प्रेमाची वादळवाट
प्रेमाची वादळवाट
रोहिणी.. गावच्या पाटलांची मुलगी.. पैशाची कुठलीच कमी नव्हती.. पण स्वतच्या हिमतीवर काही करून दाखवायची इच्छा प्रबळ होती.. एमबीएचे शिक्षण पुण्यात पूर्ण करून कामासाठी मुंबईमध्ये स्थलांतर झाली..
नवीन जागा.. नवीन लोक.. तिच्यासाठी सगळंच काही नवीन होतं.. हळू हळू राहत्या ठिकाणी सगळ्यांची ओळख झाली.. रोहिणी सुंदर, धाडसी,चपळ असल्यामुळे तिच्याकडे एक वेगळं असं आकर्षण होतं.. प्रत्येक जण तिच्याशी मैत्री करू पाहत होता.. तिचा हसरा स्वभाव अन् गालावर पडणारी खळी सगळ्यांवर भुरळ पाडत होती..
ज्या सोसायटीमध्ये रोहिणी भाड्याने राहत होती.. तिथे भाड्याने प्रितेश देखील राहत होता.. काही दिवसांनी प्रितेशशी मैत्री जमली.. सतत फोनवर चॅटिंग करणं.. बाहेर भेटायला जाणे सुरू झाले.. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.. रोहिणी प्रितेशच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की, तो जे सांगेल ते ती करत होती.. मागचा पुढचा कुठल्याच गोष्टीचा विचार तिने केला नाही.. फक्त आंधळा विश्वास त्याच्यावर झोकून देत चालली होती..
प्रेमाला संपुर्ण वर्ष पालटलं.. तरी सुद्धा प्रितेशने घरातील कुठल्याच व्यक्तीची रोहिणीची भेट काय पण चक्क फोनवर बोलणं देखील करून दिलेलं नव्हतं.. थोडं सेटल झालो की घरी सांगायचं असं म्हणायचा..
त्यांची ही टाळण्याची वृत्ती रोहिणीच्या मनात वादळ वाऱ्याचे सुचक चिन्ह निर्माण करू लागली होती.. म्हणून तिने मनाशी दृढ निश्चय धरुन त्याच्याशी ठाम बोलायचे ठरवले..
संध्याकाळी दोघंही कामावरून घरी आल्या नंतर नेहमीप्रमाणे गच्चीवर चक्कर टाकायला गेले.. रोहिणी लग्नाचे चित्र डोळ्यासमोर उभे करू लागली.. "देवीच्या देवळात लग्न सोहळा.. मी नवारी साडीत नवरी नटलेली, अंगाला पिवळी हळद, डोक्याला मुंडावळ्या, गळ्यात फुलांच्या माळा, मेहंदीने रंगलेल्या हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ आणि तु.."
इतक्यात तिचे वाक्य तोडत प्रितेशने जे उत्तर दिले ते धक्कादायक होते.. " प्रत्येक मुलगी पहिल्या लग्नाचे स्वप्न पाहते.. आणि साहजिक तुझे सुद्धा असणार.. पण लग्न झालेल्या पुरुषाशी कदापि हे शक्य होणार नाही.." रोहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली.. डोळ्यांत वाहणारा अश्रुंचा पाऊस मनावर उधाण घेत होता.. हतबल होऊन ती उचकत बोलू लागली.. "प्रेमाचे नाटक करून माझ्या स्वप्नांचा चुराडा केलास.. तुझ्या फायद्यासाठी शारीरिक सुखाचा उपभोग घेत राहीलास.."
"माझ्या बायकोला मी तुझ्यासाठी सोडू शकत नाही.. मी असं काही केलं तर त्याचा फार मोठा परिणाम माझ्या मुलांवर वर होईल.. आपण तुझे लग्न झाल्यानंतरदेखील आपले संबंध असेच कायम ठेवू शकतो.." तो स्पष्टपणे व्यक्त झाला.. त्याचे असे फाजील उत्तर ऐकून रोहिणीच्या मनाची परिस्थिती समुद्रातील वादळात गोल फिरणाऱ्या भवऱ्यामध्ये फसण्यासारखी झाली..
