नासा येवतीकर

Drama Romance Inspirational

3  

नासा येवतीकर

Drama Romance Inspirational

प्रेमाची नशा

प्रेमाची नशा

8 mins
299


रवींद्र एका माध्यमिक शाळेत हिंदी विषयाचा शिक्षक होता. जेमतेम तिशीच्या आतील, नुकताच नवीन नोकरीला लागलेला. दिसायला खूप सुंदर जरी नसला तरी काळा सावळा रंग, डोळे नि नाक चेहऱ्याला अनुसरून होते, नुकतीच मिसरूड फुटून दाढी येण्यास सुरुवात झाली होती. त्याचा स्वभाव देखील खूप चांगला होता, मनमिळाऊ व्यक्तिमत्व होतं, सर्वाना नेहमी हसवायचा आणि सतत काही ना काही बोलत राहायचा. शेवटी काही सूचना गेले तर चित्रपटातील गाणे गुणगुणत राहायचा. त्याला फोटोग्राफी करण्याचा देखील विलक्षण छंद होता. शाळा सुटली की गळ्यात कॅमेरा अडकवून तो तलावाच्या काठावर किंवा घनदाट जंगलात जाऊन विविध प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे फोटो काढायचा. त्याच्या मनात कोणाबद्दल असूया, द्वेष किंवा मत्सर नव्हता त्यामुळे काही दिवसांत तो शाळेतील सर्व शिक्षकांसोबत मिसळून गेला. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत बनला. वर्गावर ऑफ पिरियड असेल तर विद्यार्थी हमखास रवींद्र सरांना वर्गावर बोलावतात आणि ते देखील कोठलेही आढेवेढे न घेता वर्गावर जातात आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारतात. त्यांच्या गप्पा घर या विषयापासून सुरू होत तर देशाच्या राजकारणापर्यंत त्यांच्या गप्पा रंगत असत. विद्यार्थ्यांना रवींद्र सरांचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटत. रवींद्र सरांना अमिताभ बच्चन हा अभिनेता खूप आवडीचा होता, ते नेहमी मुलांना बच्चन साहेबांविषयी माहिती सांगायचे. सुरुवातीच्या काळात बच्चन साहेबांना किती अपयश मिळाले तरी ते हिंमत हरले नाहीत. म्हणून आज ते यशाच्या उंच शिखरावर आहेत. त्याच्या चित्रपटाच्या कहाण्या व गाणी हे सुद्धा ते मुलांना सांगत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची माहिती मिळत होती आणि त्यांना एक नवी प्रेरणा देखील मिळत होती. रवींद्र सर शाळेत आल्यापासून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. गावातील लोकं ही त्याच्यावर बेहद खुश होते.

प्रजासत्ताक दिन जवळ येत होते. या वर्षी धुमधडाक्यात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे नियोजन रवींद्र सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे ठरविण्यात आले. रवींद्र सर स्वतः पुढाकार घेऊन मराठी व हिंदी गाण्याची निवड केली, विद्यार्थ्यांना डान्सचा सराव घेतला. मुले छान पैकी सिनेमातल्या नट नटी प्रमाणे सुंदर डान्स करत होते. इयत्ता नवव्या वर्गातील प्रतिभा, ती खूप लाजाळू मुलगी होती पण तिचा डान्स खूपच सुंदर अशी माहिती रवींद्र सरांना कळल्यावर त्यांनी प्रतिभाला डान्ससाठी तयार केले. तिच्यासाठी खास करून तेजाब चित्रपटातील डिंग डाँग डिंग हे माधुरी दीक्षितचे एक दो तीन गाणे निवडून दिले. प्रतिभा जरा दिसायला माधुरी सारखी दिसत होती. त्यामुळे त्या गाण्यावरचे संपूर्ण मेकअप करून ती जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स केली तेव्हा सारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी तिची खूप स्तुती आणि कौतुक केले. सेम टू सेम डान्स करून तिने सर्वांचे मन जिंकले होते. लाजाळू असलेल्या प्रतिभाचे नाव दुसऱ्या दिवशीपासून माधुरी असे झाले होते. तिच्यामध्ये देखील आत्मविश्वास निर्माण झाला होता. रवींद्र सरांनी तोच डान्स यु ट्यूबवर अपलोड केला होता आणि एका दिवसात लाखो लोकांनी ते डान्स पाहिलं आणि लाईक देखील केलं होतं. एका रात्रीतून प्रतिभाचे डान्स सर्वदूर पसरले होते. प्रतिभा खूप गरीब घरची होती, तिचे आई बाबा शेतात मजुरी करून जीवन जगत होते. तिच्या घरी टीव्ही देखील नव्हता पण ती बाजूच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन चित्रहार बघत होती. टीव्हीवर गाणे चालू झाले की प्रतिभाचे आपोआप पाय हलू लागायचे. तिच्या मध्ये डान्स करण्याची उपजत कला होती. फक्त रवींद्र सरांनी ते ओळखलं आणि तिची कला बाहेर काढली.

