माझी मर्दानी!
माझी मर्दानी!


मी मकरंद!
मी मकरंद देशपांडे, या कथेचा नायक, पण तुम्ही जसं जसे पुढे वाचत जालं ना मग तुम्हाला मध्येच प्रश्न पडेल, अरे बापरे हा पांचट नायक आहे, काही आहे की नाही याच्यात दम? पण, मग तुम्हाला ही कथा कधी कळलीच नसती आणि देवाने सगळ्यांना वेगवेगळ्या साच्यात घालून जन्माला घातलं आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
मी मुळचा पुण्याचा, घरात लाडावलेला एकुलता एक मुलगा. इंजिनियरिंगला मला कोल्हापुरला डी.वाय.पाटील कॉलेजला ऍडमिशन मिळाल, खूप प्रयत्न केला होता कि पुण्यात किंवा मुंबई मध्ये अडमिशन मिळत का! पण, नाही मिळालं. गेली २ वर्षे मी इथेच आहे, या रांगड्या लोकांमध्ये राहताना आधी प्रचंड त्रास झाला, आधीच मी कोल्हापूर बद्दल बरचं ऐकून होतो, त्यात इथल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे तर मी अचाटच झालो. इथे मुली सुद्धा जातो येतो करतात! किती भयानक आहे ना? अजून दोन वर्षे इथेच काढायची या विचाराने पण अंगावर काटा येतो माझ्या. या काट्यांना बाजूला सारत आज हॉस्टेल मध्ये माझा वाढदिवस भन्नाट साजरा केला आम्ही. तरी माझे मित्र मला बावळट नाही भेटले हे नशीबच म्हणाव लागेल.
कोल्हापुरची माणस रांगडी जरी असली तरी ती जीव ओवाळून टाकणाऱ्या टाकणाऱ्यांपैकी आहेत. एवढ्या कडक आणि शिस्तीच्या आमच्या हॉस्टेलमध्ये मंगेश पाटील उर्फ भावाने केक सोबत मादक द्रव्यांचा साचा घेऊन पाईपवरून आत येण्याचा रंजक कारभार उरकला. कमाल आहे या मुलाची, दोन वर्षाच्या मैत्रीत तो जीवावर खेळला. हे अशे बरेचं किस्से आहेत कोल्हापूरकरांच्या भन्नाट प्रेमाचे अन जिगरी मैत्रीचे.
आयुष्य जगायचं तर नाद खुळा अन काही करायचं तर काटा किर्रर्रच असलं पाहिजे.
--------------------------
ट्रेन...
सेमिस्टर उरकलं होत, आतेबहिणीच लग्न गाठायचं होत, ऐन परीक्षेच्या काळात तिचं लग्न ठरलं होतं म्हणून बाबांनीच माझी डायरेक्ट तिकीट काढली होती. एकतर लहानपणापासून विमानाचा प्रवास किंवा स्वतः च्या कार मधूनच फिरायची सवय, त्यामुळे ट्रेन वरून माझा मुड एकदम खराब झाला होता.
सगळी भाऊ मंडळी मला पहिल्या वहिल्या ट्रेन प्रवासाला सोडायला स्टेशनवर आले होते. आमचे पाटील भाऊंना जेव्हा कळालं मला ट्रेन आवडत नाही, कार काढून जायला तयार होते एका पायावर! पण, काकू थोड्या नाही जास्तीच घाबरल्या होत्या म्हणून मी मंग्याची समजूत काढली. पूर्ण बोगीत आमचा दंगा सुरू होता, जशी ट्रेन सुरू झाली सगळे पटापट खाली उतरले. मंग्या तेवढा उतरायच्या मुड मध्ये नव्हता! त्याने जोरात मिठी मारली मला तसं मी पण बावळटाला कडकडून पप्पी दिली तसा तो झटकन बाजूला झाला अन गाल पुसून म्हणाला, "भावा हा हक्क फक्त तुझ्या वाहिनीचा! अन दुसऱ्याच क्षणात त्याने पण मला पप्पी दिली आणि बोलला, "हे वहिनीला सांगू नकोस तुझ्या!" इतकं बोलून तो झपकन ट्रेन मधून उतरला!
