परी
परी
रात्री झोपताना आजी मला नेहमी गोष्ट सांगायची. तशी आज ही तिने गोष्ट सांगितली, एका सुंदर जादुच्या परीची. मला खूपच आवडली. "अजून एक सांग ना गं आजी", मी हट्ट केला, पण मला गोष्ट सांगताना आजीच गेली झोपून. मला झोपच येईना. गोष्टीतली परी सारखी दिसायची. बराच वेळ मी ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो. आजी छान घोरत होती.
एवढ्यात "ईश ईश" अश्या मला कोणी तरी हाका मारल्या. मी घाबरलो व डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपायचा प्रयत्न केला. पण थोड्या वेळाने परत आवाज आला . मी पांघरुणातून डोके बाहेर काढले व डोळे किलकिले करून आवाजाच्या दिशेने पाहिले तर काय! आजीच्या परी कथेतली परी दरवाज्यात उभी! आजीने सांगितली तशीच.
सफेद लांब लचक फ्रॉक, मानेवर काळे लांब केस, डोक्यावर हिरे माणिकांनी जडवलेला नाजूक मुकूट, कानांत, हातात, गळ्यात, शुभ्र मोत्यांचे दागिने आणि स्टार वाली सफेद जादूची काठी. मी तिच्याकडे बघतच राहिलो. तर ती म्हणाली, " चल ईश. तुला माझ्या राज्यात यायचंय ना? चल मग, ये. मी तुला न्यायला आलेय."
अगं पण आजी, आई सगळे झोपलेत. त्यांची परवानगी नको का घ्यायला?"
"अरे त्यांना ऊठवू नको. मी लगेच घेऊन येईन तुला"
"खरंच, चल येतो मी".
"हं बस माझ्या पाठीवर. मी पंख पसरवते, त्यांना घट्ट धर. घाबरू नको हं."
परी थोडी वाकली मी तिच्या पाठीवर चढलो. तिने पंख फुलवले आणि हातातली काठी फिरवली आणि विमानासारखी मला घेऊन ती आकाश मार्गाने जाऊ लागली. ढगातुन जाताना लपाछपी खेळल्यासारखे वाटले. वर खाली, वर खाली असे झोके घेत परी राणी उडत होती. चंदा मामा दिसला आणि बापरे, किती त्या चांदण्या! किती किती मजा आली त्या चांदण्यांच्या जाळ्यातून जाताना. त्यांना हात लावावा असे वाटले पण परीने सांगितले होते दोन्ही हातांनी तिचे पंख घट्ट धरायचे.
सगळ्या तारकांना "हॅलो, हाय" करत परी मला तिच्या राज्यात घेवून आली. मला घेऊन ती राजवाड्यात आली. तिथे मोठ्या सिंहासनावर परीच्या मांसाहेब बसल्या होत्या. मी त्यांना वाकुन नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. नंतर त्या परीला म्हणाल्या, "ह्याला सगळं राज्य दाखव. त्याला का
य काय आवडतं ते सगळं दे. खेळाचे क्रिकेट किट्स, बुद्धिबळ, हॉकी, फुटबॉल, संगिताचे तबला, पियानो, ड्रम, बाजा, खायचे चॉकोलेटस, केक, आयस्क्रीम काय हवं ते दे. आणि मला म्हणाल्या, "घे हां सगळं भरपूर". वाह! मी मातोश्रींवर जाम खुश झालो आणि पुन्हा त्यांना नमस्कार केला.
बाहेर आल्यावर मी परीला म्हणालो, "मला ना गोष्टीची पुस्तके ही दे हं."
"कोणती पुस्तके आवडतात तुला?"
"मला ना, मोठ्ठा शास्त्रज्ञ व्हायचंय. नवीन नवीन शोध लावयचेय. तर अशी कोणती चांगली असतील ती सगळी दे."
"बरं बरं"
"चल भूक लागली ना? थोडं खाऊन घे. मग तुला बाग दाखवते."
परी मला एका मोठ्या हॉल मध्ये घेऊन गेली. बापरे! काय काय खायला ठेवलं होतं तिथे. एका बाजूला सगळ्या मिठाया. दुसऱ्या बाजूला सगळे स्नॅक्स. एवढे सगळे बघून काहीच नको वाटले. पण परीने खूप आग्रह केला. मग मी दोन रसगुल्ले, एक चमचम, एक पेढा आणि दोन गरमा गरम वडे खाल्ले. पोट खूप भरलं. नंतर परी मला चॉकलेटच्या दालनात घेऊन गेली.
"अबब! किती प्रकारच्या चॉकलेटस. एवढ्या साऱ्या चॉकोलेटस आमच्याकडे दुकानात पण नसतात. किती पाहिजेत तेवढ्या घ्यायला सांगितले. मी थोड्याच म्हणजे वीस पंचवीस घेतल्या वेगवेगळ्या, जास्त हावरटपणा बरा नव्हे ना! मग परी म्हणाली, "आता आपण घोड्याच्या बग्गीतून बागेचा फेरफटका घ्यायचा. येथे तुला फुले, फळे, सुंदर सुंदर पक्षी खूप दिसतील". नंतर एका मस्त सजवलेल्या घोडा गाडीत आम्ही बसलो. बाग एवढी छान आणि मोठी होती, दोन तास फिरत होतो.
थोढ्या वेळाने परी म्हणाली, "चल आता निघायला हवे. तुझ्या सगळ्या वस्तु देते तुझ्या बरोबर. असे म्हणून भली मोठी बॅग माझ्याकडे दिली. बापरे! मला ती उचलता पण येत नव्हती. परीला माझी चिंता कळली. ती म्हणाली, "अरे मी धरणार ती. तू नको काळजी करू." असं म्हणून परीने मला पाठीवर बसवले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
खाली आल्यावर मी उतरताना बॅग पण हातात धरली आणि उतरलो पण माझा पाय घसरला व मी धबकन् खाली पडलो. मला सगळ्यांच्या हसण्याचा आवाज आला. बघतो तर आई, आजी आणि डॅडा माझ्याकडे पाहून हसत होते कारण मी झोपेत कॉटवरून खाली पडलो होतो.