"तुझ्या परिवाराला तुझ्या दुहेरी मुखवट्याचा अंदाज देखील नाही.. तुझ्या फायद्यासाठी तु माझा वापर करत राहीलास.. आणि वर तोंड करून म्हणतोय.. लग्नानंतर देखील संबंध कायम करू.. तुझ्या सारखी माणसं फसवणूक करून माझ्या सारख्या मुलीचं आयुष्य बरबाद करतात आणि आम्ही काहीच करू शकत नाही.. कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन जपते.. मी सुद्धा एक स्त्री आहे.. त्यामुळे दुसऱ्या स्त्रीच्या भरलेल्या संसारात जाऊन तिचं आयुष्य मोडकळीस आणावं.. ही माझी वृत्ती नाहीच मुळी.. पुन्हा माझ्या समोर येऊ नकोस.." एखादी नौका भर वादळात संकटाला टक्कर देत असते.. तशी ती आक्रोश करत प्रितेशला बोलली..
तो तिथून निघून गेल्यानंतर ती एकटीच मनात थैमान घातलेल्या वादळ वाटेशी संवाद साधायला लागली.. प्रेमाचे नाव घेऊन फायदा घेणारी लोकं.. फायदा करून घेतात आणि निघुन जातात.. पण टाळी कधी एका हाताने वाजत नसते.. मी माझ्या डोळ्यांवर प्रेमाची आंधळी पट्टी लाऊन त्याच्यावर एवढा विश्वास का ठेवला? का कधी त्याच्याकडे जबरदस्तीने त्याच्या परिवाराची प्रत्यक्ष रित्या चौकशी केली नाही? प्रेम आणि वासना ह्यातला फरक का ओळखू शकले नाही? असो झालं ते झालं.. कधीच कुणासाठी कोणाचं आयुष्य थांबत नसतं.. आयुष्य पडलं आहे नव्या वाटचालीसाठी.. आता मला नव्या दिशेसाठी सज्ज व्हायचं आहे..
डोळ्यांत आलेल्या अश्रूंना पुसत रडून मन मोकळं करण्या शिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता.. इतक्यात जोरदार वादळ वारा वाहू लागला.. पहिल्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या.. जणू त्या पावसाला तिच्या मनाचा ठाव लागला होता.. पावसाच्या सरी आणि ओघळणारे अश्रू एक झाले होते.. कोसळणाऱ्या पावसात तशीच उभी राहून समोर दिसणारा समुद्र व किनाऱ्यावरील डोलणाऱ्या माडाच्या झाडांना पाहत होती.. तिच्या मनात सकारात्मक लहरी निर्माण झाल्या होत्या.. संकटकाळी वादळात देखील माड वृक्ष कसं ऐटीत डोलते.. वादळ शांत झाल्या नंतर अगदी स्तब्ध उभे राहते.. आयुष्यभर झीज करत दुसऱ्यांना कायम फळ देते.. उन्हाच्या चटक्यात सावलीत विसावा देते.. त्यास सारे म्हणती कल्पतरू.. अगदी म्हातारं होई पर्यंत सगळ्यांच्या कामी पडतं.. ह्या कल्पतरू सारखे मला सज्ज आणि खंबीर उभं राहायला पाहिजे...
*************************************
वादळ आल्यानंतर सगळं काही सोबत वाहून घेऊन जातं.. त्यानंतर दुःखाचे सात्वन करण्या खेरीज दुसरं काहीच शिल्लक राहत नाही.. मात्र समुद्राच्या भरती नंतर ओहोटी देखील कायम निश्चिंत असते.. जीवनाचे देखील असेच असते.. दुखानंतर एक सुखाची लाट किनाऱ्याशी लागतेच.. अंध प्रेमाच्या वादळ वाटेवर चालताना धूसर धूसर एक वादळाची वाट मात्र रोहिणीच्या आयुष्यात एक शिकवणीचा पर्व देऊन गेली.. कुणावर किती आणि केवढा विश्वास ठेवायचा...