दोघेही हसत हसत एकमेकांकडे पाहत उभे होतो! माझ्या पहिल्या वहिल्या ट्रेन प्रवासाची ही सुरुवात होती! अन आयुष्यभराच्या मैत्रीची पण!
--------------------------
जयसिंगपूरची माधुरी!
सह्याद्री एक्सप्रेस अशी जात होती जशी बैलगाडीच! प्रत्येक छोट्या मोठ्या स्टेशनवर थांबत जाणार होती, वैताग!
कानात हेडफोन लाऊन मी माझी फेव्हरेट गझल्स ऐकायला लागलो!
ट्रेन मिरजेत येऊन थांबल्याची जाणीव पेसेंजर्स बोगीत आल्यावर झाली. तोच विंडोमधून एक मुलगा एका इसमाला बेदम मारताना नजरेस पडला. पाण्याची बाटली घेण्यासाठी मी खाली उतरलो तोच पाहतो काय! एक मुलगी त्या इसमाला मारत होती, अशी का तशी, किक्स वर किक्स, बुक्क्या! त्या बिचाऱ्याची बायको तिला विनवण्या करत होती, "ताई, माफ करा त्यांना, सोडा त्यांना!" तसा तिचा मार अजून बेफान झाला! एक आजोबा येऊन म्हणाले, "सोड, बाळा त्याला!"
तशी ती बोलली,"आजोबा याने पाय पकडून तुमची माफी मागायला हवी!" लगेचच तो इसम त्या आजोबांच्या पायात पडला! माफ करा म्हणून गयावया करायला लागला! तोच ती त्याच्या बायकोवर डाफरली, "ज्याला मोठ्यांची किंमत नाही,अश्या हलकट माणसाला नवरा केलंस तू! दया वाटते तुझी! असल्या नीच माणसाशी लग्न केलंस!" ते आजोबा तिला शांत करत होते, "जाऊ दे बाळ, सोड त्याला! तुझी ट्रेन चुकेल इथेच घोळ घालत बसलीस तर!"
या सगळ्या गोंधळात मीही विसरलो होतो माझी ट्रेन सुरू झाली तसा मी पटकन चढून गेलो! वाचलो बाबा, हुश्श!
पाण्याचा घोट घेत घेत मला ती मुलगी आठवली, गोरा रंग, बॉयकट, पाणीदार डोळे, करारीपणा! आणि तिच्या लाथा बुक्क्या! तोच ती माझ्यासमोर येऊन म्हणाली,"ओय, ही माझी सीट आहे!" फुररर...सार पाणी तिच्या अंगावर!
मी- सॉरी! एक्सट्रीमली सॉरी! मी ते पाणी...अगदीच बावळटपणा झाला माझ्याकडून, सो सॉरी!
ती- पुण्याचे दिसताय!
तिच्या चेहऱ्यावरचा विपर्यास स्पष्ट दिसत होता!
ती - तरीच!
गंडलो ना राव!
मी- आणि तुम्ही?
ती- जयसिंगपूर!
तिला जागा देत मी बोललो," मघाशी पाहिलं मी तुम्हांला. तुम्ही कराटे शिकलाय का?"
ती- नाही , तायक्वोंडो!
दोघेही आम्ही आमने सामने बसलो होतो! हळुहळू गप्पा वाढल्या.
ती- तुला वाटलं असेल मी उगीचच मारत होते त्या माणसाला,तो त्या आजोबांचा मुलगा होता, स्वतः च्या जन्मदात्या बापाला तो धक्काबुक्की करत होता, अशी सनकली ना माझी! म्हणून...
मी- विकृत मानसिकता! अश्या माणसांना भर चौकात उभं करून चाबकाचे फटके दिले पाहिजेत.
ती- बरोबर बोललास पण, मनाला फार लागत रे! सॉरी हा, मला अहो जाओ करता येत नाही! माझ्या जे मनात असतं तेच तोंडात असतं! तोंडात अहो अन मनात शिव्या नसतात माझ्या.
मी- चालेल ग! तुला चालेल ना मी अरे तुरे केलेलं.
दोघेही हसलो!
मी- उप्स ओळख करून दिलीच नाही मी! मी मकरंद देशपांडे, इंजिनीअरिंग करतोय डी. वाय. पाटील कोल्हापूर मध्ये! थर्ड इयर! तू काय करतेस?
ती- मी बी.बी.ए थर्ड इयरला आहे, विवेकानंद कॉलेज!
आम्ही दोघेही मुंबईलाच चाललो होतो! जोपर्यंत पेसेंजर्सनी लाईट ऑफ नाही केली तोपर्यंत आमच्या वेगवेगळ्या विषयांवर बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. कोल्हापुरी मिसळ ते पांढरा तांबडा पासून रंकाळा ते एकमेकांचे घरचे, मित्र! असं वाटतच नव्हतं की आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो!
बोलतात ना जे तुमच्यासाठी बनलं आहे ते तुम्हांला असंच अचानक भेटून जातं अन कळतही नाही कधी तुम्ही एक झालात!
या ट्रेन जर्नी मुळे मला माझी फायटर पार्टनर भेटली!
----------------------------
डेस्टिनी अर्थात नशीब!
दोघेही दादरला उतरलो, गप्पांच्या ओघात एकमेकांचे मोबाईल नंबर देखील घ्यायला विसरलो! तिची कॅब गेल्यावर माझ्या लक्षात आलं! काय भयानक फिलिंग होती ती! हॉटेलवर पोहचून पण तिचं माझ्या डोक्यात फिरत होती! नंबर तरी घ्यायला हवा होता! स्वतःच्या बावळटपणावर इतका राग येत होता काय सांगू!
आई बाबा खूप खूष होते, त्यांच तर भविष्याच प्लॅनिंग सुरू होत! माझ्यासाठी कोणत्या मुली योग्य आहेत आणि कोण कोणाची रिलेटिव्ह आहे, ताई, काका, मामा, मामी, वैगेरे वैगेरे! वैतागून मी जिम कुठे आहे पाहण्यासाठी बाहेर पडलो! जिमच्या आत जाताच किक बॉक्सिंग करताना मला माधुरी नजरेस पडली! तोच माझे आत्ते आणि मामे भाऊ, बहीण मला ओढून घेऊन गेले! सगळ्यांचा एकच गलका उडाला होता! काय काय गप्पा सुरु झाल्या होत्या! लहानपणापासून ते गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड कशे आहेत ते मला अजून एकपण मुलगी पटली नाही यावर माझा धिक्कार सुरू होता!
ताईच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू होणार म्हणून सगळे आवरायला आपापल्या रूम्सवर परतलो, तोच माधुरी सुंदर गुलाबी साडीमध्ये माझ्यासमोर उभी राहिली! क्षणभर वाटलं एखादी परीच माझ्यासमोर उभी आहे! तिचे डोळे मला हिप्नॉटाईज करत होते! तिने मला हाताला हलकेच पंच मारून जाग केलं!
ती- कुठे हरवला आहेस?? लक्ष कुठे आहे तुझं?? गर्लफ्रेंड च्या आठवणीत का?
मी- मी नाहीतर, छे ग मला कुठे आली गर्लफ्रेंड!
ती- अच्छा! इकडे कसा??
मी- माझ्या आत्तेबहिनीच लग्न आहे अन तू?
ती- कुलकर्णी ??
मी- हो! तू पण...पाटील??
दोघेही हसलो! मोबाईल हातात असूनही नंबर मागायचं माझं धाडस काही होईना, ती काय विचार करेल पासून तिने मारलं म्हणजे! अशे विचार माझ्या डोक्यामध्ये नाचू लागले! हा मंग्या माझ्या भाषेची वाट लावणार आहे आता! तोच ती बोलली, "अरे आपण नंबरच शेयर नाही केले! नंबर सांग तुझा मिस्ड कॉल देते नंबर सेव्ह कर माझा!"
मी- *********
अगदी पोपटासारखा पटकन बोलून गेलो, तोच तिला हाक ऐकू आली अन ती बाय नंतर बोलू असं सांगून निघून गेली!
तिचा पाठमोरा देह मला एक हुरहूर देत होता! हीच ती जिच्याशी मला सार आयुष्य घालवायच आहे!
कॉरिडॉर मध्ये वेड्यासारखा अक्षरशः मी नाचत होतो!
आयुष्यात पहिल्यांदाच ही फिलींग होती! मी जयसिंगपूरच्या माधुरीच्या प्रेमात पडलो होतो! अर्थात यात माझी मेहनत काहीच नव्हती, Destiny wanted us to be together that's why we met!
मंग्याला फोन लाऊन शॉर्ट मध्ये बोललो, भावा I'm in love! रूमकडे जात जात घडलेला सारा प्रकार भावाला सांगितला!फोन ठेवता ठेवता का कोणास ठाऊक मी आपसूकच बोलून गेलो, "You should always listen to your intuition and automatically you'll find your life in front of you!"
-------------------------------
प्रपोज!
सुट्ट्या संपल्या होत्या, आईची लाडू, चिवडाची लगबग सुरू होती. कोल्हापूरची ओढ आता जास्ती वाढली होती. माधुरी आता मधू झाली होती अन मी तिचा मंकू! रोज एक तरी फोन होत होता! आमची गट्टी खूप छान जमली होती. मंग्यामधला लवगुरु जागृत झाला होता, रोज तो प्रपोज साठी नवीन आयडीया द्यायचा! पण, माझं काही धाडस होत नव्हतं!
कॉलेज सुरू होऊन आठवडा झाला होता, मंग्या माझ्या रोज मागे लागायचा, डेट ला घेऊन जा, फिरायला जा! पण, माझं मन काही धाडस करत नव्हतं! मंग्या मला तू दगड आहेस म्हणत होता, मुलगी जाईल अन तू बस मग तुनतुना वाजवत म्हणून ओरडत होता, तोच मधूचा फोन आला! माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता चक्क मधूने मला माझ्यासोबत बाहेर येणार का? विचारलं होत! मला पंख लागले होते प्रेमाचे!
रविवारचा दिवस उजाडला, आरश्यासमोर उभा राहून मी मंग्याला प्रपोजल चा डेमो दाखवत होतो! मंग्या खूप चिडला होता, तो मला समजावत होता, मिळमिळीत वाटतंय थोडा रांगडेपणा आण, मर्द बन भावा! मार शड्डू! अर्धा दिवस यातच गेला! पटापट रेडी होऊन मी बाईक घेऊन निघालो! रंकाळा गाठला! बाईक पार्क केली, तोच पाठीमागून हॉर्न ऐकू आला, मधू एक मोहक स्मितहास्य करून हाय बोलत होती पण, मला काय बोलाव सुचत नव्हतं! तिने बाईक पार्क केली, दोघेही संध्यामठ जवळ चालत चालत आलो, गप्पांच्या ओघात खूप चाललो होतो!
प्रपोज करण्यासाठी मी शब्द जुळवत होतो पण, तिचे भुरभुरणारे केस मला जाळ्यात अडकवत होते, काय बोलू , कस करू काही सुचत नव्हतं! तोच भर रस्त्यात मधू एका गुढघ्यावर खाली बसली, "मक्या मला तू खूप आवडतोस, खूप प्रेम करते मी तुझ्यावर, टाईमपास नाही हा! नवरा होशील का माझा?"
मी हबकलोच ना राव! काही कळेना, आनंद खूप झाला होता पण, बॉडी स्तब्ध झाली होती.
ती- तुझ्यावर काही जबरदस्ती नाही माझी, हो किंवा नाही स्पष्ट बोल! अन खरं बोल! प्रेमात जबरदस्ती नसते!
तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं! चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा जास्तीच चमकत होता अन तिच्या गालावर ओघळेलला अश्रू!
झटकन खाली बसलो, तिचा अश्रू हातात झेलून तिला बोललो, "हा बावळट नवरा म्हणून चालेल ना तुला??"
तशी ती इतकी गोड हसली!
मी- मी पण खूप प्रेम करतो तुझ्यावर, आयुष्यभरासाठी तुझ्या किक्स खायला तयार आहे मी! I love you Madhu!
पहिल्यांदा माझी होणारी बायको काय गोड लाजली म्हणून सांगू तुम्हांला!
आमची ट्रेन पटरीवर धावू लागली होती!
---------------------------
आई रॉक्स!
आमचं ठरलं होतं जोपर्यंत मधूच एम.बी.ए. पूर्ण होत नाही तोपर्यंत घरी काही बोलायचं नाही! माझं एम.बी.ए होऊन मी चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो तसा माझ्या घरी मुलींचे फोटो गस्त घालू लागले!
मधू शेवटच्या वर्षात होती, अन माझी आई रागात! तिला आता पूर्ण शंका नाही सुगावा लागला होता मधू अन माझ्या बद्दल! फेसबुकवर आमचे फोटो पाहून अन मंग्याला जेवायला घालून, शपथ घालून तिने सगळं काढून घेतलं!
त्याच रात्री मंग्या समोर तिच्यातला कर्मठपणा जागा झाला होता अन मुलगा गमावण्याची इनसिक्युरिटी!
आई- ही मधू कोण?
मी- मैत्रीण आहे!
आई- फक्त मैत्रीण की आणखी काही?
तसा मंग्याच्या मेसेज मुळे मी चपापण्याची ऍकटिंग बरोबर निभावून नेली.
मी- मी सांगणारच होतो तुला मधू आणि माझ्या प्रेमाबद्दल!
तसा आईचा चेहरा लाल अन गंभीर झाला!
मी- मला तिच्याशी लग्न करायचं आहे!
आई- आडनाव काय तिचं?
मी- पाटील.
आई- मराठा! आणि आपण कोण आहोत हे लक्षात आहे का तुझ्या?
मी- आई तू बोलतेयस हे?
आई- हो मीच! तू विचारच कसा केलास या सगळ्याचा?
मी- आई प्रेम विचार करून होत नाही, तू केला होतास का बाबांशी लग्न करताना?
मंग्या थोडासा हसला अन जीभ चावून बाबांच्या शेजारी जाऊन उभा राहिला.
आई- आम्ही दोघेही...
मी- हो माहितेय मला, एकाच जातीतले होतात पण, बाबा दुसऱ्या जातीत असते तर केलं नसतं का तू लग्न? फसवलं असतं का बाबांना? त्या मुलीला मी गर्लफ्रेंड म्हणून कधीच प्रपोज नाही केलं, ती मला माझी अर्धांगिनी म्हणून हवी आहे, आयुष्यभरासाठी! तिला एकदा भेट तरी तू मग तूच...
मी अगदी काकुळतीला आलो होतो तोच, हे त्रिकुट जोरजोरात हसायला लागले! बेडरूममध्ये लपून बसलेली मधू बाहेर येऊन या तिघांसोबत माझी मज्जा घेत होती!
मंग्या आणि आईच मेतकूट काय सांगावं! मंग्याने वहिनीला परस्पर सासूबाईंशी भेटवूनही दिल होत! माझ्या घरच्यांकडून आमच्या नात्याला हिरवा सिग्नल मिळाला होता! आता वेळ होती पाटलांची!
--------------------------
माझी मर्दानी!
मधूचा शेवटचा पेपर पार पडला होता, आता मला जयसिंगपूर गाठून मधूच्या बाबांना पटवायच होत! जे खूप अवघड काम होत. एकतर पाटील त्यातून ९६कुळी! त्यात मंग्याने माझी अवस्था वाईट करून सोडली होती! खिश्यात कार्ड ठेवू नकोस, सुट्टे पैसे ठेव, मारायला बिरायला लागले तर पटकन पळून जायचं ते पोलीस स्टेशन गाठायचं, आम्ही असूच तिच्या घराबाहेर पण, त्यांच्या फोजफाट्या जवळ काही चाललं नाही तर! म्हणून हिरोगीरी करायची नाही! लगेच पोलिस गाठायचे. हे असले सल्ले देऊन माझी हालत बिकट करून सोडली होती. मधू सोबत मी जयसिंगपूर गाठलं! मनात देवाच्या धावा सुरू होत्या, काय बोलू कसं बोलू काही कळत नव्हतं!
पाटलांच्या वाड्यासमोर उभा राहून मी माझं भविष्य काय असेल याचा विचार करत होतो! ओवाळायला आलेल्या आईसमोर तुझा जावई म्हणून माझी डायरेक्ट ओळख करून देऊन माझा हात पकडून ती मला आत घेऊन गेली, सारी माणसे पाहत होती, वाड्याच्या व्हरांड्यात मध्यभागी तिचे बाबा भल्यामोठया खुर्चीत बसले होते, ती थेट मला घेऊन त्यांच्या पुढे उभी राहिली.
ती- आबा! हा तुमचा होणारा जावई! मला याच्याशीच लग्न करायचंय, त्या सरनोबतशी नाही! माझं याच्यावर प्रेम आहे अन याचं पण माझ्यावर आहे.
चार पाच तगडी मुले धावून आलीत! माझ्यापुढे येऊन मधू बोलली, "खबरदार याच्या अंगाला हात लावाल, मुळासकट हात उपटून टाकीन."
तशी ती दोन पावलं मागे गेली, मला तर हे सारं फिल्मी वाटायला लागलं होतं! आबा म्हणून धावत जाऊन ती त्यांना बिलगली, ते दोघे आत निघून गेले, खोलीचा दरवाजा बंद होण्याआधी आतून आवाज आला आबांचा, "याच्या केसालाही धक्का लागता कामा नये."
मी शांतपणे उभा राहिलो, पंधरा मिनिटांनी मधू मला घेऊन आत गेली! आबांनी मला जवळ बोलवून घट्ट मिठी मारली!
ते फक्त एकच वाक्य बोलले,"माझ्या पोरीला जपा"
मी- आबा जस तुम्ही जपला आहात तशीच ती तुम्हाला लग्नानंतर ही दिसेल हे माझं वचन आहे तुम्हाला.
आमचं लग्न दणक्यात जयसिंगपूरला झालं! आज लग्नाला पाच वर्ष पूर्ण होऊन गेलेत मी आजही विचारतो मधूला, तिने पंधरा मिनिटात कसं समजावलं आबांना! तेव्हा ती माझे गालगुच्चे घेऊन म्हणते,"तू आहेसच असा की आबा लगेच हो म्हणाले!" वरती त्यात फोडणी म्हणून, "जेव्हा तुझी मुलगी जावई पसंत करून घेऊन येईल तेव्हा सांगशील तुझ्यात आणि आरु मध्ये रुम मध्ये काय बोलणं झालं?"
मला कळलंच नाही कधी मधू कानामागून आली अन तिखट होऊन माझ्या मिळमिळीत आयुष्याला झणझणीत फोडणी मिळाली! एक सांगायचं राहून गेलं, वर्षातून एकदा तरी आम्ही आमची लव्हस्टोरी पुन्हा जगतो, पुन्हा तिचं ट्रेन अन आयुष्यभराचा प्रवास! तुम्हीही वर्षातून एकदा तरी तुमच्या नात्याला पुन्हा जगा अगदी सुरुवातीपासून!
।। शुभं भवन्तु ।।