पूर्णत्व
पूर्णत्व


आज शाळेची बस चुकली होती. नेहाला शाळेत सोडावे लागणार होते. शारदाने रिक्षाला आवाज दिला. नेहाला शाळेत सोडले. घरी आल्यानंतर ती विचार करू लागली. सुरज पुन्हा भांडणार. रिक्षाला पैसे गेले होते. सुरज आला. नेहा धावतच," पप्पा आला तुम्ही!"
"हो ग माझी छकुली", सुरज म्हणाला.
"आज आम्ही रिक्षाने गेलो शाळेत."
"रिक्षाने का गेला शाळेत ? बस नव्हती आली ?" शारदा घाबरत घाबरत म्हणाली,"आम्ही गेलो तर बस निघून गेली होती."
"तुला लवकर आवरायला काय होतं. मी एकटा कमावणार. कुठे कुठे पैसे देऊ. आता मालक येईल भाडे मागायला. शाळेची फी- खर्च कसा भागवणार मी एकटा. तुला घरात बसून तेवढे काम नीट करता येत नाही."
शारदाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. ती काहीच बोलली नाही. "पप्पा मम्मीला का ओरडता. ती पण खूप काम करते," छकुली म्हणाली.
"आणि मी काय करतो. आरामात तिथं बसतो. मला फुकट पगार देतात नाही!", पप्पा म्हणाले.
"छकुली गप्प बस तू चल जा खेळायला."
छकुली खेळायला गेली. शारदा निमूटपणे काम करत होती.
ती सुद्धा बी.ए. होती. तिनं नोकरी करायचे ठरवले. भाजी आणण्यासाठी ती बाजारात गेली. तिची जुनी मैत्रीण भेटली.
"स्नेहा तू ? किती दिवसांनी भेटतेस !"
" असं काय अवतार केलाय. कॉलेजला असताना किती सुंदर , आता पक्की गृहिणी झाली आहेस. मी बघ कशी आहे अजून. नोकरी करते. स्वतःच्या पायावर उभे आहे. स्वाभिमानाने जगते. आम्ही दोघे नोकरी करतो. घरही दोघे सांभाळतो. स्त्री पुरुष समानता म्हणतात ना तेच. बरं मी एकटीच बडबडते तू काहीच बोलत नाहीस", स्नेहा म्हणाली.
"तू काही बोलू देशील तेव्हा", शारदा म्हणाली.
"बर बाई! सांग तुझं कसं चाललंय. एकदम मस्त. वाटत नाही तुझ्या चेहऱ्यावरून."
" अग तुझाशी काय लपवू. घर चालवण्यासाठी पैसे लागतात. खर्च भागवता भागवता नाकी नऊ येते. मग आमचे रोज त्यावर भांडणं होतात. सुरज म्हणतो की तोच एकटा कमवतो. मी बसून खाते. मग मला माझाच राग येतो. एवढं शिकून उपयोग काय ??" शारदा म्हणाली.
"बरोबर आहे तुझं. तू एखादी नोकरी का बघत नाहीस. त्यामुळे तुला पैसे मिळतील. तुझ्या हातात दोन पैसे पडतील. तुही स्वाभिमानाने जगेल. तुम्हा दोघांचे पैसे मिळून स्वतःचं घर घेता येईल. स्वतःच्या घरात राहण्याची मजा काही औरच आहे. प्रत्येक वेळी घर बदलण्याची चिंता नाही." स्नेहा म्हणाली.
"आता बरेच दिवस झाले. मी आणि शिक्षण आता खूप दूर झाले आहेत. मला आता कोण नोकरी देईल."
" का नाही देणार! प्रयत्न केला तर परमेश्वरही भेटतो. आधीच तू ना चा पाढा धरतेस. सकारात्मक विचार ठेव. लाग कामाला. मीही प्रयत्न करते तुझ्यासाठी." "खरंच खूप खूप धन्यवाद चल निघते", असे म्हणत शारदा निघाली. मनात तेच विचार येत होते.
खरंच नोकरी करेन. स्वयंपाकात तिचं लक्ष लागत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर फक्त नोकरी होती. कधी संध्याकाळ झाली हेच कळले नाही. दारावरची बेल वाजली. तशी त्या विचारातून बाहेर आली. सुरज आला होता. त्याने हात पाय धुतले. जेवायला बसला. तिने घाबरत घाबरत सुरज ला विचारले," मी नोकरी करू का ?"
"तुला कोणी नसते उद्योग करायला सांगितले. घरातलं कर. मुलीला सांभाळ. तुला कोण नोकरीवर ठेवणार", सुरज म्हणाला.
"मी प्रयत्न करून पाहते. तुम्हालाही मदत होईल. स्वतःचं घर घेता येईल." शारदा म्हणाली.
रोज तू तू मैं मैं होऊ लागली. कारण सुरज ऑफिसमध्ये म्हणायचा,"आपण नाही बाबा ताटाखालचं मांजर. मी कमावतो . ती सगळं माझ्या हातात आणून देते. नोकरीवाली बायको म्हणजे सगळा तिच काम करा. तिच्या बोटावर नाचावे लागेल." त्यामुळे त्याला शारदाने नोकरी केलेली नको होतं. भांडण शेवटी खूप विकोपाला गेलं. शारदा म्हणाली, " वेगळे होते." तेव्हा सुरज च्या डोक्यात प्रकाश पडला. आपलं कुठेतरी चुकतंय. हा संसार मोडायचा नाही. त्याने परवानगी दिली. खूप प्रयत्न केल्यावर एका ठिकाणी शारदाला नोकरी मिळाली. तिला खूप आनंद झाला होता. सुरज ही कसाबसा तिच्या आनंदात सामील झाला होता. दोघेही कमावू लागले. काही दिवसातच कर्ज काढून घर घेतलं. स्वतःचं हक्काचं घर. शारदाला तर विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतःला चिमटे काढले. आपण खरंच आपल्या हक्काच्या घरात आलो. आपलं स्वतःचं घर झाला. दोघे एकत्र आले त्यामुळे शक्य झाले होते. दोघामुळे घर पूर्ण झालं होतं. शांतीच प्रेमाचं विश्वासाचे घर!!!