Priya Satpute

Inspirational Others

2  

Priya Satpute

Inspirational Others

"अनुराधा भोसले"-आधुनिक काळातील कर्तृत्ववान स्त्रिया

"अनुराधा भोसले"-आधुनिक काळातील कर्तृत्ववान स्त्रिया

3 mins
193


खूप दिवसांपासून मी या सामान्य स्त्री बद्दल माहिती शोधत होते, सर्वात प्रथम त्या नजरेत आल्या ते झी मराठीच्या "उंच माझा झोका" अवार्ड्समुळे, पहिल्यांदाच मला कळाल होत की "अनुराधा भोसले" कोल्हापुरात "अवनि" नावाची संस्था चालवत आहेत. पण, त्यांच्या बद्दल हवी तशी माहिती मिळत नव्हती. एक वेगळ आकर्षण मात्र वाटत होत त्यांच्याबद्दल, सांगता येणार नाही; का? 


त्याचं दरम्यान माझं पासपोर्टच वेरिफ़िकेशन चालू होत. मी तिथे बसले होते अन एक पोलिस दुसऱ्या पोलिसांना सांगत होते अवनिकडून सहकार्याचा अर्ज आला आहे, तशे माझे कान टवकारले गेले. बालकामगारांना सोडवण्यासाठी त्या धाड टाकणार होत्या. पोलिसांनी अर्ज मंजूर केला. तशी मी आणखीनच विचारात पडले, बापरे, धाड! ग्रेट! हे दुसऱ्यांदा घडलं तेही अकस्मात, का? त्यांच वलय माझ्याभोवती जणू पिंगाच घालत आहे असचं वाटू लागलं. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की मग आपण, सगळ कसं पिंजून काढतो. थंक्स टू इंटरनेट, त्यांची एक मुलाखत नजरेस पडली. ग्रेट भेट- अनुराधा भोसले, वागले सोबतची. प्रत्येक प्रश्नागनिक त्याचं वलय वाढतच गेलं. परिस्थिती समोर हार न मानता तिच्याशी चार हात करणारी ही नायिका माझ्या नसनसात शिरली. 


दलित कुटुंबातला जन्म, धर्माच्या नावावर भोगलेले अपार कष्ट, संपूर्ण कुटुंबाने सोसलेली हलक्याची अवस्था, त्यातूनच ख्रिश्छन धर्मांतर, धर्मांतरामुळे त्यांना शिकता आलं, पण, तेही इतकं सोप्पं नव्हत, १०वी च्या परीक्षेची फी नव्हती म्हणून त्यांना शिक्षकांनी शाळा सोडून जाण्यास सांगितलं, तरीही त्यांनी हार मानली नाही, गावी जाऊन शेतमजुरी करून हात छिलले असूनही त्या काम करत होत्या, त्या मालकाने त्यांना बोलवून १० रुपये दिले आणि त्यांनी शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. चर्चच्या आवारातील स्वच्छतागृहे साफ करून त्यांनी आपल्या मास्टर्स इन सोशल वर्क साठी पैसे जमवले खरे, पण, त्यांच्या मुंबईच्या या शिक्षणाचा सारा खर्च मिशनरीने केला. हे त्या आवर्जून सांगत होत्या, आयुष्यात ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांची नावे त्या खडाखडा सांगत होत्या.


वैयक्तिक आयुष्यात त्यांनी आंतरजातीय विवाह केला, पण, तिथेही त्यांना दलित वागणूकच मिळाली. अशा वेळी बायका हार मानून जीव द्यायला मागे पुढे पाहत नाहीत पण ही रणरागिनी आपल्या दोन पाखरांना घेऊन समर्थ पणे पुढे निघाली. आपण जे सोसलं ते दुसऱ्या कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी कोल्हापुरात "अवनि" संस्था सुरु केली. वीटभट्टी कामगारांच्या मुलांकरता शाळा भरवण, त्याचं बालपण कोणीही हिरावून घेऊ नये म्हणून त्या अतोनात झगडतात. अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारीही त्यांची संस्था उचलत आहे. बेघर स्त्रियांनाही त्या मोलाची मदत करून त्याचं पुनर्वसन करत आहेत. हे करताना ही त्यांना खूप मानसिक त्रासांना सामोर जावं लागलं. पण, त्या डगमगल्या नाहीत, शेवटी काय तर, "हत्ती चालला की कुत्री भुकंतच असतात". त्यांच्या कामाची दखल गांधीजींचे नातू अरुण गांधीनी घेतली. दोन्ही संस्था मिळून खूप मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यांना आजही धमक्या येतात, आजही त्या लढतच आहेत. 


त्यांच्या चेहऱ्यावरच तेज अन् तडफदारपणा त्यांच्या आवाजातून जसा जाणवतो तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वातूनही जाणवतो. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला त्यांनी जे उत्तर दिलं ते सर्रकन काळजात भिडलं आहे. "मी कोणालाच भीत नाही, अजिबात भीत नाही, जास्तीत जास्त काय करणार हे, मारून टाकणार ना? मारून टाका." दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे क्वचितच भेटतात, अन समाजासाठी सर्वस्व पणाला लावणारे सुद्धा! अशा या महान नारीस माझा त्रिवार सलाम! डाईंग टू मीट हर!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational