असे. आज ना उद्या नक्कीच देव तुझी कळकळ समजेल. सगळ्या गोष्टींचा योग्य वेळ ठरलेली असते, तेव्हा योग्य वेळेची वाट बघणं फक्त आपली हाती आहे, असा ठाम विश्वास दाखवून तिला मायेने जवळ घेत...
घरात सगळे जण उघड्या डोळ्याने स्वप्ने बघत होती. अनेक व्रत वैकल्ये सुरू होती. देवावर आघाड
श्रद्धा आणि स्वतःचा आत्मविश्वास अजूनही टिकुन दिवस समोर जात होते. अशातच एक दिवस अचानक स्वयंपाक घरात तिला भुरळ आली... व्रत वैकल्ये करून ती अशक्त झाली होती. घरात सगळ्यांसमोर कितीही आनंदी राहत असली तरी मनातुन ती खचत चालली आहे, ह्याची जाणीव सगळ्यांनाच होती. सगळे जण तिची काळजी करण्या कुठे कमी नव्हते. तिची परिस्थिती बघता सुहास डॉक्टरांना घरीच घेऊन आला. सगळ्याचा मनात भीती निर्माण झाली होती. डॉक्टर तपासून बाहेर आले. सुहासला काही महत्वाच्या टेस्ट सांगून त्यांनी फार काही न बोलणे पसंत केले आणि दोघांनाही दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बोलावले. काही टेस्ट करून नक्की काय झालं आहे हे कळेल , असे म्हणत ते निघून गेले...
घरात सगळेच घाबरून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे तयार होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. संजनाच्या काही टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी दोघांना केबिनमध्ये बोलावून घेतले. दोघांच्या चेहऱ्यावर असलेले टेंशन डॉक्टरांनी लगेचच ओळखले आणि हसत हसत डॉक्टरांनी सुहासचे अभिनंदन केले. संजना क्षणभर स्तब्ध होऊन भिंतीला आधार घेत उभी झाली तर सुहास डॉक्टरांनी अभिनंदन का केले ह्याच विचारात गोंधळलेला होता. सुहास तू लवकरच बाबा आणि संजना तू आई होणार आहे अशी गोड बातमी त्यांनी दिली... हे ऐकताच संजनाच्या डोळ्यातुन आनंदाश्रू घळघळ वाहत होते. आपल्या आजाराचे निदान काय हे तिला समजले आणि दोघांचा आनंदाला पारावर राहिला नाही.
घरच्यांनी तिच्या ह्या दिवसात तिच्याकडे विशेष लक्ष दिले. तिला कशाचीही कमी पडू दिली नाही. आणि बघता बघता त्यांचे स्वप्न सत्यात उतरले आणि त्याच्या आनंदाच्या वेलीवर एक सुंदर फुल उमलले आणि संजनाला स्वतःला परिपूर्ण झाल्याचे दिसून आले...