प्रियांश...
प्रियांश...
आजकालच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना द्यायला वेळ असतो कुठे? जो काही वेळ मिळेल तो सदुपयोगी लागावा म्हणून आपण हल्ली सगळंच ऑनलाईन मागवतो मग, ते किराणा सामानापासून ते भाजी, फळे, औषधे...अगदी छोट्यात छोटी गोष्ट देखील होम डिलिव्हरी होते! हे सगळे आपण का करतो फक्त एका अपेक्षेपोटी ती म्हणजे आपल्या पार्टनरसोबत आपल्याला हवा तसा वेळ घालवता यावा म्हणून! पण, तसा वेळ खरंच मिळतो का? हल्ली एकमेकांशी दोन शब्द सोडा, एकमेकांना नीट पहायला देखील वेळ मिळत नाही, मग आपसूकच नातं बोथट व्हायला सुरू होत. विश्वासाच्या नात्याला संशयाच्या कल्लोळामुळे एकमेकांच्या नजरेत दोघेही खुपायला लागतात, प्रेमाची जागा द्वेष घेतो. दोघांचेही प्रयत्न अपुरे पडायला लागतात, संवाद संपून त्याची जागा एकमेकांची उणीदुनी काढण्यात वेळ जाऊ लागतो. एकमेकांवर प्रचंड प्रेम असणाऱ्या अश्या जोडप्यांना उमगतही नाही की ते दोघेही नदीच्या विरुद्ध तीरावर उभे राहून एकमेकांची वाट पाहू लागतात! नशीबवान ते ज्यांचे अहंकार गळून पडतात, द्वेष, असूया, पार्टनर विरुद्ध चार कानांमुळे निर्माण झालेले गैरसमज अन् फक्त स्वतःचाच विचार करण्याची मानसिकता या सर्वांना बगल देऊन जे प्रेमरूपी नदीत स्वतःच्या नकारात्मक भावना, कृत्य या सगळ्यांच समर्पण करून, जेव्हा पार्टनर पर्यंत पोहचतात तेव्हाच खऱ्या नात्याची सुरुवात होते.
आयुष्यात प्रेम करणारा पार्टनर मिळणं ही परमेश्वराची सर्वात मोठी भेट तुम्हांला मिळालेली आहे, काही लोक प्रेम करणारा पार्टनर मिळावा म्हणून झुरून रोज मरत राहतात म्हणून तुमच्याकडे जे आहे त्याचा आदर करा! नात्याला कुशब्दांचं गालबोट न लावता त्याला साजरं करा, जपा! तेव्हाच ते नातं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अबाधित राहत हे मात्र नक्की! आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याही पेक्षा सुंदर तुमचा पार्टनर आहे! ओंजळीतून मोती निसटण्याआधी त्यांना रेशमी हृदयाच्या कप्प्यात जपा!