प्रार्थनेच्या वेळी रवींद्र सरांनी एक आनंदाची बातमी जाहीर केली, यु ट्यूबवर प्रतिभाचा डान्स पाहून डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेतील प्रतिभाला निमंत्रण आले आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजविल्या. तिला देखील बातमी ऐकून खूप आनंद झाला मात्र तिच्या समोर आर्थिक प्रश्न होता. डान्स इंडिया डान्स हा कार्यक्रम मुंबईला होणार होता. मुंबईला येण्या-जाण्याचा खर्च आणि कोणासोबत जायचं ? याचा पेच पडला होता. तिची समस्या रवींद्र सरांनी लगेच ओळखली आणि म्हणाले, " हे बघ प्रतिभा, मुंबईला जाण्या-येण्याचा खर्च कार्यक्रमाचे प्रायोजक करणार आहेत आणि राहण्याची व्यवस्था पण त्यांनीच करणार आहेत. तुला काही त्रास होणार नाही." यावर प्रतिभा प्रश्नार्थक चेहऱ्याने तुटक वाक्य बोलते, " पण ..... सर ....." यावर रवींद्र सर तिची समस्या जाणून घेतात आणि म्हणतात, " ठीक आहे, तुझ्या आई-बाबांना काही कळत नाही, घाबरू नको, मी असतो ना सोबत" असं म्हटल्यावर तिला जरा हायसे वाटले.

प्रतिभाच्या आई-बाबांना ही बातमी समजली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू गळाले होते. लेकीसोबत मुंबई बघायला मिळणार याचा त्यांना आनंदच झाला होता. रवींद्र सरांनी प्रतिभाकडून सलग पंधरा ते वीस दिवस डान्सची चांगली प्रॅक्टिस करून घेतली. मुंबईला जाण्याचा दिवस उजाडला. प्रतिभा, तिचे आई-बाबा आणि रवींद्र सर गाडीमध्ये बसले, सर्वांनी प्रतिभाला शुभेच्छा दिल्या आणि गाडी धुरळा उडवित सुसाट वेगाने पळू लागली. प्रतिभा देखील त्याच वाऱ्याच्या वेगाने स्वप्नात गेली.

काही तासांच्या प्रवासांनंतर मुंबई आली. कार्यक्रमाचे प्रयोजकांनी त्यांचे स्वागत केले आणि मोठ्या हॉटेलात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. ते हॉटेल, तेथील परिसर हे सारं पाहून प्रतिभा आणि तिचे आई-वडील वेडे होण्याचे बाकी होते. लांब प्रवास करून आल्यामुळे खूप थाकवा आला होता. हॉटेलच्या खोलीमध्ये गेल्यावर सर्वांनी चहापाणी, जेवण करून विश्रांती केली. त्यादिवशी सायंकाळी शो होणार होता म्हणून विश्रांतीनंतर त्यांची तयारी चालू झाली.

खूप मोठा स्टेज, कितीतरी लोकं पुढं बसलेले, चार ते पाच परीक्षक देखील बसलेले, एक एक स्पर्धक येत होते आणि डान्स करून जात होते. सर्वांचे डान्स चांगलेच होत होते, लोकांच्या टाळ्या सर्वाना मिळत होते. आपले कसे होणार ? याची धाकधूक प्रतिभाच्या मनात चालू होते. रवींद्र सरांनी तिला आत्मविश्वास दिला, तिचं मन तयार केलं, तू देखील छान डान्स करशील असा संदेश दिला. शेवटी प्रतिभाचा क्रमांक आला. तेच गाणं एक ... दो .... तीन ..... तिची एन्ट्री झाली आणि तिचा चेहरा, मेकअप, ड्रेसिंग आणि डान्स बघून सारे प्रेक्षक सुरुवातीपासून जे टाळ्या वाजवत होते ते शेवटपर्यंत वाजवत होते. परीक्षकांनी आप तो दुसरी माधुरी दीक्षित है अशी comment दिली. प्रतिभा खूप आनंदी झाली. गावातील शंभर लोकांसमोर डान्स केलेली प्रतिभा आज देशातील लाखो लोकांचे मन जिंकली होती.

स्पर्धा संपली आणि निकाल नंतर कळविण्यात येणार होता म्हणून दुसऱ्या दिवशी ती आपल्या गावी परत निघून आली. असेच काही दिवस निघून गेले. ती नववी पास होऊन दहाव्या वर्गात गेली. तशी ती अभ्यासात पण हुशार होती. महत्वाचे वर्ष म्हणून ती इतर गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नव्हती. रवींद्र सरांच्या मोबाईलवर एक संदेश आला की डान्स इंडिया डान्स स्पर्धेत प्रतिभाला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांनी ही आनंदाची बातमी शाळेतील सर्वाना सांगितली. तसे प्रतिभाचे खूप कौतुक आणि अभिनंदन होऊ लागले. गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी प्रतिभा, तिचे आई-बाबा आणि रवींद्र सरांचा जाहीर सत्कार केले.

मुंबईमध्ये एका प्रसिद्ध दिगदर्शकांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर खुद्द अमिताभ बच्चन साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांना पाहून रवींद्र सरांना खूप आनंद झाला. बच्चन साहेब बोलू लागले तेव्हा सारेचजण कानात जीव आणून ऐकत होते. तसे प्रतिभा देखील ऐकत होती. तिचा डान्स पाहून बच्चन साहेब देखील आनंदी झाले आणि त्यांच्या एका चित्रपटात तिला डान्स करण्याची संधी देण्याचे जाहीर केलं. त्याच व्यासपीठावर तिला बच्चन साहेबासोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एका गाण्याने गावातील प्रतिभा मुंबई शहरातील डान्स क्वीन प्रतिभा म्हणून प्रसिद्धीस आली.

दहावीची परीक्षा देऊन प्रतिभा आणि तिचे आई-बाबा मुंबईला येऊन राहू लागले. प्रतिभाला अनेक स्टेज शो आणि चित्रपटातील गाण्याचे ऑफर मिळू लागले. प्रत्येक वेळी ती रवींद्र सरांना फोन करून विचारायची आणि पुढे जायची. त्यांचा संवाद रोज होत होता. प्रतिभा आता खूप मोठी कलाकार झाली होती. तरी ती आपल्या सरांना कधीच विसरत नव्हती. तिची प्रसिद्धी पाहून रवींद्र सर ही खुश होत होते. तिचा चेहरा आता रवींद्र सरांना आकर्षित करू लागला होता. ती मनातून आवडू लागली होती. कधी करमत नसेल तर मोबाईलवर तो तिचा डान्स पाहायचा आणि हरखून जायचा. एके दिवशी मन घट्ट करून रवींद्र सरांनी प्रतिभाला आपली " मन की बात " सांगून मोकळा झाला. प्रतिभा आता साधी प्रतिभा राहिली नव्हती तिच्या मागेपुढे अनेक श्रीमंत घराण्यातील तरुण पोरं शेपटी हलवत बसले होते. कुठे ही श्रीमंतांची पोरं आणि कुठं रवींद्र सर, तसेही दोघांमध्ये दहा ते बारा वर्षाचे अंतर ही होते. काय करावे ? तिला कळत नव्हते. पण रवींद्र सरांमुळे आज आपण या ठिकाणी आहोत हे विसरून चालणार नाही म्हणून तिने लग्नासाठी होकार देते.

