पृथ्वीचे संवर्धन करणे ही मानवाची नैतिक जवाबदारी
पृथ्वीचे संवर्धन करणे ही मानवाची नैतिक जवाबदारी
आपल्या आकाशगंगांतर्गत सूर्यमालेतील ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे तो आहे पृथ्वी ग्रह. जीवसृष्टी याच ग्रहावर आहे. अन्य ग्रहांवर अजून तरी जीव सृष्टी असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. ब्रम्हांडात कुठेतरी जीवसृष्टी असेल का? हा संशोधनाचा विषय असून, या संबंधाने अविरतपणे संशोधन, अनेक देशांतर्गत सुरू आहेत.
पण पृथ्वी या ग्रहावर पोषक अनुकूल वातावरण असल्यामुळे येथे जीवसृष्टी सध्यातरी तंग धरून असले तरी, मानवीय प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर विकासात्मक नवनवीन क्रांती घडून येत आहे. भूतलावरील क्रांती असो की अवकाशिक, प्रत्येक क्षेत्रात गरुड भरारी झेप घेत, सर्वांगीण यशाची शिखरे सर करत आहे. असे असले तरी पूर्णतः मानव पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही. विज्ञानाच्या प्रगतीने कितीही भौतिक सुख प्राप्त केले असले तरी, नैसर्गिक सुखाला मुकावे लागणार आहे. मानवाच्या हव्यासात्मक कृत्यामुळे पृथ्वीचे अस्तित्त्व धोक्यात आले असून, संपूर्ण जीव सृष्टी करिता गंभीर चिंताजनक बाब आहे.
म्हणूनच २२ एप्रिल हा दिवस, जागतिक पृथ्वी दिवस म्हणून साजरा करण्याची गरज उरली आहे. पृथ्वी दिन हा पर्यावरण रक्षणासाठी समर्थन दर्शविण्यासाठी जगभरात साजरा करणारा वार्षिक कार्यक्रम आहे. हा दिवस जगभरातील नागरिकांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेचे महत्त्व पटवून देतो. निरोगी ग्रह आणि उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र येवून कृती करण्यास प्रोत्साहित करतो. हा दिवस जागरूकता वाढवितो व परिवर्तनाची प्रेरणा देतो. निसर्गाशी सखोल संबंध जोपासतो. पृथ्वी दिनाची उत्पत्ती १९७० पासून असू शकते, असा अंदाज आहे.
पृथ्वीदिन या कार्यक्रमामागची कल्पना अमेरिकन सिनेटर गेलार्ड नेल्सन व हावर्डचे विद्यार्थी डेनिस हेस यांच्याकडून आली. अमेरिकेतील बिघडलेले वातावरण व जानेवारी १९६९ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा येथे झालेल्या प्रचंड तेलगळतीमुळे ते दोघेही अत्यंत व्यतीत होते. पर्यावरणाच्या दुष्परिणामांनी अत्यंत व्यथित झालेल्या त्यांना वायू व जल प्रदूषणाविषयीच्या उदयोन्मुख जनजागृती मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ऊर्जा ओतायची होती. ही त्यांची सुरुवात होती.
पण आजच्या स्थितीला अधिक भेडसावणाऱ्या जागतिक समस्येला मध्यनजर ठेवून लोकचळवळ अधिकाधिक तीव्र करण्याची काळाची अत्यंत गरज आहे. या लोकचळवळीला घराघरातून भरीव सहकार्य करणे अपेक्षित आहे. पण खेदाने म्हणावे लागते की, आपल्या देशात तर इतर देशांपेक्षा पर्यावरणीय शिष्ट ढासळलेली दिसून येते. सामान्यापासून अती पुढारलेल्यांपर्यंत शिस्तीचा अभाव दिसून येतो. कारण येथे लोकशाही नांदत आहे. सामाजिक कृतिशी कुणालाही सोयर सुतक नाही. बेधुंद स्वैराचार वर्तनातून दिसून येत आहे.
येथे हक्क मिळविण्यासाठी लोक आंदोलने निर्माण होतात. पण रक्षणार्थ मोजकेच पुढे येत असतात. प्लास्टिक समस्येने संपूर्ण राष्ट्राला ग्रासले असल्याचे दिसून येत आहे. नाली, नाले, नद्या प्लास्टिकच्या विळख्यात आलेले आहेत. त्यामुळे पुर स्थतिसारखे प्रश्न दरवर्षी निर्माण होतात. आरोग्यात्मक विपरीत प्रश्न निर्माण होतात. मुके शेकडो प्राणी प्लास्टिक सेवनामुळे गतप्राण होत असतात. प्लास्टिक जाळल्यास विषारी वायू हवेत मिसळल्याने संपूर्ण प्राणिमात्र आरोग्याच्या दृष्टीने संकटात सापडतात. प्लास्टिक युक्त वापरामुळे विषारी घटक नकळत पोटात जात असून त्यामुळे कर्करोग सामान्यतः हावी होताना दिसतो आहे. असे अनेक जटील प्रश्न या प्लास्टिकमुळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. घरातील केरकचरा अधिकृत विल्हेवाट लावण्याची नैतिक जवाबदारी देशांतर्गत सर्व नागरिकांची आहे.
यासारखे शेकडो विषय आहेत.आणखी एक महत्त्वाची जवाबदारी आहे ती म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, जतन करणे. पण स्वार्थी लालसायुक्त मानवापुढे संवर्धन जतन करण्याचे स्वप्न, धूसर असून अशक्य असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. कारण मानवाची मानसिकता हव्यासाने झपाटलेली आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे झीज करण्याकडेच पाऊल पुढे पडत आहेत. याचे दूरगामी दुष्परिणाम येत्या पंचवीस तीस वर्षातच पाहायला मिळतील. अमाप वृक्ष तोडीमुळे अवर्षणे स्थिती बघतच आहोत.
असे कितीतरी मुद्दे आहेत की, यात व्यापक स्वरूपात वर्णन करणे शक्य नाही.
या दिनानिमित्त काही उपक्रम राबविता येवू शकतात.
ग्रहाच्या रक्षणाबद्दल जागरूकता वाढविणे...आपण हा दिवस विशेष बनविण्यासाठी पर्यावरणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. आपण आपल्या घरात प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेवू शकता. नेचर वॉकला जाऊ शकता. पर्यावरण वाचविण्याच्या मर्गांबद्दल आपल्या कुटुंबास व मित्रास शिक्षित करू शकता. पुनर्वापर करण्याची तत्वे देखील शिकू शकता. या व्यतिरिक्त मनोकल्पित बरेच काही उपक्रम...आपली जीवन शैलीत उतरविण्याचा सराव करू शकता.
पृथ्वीचे नैसर्गिक सृजनात्मक सौंदर्य ज्या परीने नटलेले आहे, त्यापरिने आबाधित ठेवण्याचा प्रयत्न मानवाने करावा. उगीच ढवळाढवळ करू नये. अन्यथा "माणसा तुझ्या स्थितीचा तूच अपराधी" अर्थात पर्यावरणीय विपरीत अनुचित परिस्थिती उद्भवली तर त्याला जिम्मेदार मानवच राहील. निसर्गाशी वाईट वागाल, तर वाईट परिणाम निश्चितच भोगावे लागतील, आणि दोषारोपण परमेश्वरावर...! अरे मानवा, परमेश्वराने संपूर्ण पृथ्वीचे जतन, संवर्धन, सृजनात्मकतेची सर्वांगीण जवाबदारी या पृथ्वीचे महानायक बुद्धिवंत मानवावर सोपविलेली आहे. आपले सौभाग्य समजून व नैतिक जवाबदारी समजून नैसर्गिक अधिकृत कार्य पार पाडणे अपेक्षित आहे.
श्री सी. एच. बिसेन सर,
गोंदिया
