पुनर्जन्म
पुनर्जन्म
आज प्राजक्ता शांत बसली होती. तिच्या मनात साऱ्या जुन्या विचारांचे वादळ उठले होते. एक वेगळीच भीती तिच्या मनाला सलत होती. भूतकाळाच्या वादळांनी भविष्यकाळाच्या आभाळावर कब्जा केला होता. सतत तेच तेच विचार, भविष्याची काळजी या साऱ्यांमुळे जणू ती जगणच विसरून गेली होती. त्यामुळे जेव्हाही तिला एकांत मिळायचा ती भूतकाळात हरवून भविष्याची चिंता करत बसायची. इतक्यात समोरुन हाक आली... " हाय!!!!"
प्राजक्ता : अरे..! प्लीज या ना !!
(आज पहिल्यांदाच ती प्राजक्ताच्या शॉपमध्ये आली होती. )
ती: काय चाललंय ??
प्राजक्ता : काही नाही.. बसले आहे.
ती : आज लवकर आले शाळेतून. म्हटल जावं कुठेतरी.. भटकून यावं... म्हणून आले तुमच्याकडेच.
प्राजक्ता: अरे वा !! छान !!
ती : तुम्ही सेल लावलाय का ??
प्राजक्ता : हो... बघा काही आवडतय का तुम्हाला.. ??
प्राजक्ताच एक छोटंसं 'शी शॉप' होत. स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी तिने घरा जवळ रस्त्याच्या पलिकडे एक दुकान किरायाने घेऊन तिचं शॉप सुरू केलं होतं. पण तिथे देखील तिला बराच फावला वेळ मिळायचा जेव्हा असंख्य विचार तिच्या मनात थैमान घालायचे.
'ती' म्हणजेच दीपाली.., नुकतीच प्राजक्ताच्या शेजारी राहायला आली होती. एका शाळेत शिक्षिका होती. ती जिथे राहायची त्या काकूंकडून तिला प्राजक्ताबद्दल सगळच कळल होत.
दीपाली : मला आमच्या काकूंकडून कळलं तुझ्याबद्दल. प्राजक्ता परत नर्व्हस झाली. कारण कोणत्या ना कोणत्या मार्गाने तिचा भूतकाळ तिच्या समोर येऊन उभा राहायचा.
दीपाली : Don't hesitate... माझं पण तुझ्यासारखच आहे. आपण अगदीच सारखं आहोत. तेव्हा तू बोलू शकतेस माझ्याशी अगदी बिनधास्त..!!!
प्राजक्ता तिच्या पाच वर्षाच्या मुलाबरोबर तिच्या माहेरी राहायची. तिचं बाळ अगदीच पंधरा दिवसांचं होतं तेव्हापासून ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाली होती. त्याचा वहशी आणि रानटीपणा तिला असह्य झाला होता, त्यामुळे तिने वेगळं होण्याचा निश्चय केला. दीपालीसुध्दा तिच्या आठ वर्षाच्या मुलाबरोबर एकटीच राहायची. तिनेदेखील तिच्या नवऱ्याला त्याच्या ना ना तऱ्हेच्या व्यसनांमुळे सोडलं होतं. आणि त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे... दोघींचे लग्नदेखील एकाच तारखेचे होते अगदी वर्षसुद्धा तेच. दोघींचा जन्म एकाच ठिकाणचा, एकाच दवाखान्यात... आणि दोघीही आपल्या संसारात असताना सारख्याच त्रासाला सामोरे गेलेल्या.. कधी कधी ही नियती देखील कसा खेळ रंगवते ना ..??? दोघींचही आयुष्य अगदी सारखं लिहिलेलं..
दीपालीचं ते बोलणं ऐकून जणू काही आपल्या खोलवर झालेल्या जखमेवर कुणीतरी हळुवार फुंकर घालतोय अस प्राजक्ताला वाटलं..
दीपालीच्या डोळ्यांत तिला एक वेगळीच चमक दिसत होती. आयुष्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन , तिचे सकारात्मक विचार यांमुळे प्राजक्ता नकळत तिच्या कडे ओढली गेली. पावसानंतर एखादं वाळलेल लाकूड अचानक अंकुराव असच काहीसं तिच्या आयुष्याचं झालं. आणि हळूहळू त्यांच्या ओळखीचं रूपांतर सुंदर अश्या मैत्रीत झालं. दीपाली तिच्या पेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठी असल्याने प्राजक्ता तिला ताई म्हणायची.
आता प्राजक्ता हळूहळू मोकळी होत होती.. त्या दोघींमध्ये विचारांची आदानप्रदान होऊ लागली. त्यांची सुख दुःखे त्या एकमेकींशी वाटू लागल्या होत्या. एवढ्या काळात दीपालीने हे चांगलेच ओळखले होते की , प्राजक्ताला तिच्या शॉपमध्ये मिळणारा फावला वेळ तिला तिचा भूतकाळ आठवायला भाग पाडतोय. आणि एक दिवस ती प्राजक्ता ला म्हणाली.....
दीपाली : प्राजू तू शिकलेली आहेस. तुझं ज्ञान ही छान आहे. मग तू एखादा जॉब का नाही बघत ??? म्हणजे तुला बाकी विचार करायला वेळ नाही मिळणार. बिझी होशील तू ही ..
प्राजक्ता : अग ... पण मी करू शकेल का?? माझा आत्मविश्वास नाही राहिला आता स्वतः वर ... !!! मधल्या काळात जे काही प्राजक्ताच्या आयुष्यात घडून गेलं होत त्यामुळे ती खूप हळवी झाली होती. तिचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावला होता तिने. चांगली शिकली असून देखील परिस्थितीपुढे हरली होती. मात्र दीपालीला तिच्या मैत्रिणीला अस खचलेले बघायचं नव्हतं. ती प्राजू च मनोधैर्य वाढविण्याकरिता खूप प्रयत्न करत होती, तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करायची. तिच्यामुळे प्राजक्ताचा गेलेला आत्मविश्वास हळूहळू परत यायला लागला होता. आणि एक दिवस....
प्राजक्ता : ताई...ये ताई गं ... कुठे आहेस ग बाई...???
दीपाली : काय ग... ?? कश्याला ओरडून रहालीस ..??
प्राजक्ता : ऐक ना ... मी काल ज्या शाळेत इंटरव्ह्यूला गेले होते त्यांचा फोन आला होता. त्यांनी बोलावलंय मला..
दीपाली : अरे व्वा !! खूप छान !! चला आता तुझीही गाडी रुळावरून धावणार..!! आता प्राजक्ता शॉप बंद करून तिच्या नव्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती आणि तिचा भुतकाळ मागे टाकत आयुष्याच्या नव्या वळणावर निघाली होती जे तिला यशाच्या दिशेनं घेवून जात होते. दीपालीच्या येण्याने प्राजक्ताचं आयुष्य पूर्णपणे बदललं होत. जणू काही दुःखाचं सावट सावरून सुखाची नवी किरणे तिच्या आयुष्याकडे वाटचाल करीत होती. भुतकाळाच्या भयावह अंधारातून भविष्याच्या सोनेरी किरणानी तीच आयुष्य उजळून निघालं होतं..!!
प्राजक्ताच्या डोळ्यात आता नवी उमेद निर्माण झाली होती.... , सकारात्मक विचारांनी तिचा चेहरा तेजस्वी वाटत होता.....जणू काही तिने पुनर्जन्मच घेतला होता.