प्रतिभा आणि रवींद्र सरांचे थाटामाटात लग्न पार पडते. सिनेसृष्टीतील अनेक मोठमोठी मंडळी लग्नाला हजेरी लावली होती. लग्न सोहळा पाहून गावाकडील सर्व मंडळी हरखून जातात. वर्गातील मित्र-मैत्रिणी दोघांनाही शुभेच्छा देतात. त्यांचा वैवाहिक जीवन काळ सुरू होतो. रवींद्र सर प्रतिभाचे पी ए म्हणून काम पाहत राहतात. कोणती ऑफर घ्यायची कोणती घ्यायची नाही याबाबत निर्णय घेऊ लागले. प्रतिभाला आता रवींद्र सरांचे बोलणे जरा कडक वाटू लागले. काही ऑफर तिला आवडू लागले होते मात्र रवींद्र सर नकार देऊ लागले. यात त्यांची धुसफूस वाढू लागली. दोघांत वाद होऊ लागले. रवींद्र सर हळूहळू एकटा पडू लागला. म्हणून त्यांनी दारूला जवळ केलं. प्रतिभा दिवसरात्र स्टेज शो मध्ये बिझी राहायची आणि रवींद्र सर दारू पिऊन टूल्ल राहू लागला. दारूच्या नशेत प्रतिभाला संशयी नजरेने पाहू लागला. काही बाही बोलू लागला. एकदा तर खूप मोठा तमाशा केला. रात्री दहाची वेळ होती, प्रतिभाची एका गाण्यावर शूटिंग चालू होती. त्याठिकाणी रवींद्र सर फुल्ल दारू पिऊन आला आणि कोणाला काही ही बोलू लागला. प्रतिभाला देखील दोनचार अपशब्द बोलला. प्रतिभाचे काही चाहते होते त्यांनी हे ऐकून रवींद्र सरांना चांगलाच मार दिला आणि दूर रस्त्यावर सोडून आले. यादरम्यान प्रतिभा काही करू शकली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभा आणि रवींद्र सर बोलून घेतले आणि एकमेकांपासून दूर राहण्याचे ठरविले. त्यासाठी प्रतिभाने रवींद्र सरला काही रुपये देण्याचे कबुल केले. दोघे मुंबईत राहून दूर दूर राहू लागले. प्रतिभा आता मनाची राणी झाली होती. सर्व निर्णय ती एकटीच घेत होती. जे ऑफर रवींद्र सरांनी नकार दिले होते ते ऑफर पुन्हा मिळाले. प्रतिभाने कसलाही विचार न करता ते ऑफर स्वीकारली. त्या दिग्दर्शकाने प्रतिभाच्या प्रसिद्धीचा नुसता फायदा उचलला नाही तर प्रतिभाला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. ती खूप प्रसिद्ध झाली पण ती एकटीच होती. सोबतीला कोणीच नव्हते. एकटेपणा घालविण्यासाठी ती नशा करू लागली. याच नशेचा फायदा तिच्या आजूबाजूला राहणाऱ्या अनेकांनी उचलला. तिला तशी नशा करण्याची सवय लावली. तिला नशेची चटक लागली होती. रवींद्र सर मुंबईत एकटा वेड्यासारखा फिरत होता. अचानक एके दिवशी मुंबईमध्ये चौकातील एका बॅनरकडे लक्ष गेलं. "भावपूर्ण श्रद्धांजली" असं लिहिलेलं होतं आणि फोटो होता प्रतिभाचा. तिथेच एका स्टॉलवर त्याने पेपर घेतला आणि बातमी शोधू लागला. पहिल्याच पानावर बातमी झळकली होती, नशेच्या इंजेक्शनमुळे डान्सर प्रतिभाचा दुर्दैवी मृत्यू. बातमी वाचून रवींद्र सर खूप दुःखी झाले. मी माझ्या हातून एका कलाकाराला मारून टाकले आहे. मी तिच्या सोबत राहिलो असतो तर ती हे पाऊल कधीच उचलली नसती असे म्हणत तो तेथेच रडू लागला. रडता रडता रवींद्र सर तसाच जमिनीवर कोसळला. काही क्षणात सरांचा देखील श्वास बंद झाला. प्रतिभा आणि रवींद्र सर यांचे प्रेम अतुलनीय असे होते मात्र दोघांनाही ते आयुष्यभर कळाले नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama