गोपिका
गोपिका
अजूनही आठवतात तुझे ते कुरळे केस... शांत डोहासारखे निळेशार डोळे, अगम्य निळा वर्ण, तू हसलास की तुझा तो थोडा तिरका दात मोहून घ्यायचा सगळ्यांचं लक्ष,
तुझा तो मोहक चेहरा, त्यावरच हसू आणि हसताना तुझ्या डाव्या गालावर पडलेली ती खळी अजूनही आठवते मला...
किती वेड लावलं होतंस तू सगळ्यांना... मोहूनच टाकलं होतं....
कोणती जादू होती तुझ्याकडे की तुला बघितलं की सगळं भानच विसरून जायचो आम्ही...
कितीदा तरी मी तुझ्या घरी आले होते तुझ्या खोड्या सांगायला पण... पण तू समोर यायचास आणि सगळं विसरून जायचे...
अजूनही प्रश्न पडतो तुला कसं कळायचं की मी तुझ्याबद्दल सांगायला येणार ते?
तो दिवस तर अजूनही तसाच स्पष्ट आठवतो... ज्या दिवशी तू आम्हाला सोडून निघाला होतास...
जाता - जाता आपण भेटलो होतो त्याच तुझ्या आवडत्या पारिजातकाच्या झाडाजवळ आणि मला बोलला होतास ना की मी परत येईल तुला भेटायला...
बघ ना अजून तुझी वाट बघते आहे, मला माहित आहे तु तुझं वचन पाळतोस...
तू नक्की येशील मला भेटायला...
गेली कितीतरी युगं मी रात्री झोपलेसुद्धा नाही...
ह्याच विचाराने की तू येशील आणि मला झोपेत कळणारच नाही...
ये रे आता लवकर...