Gauri Ekbote

Classics

2.1  

Gauri Ekbote

Classics

पुंजिकस्तल…. एक अप्सरा

पुंजिकस्तल…. एक अप्सरा

6 mins
911


काय झालं, कशामुळे झालं, नक्की काय घडलं हे त्या स्वर्ग नगरीचा राजा इंद्र आणि सौंदर्याची सम्राज्ञी

पुंजिकस्तल अप्सरा, या दोघांनाच माहित, पण त्या दिवशी, देव इंद्र खूप संतापले होते. पुंजिकस्तलेवर त्यांचा एवढा जीव, पण आज ते तिच्यावरच चिडले होते आणि पुंजिकस्तला...


ती फक्त आसवं गाळीत उभी होती.

सगळे तिचं सांत्वन करत होते, काय घडलंय ते कुणालाच कळत नव्हतं.


“पुंजिकस्तला आज तू मला मान खाली घालायला लावलीस. का असं केलस? माझा केवढा जीव तुझ्यावर. तू मला सांगू शकली असतीस. तू का नाही सांगितलं. एवढं सगळं घडलं आणि मला काहीच कल्पना नाही... नाही... हे असंच होत राहीलं तर..." देव इंद्र पोटतिडकीने पुंजिकस्तले ला बोलत होते रागवत होते.


”अगं काय कमी होतं तुला इथे, सगळी सुखं आहेत या इंद्र लोकात... का पण का असं करावंसं वाटलं तुला... आज तू मला शरमेने सर्व देव लोकांपुढे मान खाली घालायला भाग पाडलंय...”


पुंजीकस्तला रडत रडत इंद्र देवांना बोलली, "मला माफ करा खरंच चुकले मी... मी असं वागायला नको होतं... माझी बुद्धी कशी फिरली नाही माहित... मला असं का करावंसं वाटलं नाही माहित... पण या कृत्याबद्दल मला माफ करा... मला त्या दैवी साधुच्या शापापासून वाचवा देवा..."


इंद्र देव, "साधू... अगं ते नुसते साधू नाही महान तपस्वी आहेत... त्यांच्या तपस्येचं तेज त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच लक्षात येतं... आणि तू... तू त्यांना असं वागवलंस, ते जरी एका माकडाच्या रूपात असले तरी ते खूप मोठे तपस्वी आहेत आणि आता त्यांच्या शापापासून तुला कोण वाचवणार...”


रंभा या दोघांचे संभाषण ऐकत होती. तिला पुंजिकस्तलाचे रडणे बघवले नाही. ती तिची बाजू मांडायला त्या दोघंमध्ये पडली, "देव इंद्र... मला नाही माहित काय झालंय ते, पण मला वाटतं तुम्ही एकदा पुंजीकस्तलेचं म्हणणं ऐकावं. तिला झालेल्या गोष्टीबद्दल खरंच खूप पश्चाताप होतोय... ती त्याबद्दल माफीसुद्धा मागते आहे. मला वाटतं..."


"रंभा, तू नको पडू यात तुला नाही माहित हिने काय केलंय. हिला या इंद्र लोकामधल्या सुखाचा, आरामाचा, ऐश्वर्याचा कंटाळा आला होता. म्हणून ही पृथ्वीलोकात विहार करायला गेली... तिथे गेली तर हिने ते सुख उपभोगावं ना तर नाही... हिला तिथे लीला कराव्याशा वाटल्या आणि हिने एका महान तपस्वी माकड रुपी योगी जेव्हा ते त्यांच्या तपस्येमध्ये लीन होते. पद्मासनात शांत बसले होते. हिने त्यांना पाहिले आणि एक माकड कसं बसलंय, म्हणून त्यांना काही फळं मारून फेकली आणि एवढंच नाही तर दगडसुद्धा... माझ्याच्याने तर सांगवलंसुद्धा जात नाही इतकं मोठ्ठ कृत्य हिने केलं... मग काय त्या तपस्वीची तपस्या भंग पावली आणि त्यांनी हिला शाप दिलाय...”


रंभा, “शाप...”


इंद्र, "हो... हो शाप दिलाय... की जसं काही ही कोणाच्या प्रेमात पडेल हीसुद्धा एक माकड बनून राहील..." 


रंभा, "बापरे... मग आता...”


इंद्र, "आता काय... पश्चात्ताप... दुसरा काही उपाय नाही..."


रंभा, "देवा असं नका हो म्हणू. असेल ना काही तरी उपाय उ:शाप नक्की काही तरी असेल... आपण जाऊयात का सगळे या योगींना भेटायला, हिच्या वतीने आपण सगळे त्यांची माफी मागू..."


इंद्र, "ते आता शक्य नाही. आता कुठे शोधणार आपण त्यांना? ही तपस्वी लोकं घोर रानात, अति थंड बर्फाळ प्रदेशात किंवा उष्ण वाळवंटात तपस्या करतात की जेथे त्यांना कोणी त्रास देणार नाही... आता ते कुठे असतील नाही कळणार..."


रंभा, "मग आता..."


पुंजिकस्तला, "इंद्र देवा मला माफ करा पण यावर काहीतरी उपाय सुचवा..."


इंद्र खूप विचार करून मग, "यावर एकच उपाय, तू ब्रह्म देवांना भेट तेच काय ते उपाय सुचवतील...”


हे एेकून पुंजिकस्तलाला थोडा धीर आला.ती ब्रह्म लोकात आली आणि आल्या आल्या तिने ब्रह्म देवांचे पायच धरले.


"देवा मला माफ करा मला या शापापासून वाचवा, मला योग्य मार्ग दाखवा, माझी चूक झाली, मला उ:शाप द्या, मार्ग दाखवा देवा...”


ब्रह्म देवांना तिने झालेलं सगळं सांगितलं. ब्रह्म देव, "झाले ते योग्य नाही झाले, तू असं वागायला नको होते... एका सिद्ध-योगीला, तो जेव्हा त्याच्या तपस्येत लीन असताना त्याला त्रास देणं म्हणजे घोर पाप… पण झालेल्या गोष्टीचा तुला पश्चात्ताप होतो... आणि जे तू वागली ते योग्य नाही याची तुला जाणीव होतेय... ही चांगली गोष्ट आहे..."


(खरं तर या सगळ्यात नियती लांब उभं राहून हसत होती आणि नवीन काही तरी भव्य दिव्य होणार याची रचना करत होती.)


ब्रह्म देवांनी पुंजिकस्तलेकडे बघितले, त्यांना नियतीचा खेळ आणि दैवाची योजना समजली आणि त्यांनी यावर एक उपाय पुंजिकस्तलेला सांगितला.


”तू पृथ्वीलोकात जा. तिथे तुझी भेट एका महान योद्धा, बलशाली, शूर वीराशी होईल त्याच्यापासून तुला एक वानर रुपी तेजस्वी, महापराक्रमी, बलशाली, शिव अंश असलेला पुत्र होईल, तो शिवाचा अंश असलेला असेल आणि त्या महान पुत्राच्या योगाने तुला उ:शाप मिळेल..." या ब्रह्मदेवाच्या वाणीने पुंजिकस्तलेला थोडे बरे वाटले आणि देवांच्या म्हणण्याप्रमाणे ती भूलोकात राहू लागली.


बरेच वर्ष तिथे तिने तपस्या केली आणि एक दिवस जंगलात ती ध्यान धारणा करत असताना सिंहाच्या डरकाळीच्या आवाजामुळे तिचे ध्यान तुटले, काय झालंय म्हणून बघायला ती आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. वाटेतील झाडे कोलमडून पडली होती. झाडाच्या खोडांवर नखांचे व्रण उमटले होते. पक्षांच्या किलबिलाटाने कोलाहल माजला होता. कोणी तरी कोणाला तरी उचलून फेकत आहे असे मोठ मोठे आवाज येत होते. एखादे मोठे द्वंद्वयुद्ध सुरु होते. अजून थोडं पुढे गेल्यावर जे तिने बघितलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. एक मोठ्ठे भारदस्त, बलशाली, उंचपुरे अर्धे मानव आणि अर्धे माकड असे शक्तिशाली कुणी तरी एका सिंहाशी युद्ध करत होते आणि तिने जे पाहिले ते तर खुपच विलक्षण होते. त्या शूरवीराने एका क्षणात त्या सिंहाच्या खालचा जबडा एका हाताच्या चार बोट आणि वरचा जबडा दुसऱ्या हाताच्या चार बोटांनी पकडून त्या सिंहाला फाडून फेकले आणि अचानक सर्वत्र शांतता पसरली. काही क्षण कोणीच काही हालचाल नाही, पानांची सळसळ नाही कि पक्षांची फडफड नाही. सर्व तो क्षण बघून स्तब्ध झाले. पुंजिकस्त लेला तर काही सुचतच नव्हते काय घडले आणि तिने काय पहिले यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.


आणि अचानक त्या वीराचे लक्ष पुंजिकस्तलेकडे गेले, तिला बघताच तो काही क्षणाआधी आपण काय करत होतो हे विसरूनच गेला. तिच्या सौंदर्याची मोहिनी त्याच्यावर जादूसारखे काम करत होती आणि तो त्या मोहिनीच्या हळूहळू आधीन होत होता. ती त्याला विचारते आहे की तुम्ही कोण, कुठून आलात, हे काय झालं वगैरे पण तिच्या बोलण्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं तो फक्त आणि फक्त तिला न्याहाळत होता. तिचे लालचुटुक ओठ, गोरा वर्ण, कमनीय बांधा, कोरीव भुवया, निळे डोळे, मधूनच एक केसाची बट तिच्या गुलाबी गालाला खेळत होती, बोलतानासुद्धा डाव्या गालावर पडणारी खळी त्याचं लक्ष वेधून घेत होती. हे सगळं बघून तो हरवूनच गेला... ही कोणीतरी स्वर्गीय अप्सराच यावर त्याचा ठाम विश्वास बसला.


आणि तो तिच्या प्रेमातच पडला. पुंजिकस्तला तर जेव्हा तिने पहिल्यांदा त्या शूरवीराला पाहिले तेव्हाच ते तिला आवडले आणि याचवेळेस योगीने दिलेला शाप असा करू लागला आणि ती वानर रूपात बदलली, काही क्षण दोघांनाही काहीच कळले नाही पण नंतर पुंजिकस्तला रडू लागली. त्या शूर वीराने तिला या सगळ्याचा काय अर्थ आहे. हे असे काय घडले तू अचानक असे रूप कसे बदलले विचारले.


रडतच पुंजीकस्तलाने तिच्याबरोबर घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांनी तिचे सांत्वन केले आणि ते तिला त्याच्या राज्यात घेऊन आले. नगरातले सर्व लोक हे वानराप्रमाणेच होते. हे पाहून तिने त्यांना विचारले की तुम्ही कोण आपण कुठे आलोत, त्यावर त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. मी वानरराज केसरी आणि ही सर्व माझी प्रजा आहे. मी कधीही माणूस आणि कधीही वानर रूप धारण करू शकतो. तू निःसंकोचपणे माझ्या राज्यात राहा... खरं तर मी तुला पाहिल्यादा बघितलं तेव्हाच तुझ्या प्रेमात बुडालो तू माझ्या बरोबर विवाह करशील... या मागणीला ती नाही म्हणूच शकली नाही आणि खूप थाटमाटात वानर राज केसरी आणि पुजिकस्तलाचा विवाह पार पडला आणि ती त्यापुढे अंजनी नावाने वानर राणी म्हणून ओळखली जाऊ लागली.


वानर राज केसरी हे निस्सीम शिव भक्त होते आणि आता अंजनीसुद्धा त्यांच्याबरोबर शिवभक्तीत लीन झाली. आपल्याला शिवासारखा पुत्र व्हावा म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांची भक्ती बघून महादेवाने ते मान्यही केले.

मध्यंतरी अयोध्येमध्ये राजा दशरथ हे पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते, या होमाच्या अग्नीमधून अग्नी देवांनी त्यांना पवित्र असे पायस दिले की जे ग्रहण केल्याने राजाच्या राण्यांना तेजस्वी असे पुत्र होतील. त्यातील थोडे पायस हे पवन देव चोरून अंजनीच्या हातावर देतात आणि ते तिला ग्रहण करण्यास सांगतात. ते घेताच तिला काही तरी दिव्य आपल्याबरोबर घडणार आहे याची जाणीव होते. पवन देव तिला सांगतात अंजनी आता तू एका शक्तिशाली, बुद्धिमान, धाडसी, चपळ आणि उडण्याची ताकद असलेल्या पुत्रास जन्म देशील आणि त्या बरोबरच तुझा शापही नाहीसा होईल. लवकरच अंजना एका गोंडस, गुटगुटीत वानर पुत्र, बलशाली हनुमानास जन्म देते आणि त्याचं अंजनेय असं नाव ठेवते आणि त्याच्या बाळलीलांमध्ये हरवून जाते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics