परीक्षेचे दिवस
परीक्षेचे दिवस
शाळेमध्ये असताना जेव्हा परीक्षा जवळ यायची.. तेव्हा खरे अभ्यासाचे प्रचंड वेध लागायचे... मग काय म्हणुन सांगु.. अभ्यासाची खटाटोप रात्रीची जागरण करून असायची... आई तर ओरडायची... "ह्यासाठी रोज अभ्यास करायचा.. मग परीक्षा जवळ आल्यावर विहीर खणायची गरज पडणार नाही..." मात्र एक व्यक्ती माझ्या बाजुने कायम असायची.. ते म्हणजे बाबा.. त्यांचं एक गाणं माझ्या फेवर मध्ये असायचं.. ते म्हणजे .. पापा केहते है बडा नाम करेगा.. बेटा हमारा ऐसा काम करेगा..
मला अजुनही आठवतात ते परीक्षेचे दिवस.. मी शाळेत सातवी मध्ये असतानाची गोष्ट... दुसरी घटक चाचणी (नऊ माही परीक्षा) नंतर बाईंनी मला टीचर रूम मध्ये भेटायला बोलावलं आणि खडसावुन बोलल्या.. "जर तुला वार्षिक परीक्षेत कमी मार्क मिळाले.. तर तुझा वर्ग बदलला जाईल.. क मधुन ड मध्ये गेली तर तुला अर्ध हिंदी आणि अर्ध संस्कृत विषय मिळणार नाही.. दहावी पर्यंत कायम ड मध्ये बसुन फक्त पुर्ण हिंदी विषय राहणार.."
शाळेतून घरी आल्यानंतर तिन्ही सांजेला बाबांची वाट मी अगदी देवा सारखी पाहत होती.. कारण आईला अगोदर ही बाब सांगितली असती.. तर वादळ येणार असल्याची खात्री होती.. रात्रीचे जेवण आटपल्या नंतर मी बाबांना गॅलरीत बोलावून सगळं काही सांगितलं.. बाबांनी माझी पाठ थोपटत हसत माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवला.. "एवढंच ना.. आज पासुन वार्षिक परीक्षा होईपर्यंत पुर्णपणे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित कर.. आणि तु करशील ह्याची मला खात्री आहे.. पण आईपासुन ही गोष्ट लपवणे चुकीचे आहे.." बाबांनी आईला सगळं स्पष्टपणे सांगितलं.. अन् माझा मार्ग मोकळा केला..
त्या रात्री अभ्यास करायचे मी मनावर घेतले.. किचन मधील बल्बच्या प्रकाशात बसली.. पण किचन मध्ये फॅन नसल्या कारणाने खुप गरम होत होतं.. शिवाय उजेडामुळे कोणालाच व्यवस्थित झोप लागत नाहीये हे माझ्या ध्यानात आलं.. मग ठरवलं.. आपल्यामुळे घरातल्यांना कशाला त्रास.. म्हणून दुसऱ्या दिवशी गॅलरी मध्ये बसली.. आमच्या म्हाडाच्या बिल्डिंग असल्यामुळे कॉमन गॅलरी आहे.. त्या गॅलरीच्या जिन्या कडील लाईट खाली मी चटई टाकून अभ्यासाचे प्रस्थान मांडले.. मग बाबांनी सुद्धा आमच्या घराच्या दरवाजा बाहेर चटई टाकुन पडवी घेतली..
रोज बाबा कामावरून आले की, प्रोत्साहन द्यायचे कधीच विसरले नाही.. त्यामुळे माझी वार्षिक परीक्षा होई पर्यंत मी अभ्यासावर जोर देत राहिली.. परीक्षेचे पेपर खुप सॉलिड गेले होते.. जेव्हा निकाल लागला तेव्हा घरात कुणाच्याच आनंदाला सीमा राहिली नव्हती.. कारण वर्षभराची सरासरी पकडुन मला फर्स्ट क्लास मिळाला होता.. त्यामुळे वर्ग बदलला गेला नाही.. ही निव्वळ कृपा फक्त बाबांची होती.. तेव्हापासून मला गॅलरीत अभ्यास करायला बसायची सवय लागुनच गेली.. भले बाबा दरवाज्या बाहेर अंथरून टाकायचे... पण रात्रीची पहाट होई पर्यंत त्यांची झोप सावध असायची...
बारावी पास झाल्यानंतर घरच्या परिस्थीतीमुळे मला जॉब करून शिक्षण करणे भाग होते.. त्यामुळे मी कलिना युनिव्हर्सिटी मध्ये दाखला घेतला.. परंतु ऑफीसचा ताण अन् प्रवास ह्यामुळे अभ्यासात मन लागायचे नाही.. त्यामुळे शिक्षणामध्ये पाच वर्षाचा गॅप पडला.. जेव्हा चांगला जॉब मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी जायची.. तेव्हा लक्षात आलं की, बारावी पासला कोणी विचारत नाही.. ही गोष्ट जेव्हा मी बाबांना सांगितली.. त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा माझ्याकडे हट्ट केला..
माझे लग्न ज्या वर्षी झाले... त्या वर्षी माझी टी. वाय. बिकॉम् ची परीक्षा होती.. गरोदर असल्यामुळे मला पाचवा महिना लागला होता.. परीक्षे अगोदर नवऱ्याने काही दिवस माहेरी पाठवलं.. नेहमी प्रमाणे रात्री माझी गॅलरी अन् बाबांची दरवाज्या बाहेरील अंथरूण माझ्या परीक्षे पर्यंत बुक झालं होतं.. गर्भवती असल्यामुळे बाबा माझ्यासाठी मध्यरात्री गरम दुध, सुकामेवा तर कधी एखादं फळं हातात आणुन द्यायचे.. अन् जास्त त्रास करून घेऊ नकोस म्हणुन सांगायचे.. निकाल लागल्यानंतर उत्साहाने त्यांनी कौतुकाची दवंडीच पेटवली... कारण पोटात मुलं असताना अभ्यास करून परीक्षा पास झाल्याचा त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता..
बाबांच्या हास्यामागची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे... गॅलरीत आमच्या दरवाज्या बाहेर बाबा एका बाजूस अंथरूण करायचे... पण तरी सुद्धा काही लोकांना का कुणास ठाऊक अडचण व्हायची.. लोकं तोंड वाकडं करत पुटपुटत जायची.. काही जण माझी टिंगल करत म्हणायचे.. परीक्षा नक्की कुणाची? तुझी की तुझ्या बाबांची??? पण बाबांनी त्याच्या वागण्या अन् बोलण्याकडे कधीच लक्ष दिलं नाही.. मला हसत बोलायचे,"कोणी कितीही काही बोललं.. तरी आपण त्याच्या कडे लक्ष द्यायचं नाही.. आपण फक्त आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करायचं.. दुसऱ्यां मुळे तर स्वतःचं मन कधीच विचलित करू नये.. मग त्या परीक्षा शाळेच्या असो की, मग आयुष्यातील वळण वाटेवरच्या... आपण आपलं ध्येय साध्य करायचं..."
मला मुलगी झाल्यानंतर पुढील शिक्षणा मध्ये दोन वर्षाचा गॅप पडला.. एम् कॉम च्या परीक्षेच्या वेळी मात्र बाबांची साथ सोबत राहिली नव्हती.. पण त्यांचे आत्मविश्वासाचे शब्द कायम माझ्या सोबतीस राहून गेले...
