प्रेम पत्र
प्रेम पत्र


।।एक पत्र माझ्या मनातलं।।
प्रिय सखीस,
प्रेमाचा म्हणू की, स्नेहाचा म्हणू नमस्कार म्हणू की, नुसताच गालात हसू. कारण असे झालं की, प्रेमाचा म्हटलं आणि स्नेहाचाही म्हटलं तरी तुला राग येणारच आहे. या दोन्ही तुझ्या सख्या आहेत, आणि तुझ्या त्या सख्यांना मी, पमराने प्रेमानं प्रिय सखे, आणि स्नेहा म्हणावं, म्हणजे तुझ्या माझ्या प्रेमात दुरावा ओढवून घेण्यासारखं आहे. म्हणून मी, तुला नमस्कारच म्हणतो. आता हा नमस्कार कसला असलं काही विचारू नको हो? हा नमस्कार तुझ्या माझ्या मनात गुंतत आणि गुंफत गेलेल्या आणि चाललेल्या आदरयुक्त भावनांचा ओलावा आहे. तसा तू दिलेल्या आणि केलेल्या साथीचा हृदयाच्या कप्प्यात साठलेला प्रेमाचा कस्तुरी सुगधं आहे. तो असाच दरवळत राहो. ही मनातली खरी भावना आहे. आता म्हणशील यासाठी हे पत्राचं नाटक कशाला. ते जाऊ दे. बायको खरं सांगू का? तूच माझी खरी प्रेरणा आहे. अशी माझ्या मनाची मनोमन धारणा आहे. आणि आज जरा थोडं विशेष आणि खास आहे. तसा आज महिला दिन विशेष आहे.
बायको, एक सांगू लग्ना अगोदर मी, तुला एकदाच पाहिले. ते ही तुझ्या घराच्या बाहेरील अंगणात लिंबाच्या पराजवळ, मी आणि मामा बसलो होतो. आणि तू पुढ्यात चहाचा कप घेऊन थरथरत्या हाताने आलीस, आणि त्या थर थरणाऱ्या हातातील चहाच्या कपाकडे पहात सहज खालच्या नजरेनं तुझा मुख चंद्रमा पाहिला आणि मनात मनात काळजाच्या कप्यात कामेऱ्याचे बटन दाबावे तसे क्लिक झाले. तुझा फोटो माझ्या हृदयाच्या कप्प्यात कामाचा फिट्ट झाला. पुढे लग्न झालं. आता तू म्हणशील हे सांगायचं असतं. तस नाही गं. जरा एक तर.
श्रावणात पावसाच्या जशा सरी वर सरी येतात, धरणीला ओले चिंब करू जातात. उन्हान तापलेल्या धरणीवर ऊन-पावसाचा लपून डाव सुरु होतो. पावसाच्या रुपानं आकाश आणि धरणीचं मिलन होत. माळरानं, शेतं फुलून येतात. पिला-पाखरांच्या घरात किलबिल सुरु होते. निसर्ग हिरवागार होतो. जसं की, हिरवीगार शाल पांघरून तू जवळ आली असं भासतं. मनाचा मोर मनात थुई थुई नाचू लागतो. आणि निसर्गाच्या बरोबर आपलंही घरात सोनूल्यांचं आगमन झालं. त्यांच्या येण्याने आपली संसार वेल फुलतं गेली. सध्या सध्या वाटणाऱ्या लहान-मोठ्या गोष्टीत तू रमत गेलीस. माझ्या फाटलेल्या संसाराला ठिगळ लावता लावता तू पार थकून गेलीस, लहान-थोराचा आदर करत राहिलास. म्हणून आज तू माझ्या मनात सतत फुलतं कळी सारखी फुलतं राहिलास. खरं सांगू का बायको हे सारं तुझ्या जवळ बसून बोलायलाच असतं असं अनेक वेळा वाटतं, पण माझ्या पुरुषी अहंकार म्हण, नाही तर लोक लज्ज म्हण बोलायचं राहून गेलं. तू आमच्यासाठी किती राबतेस हे माहित असूनही कधी बोलू शकलो नाही. बायको तू रोजच्या रोज अगदी आमच्या अगोदर उठते, घराच्या सफाईपासून ते पाणी भरणे, कपडे-धुनी भांडी धुणे, जेवण तयार करून ते वाढणे, आणि पुन्हा झालेला पसारा आवरणे. मुलांना शाळेत ने-आण करणे, थकलेल्या आई-बाबाना हवं नको ते पाहून, दळण, बाजारहाट, लाईट बिल, पै पाहुणे यांचं सारं तर, तू करतेस आणि नाव मात्र माझं मोठं होत. आम्ही पुरुष किती स्वार्थी असतो. यातलं साधं स्वतःच्या अंघोळीचं पाणी उतरून घेण्याची तसदी मी कधी घेत नाही खरं तर हे सांगायची लाज वाटते. आम्ही पुरुष असं का वागतो. हे सारं असं का
व्हावं बरं. बराच विचार केला आणि आठवलं. यालाही खरं तर तूच जबाबदर आहेस. लहानपणी आई म्हणायची काय करतोस ते जेवणाचं ताट नको उचलू. का म्हणून विचारलं तर आई म्हणायची या रे ही बायकांची काम असतं, तू कशाला करतोस, आणि आता तू म्हणतेस भाजी काय निवडत बसलात. आई-बाबा काय म्हणतील. या बायकांच्या आणि पुरुषाच्या कामाच्या वाटण्यानी माझं डोकं भानून गेलीय. तुम्हा बायकांना या घरच्या मंडळींनी मोलकरीण बनवलं आणि दुनियाभरची काम तुमच्याकडून करून घेतात असं तुम्हाला वाटत नाही का? हेच लोक रोज देवीची पूजा करतात. तिला आदिशक्ती म्हणतात. फक्त म्हणतात पण तसं स्वतः वागतात का? त्या तुम्ही बायकाही अधिक खत पाणी घालता.
खरं तर मला वाटतं तुम्ही बायकांनी मुलाला आणि मुलीला सारखीच काम सांगितली पाहिजेत, म्हणजे खरं कष्ट काय असतात आणि पडतात ते आम्हा पुरुष जातील कळेल. बायको काय झालं, पत्र जरा लांबला ना, पण एक सांगतो, आता सावित्रीच्या कृपेने तुमचं शिक्षण होऊ लागलं. मग नवरा नोकरिवाला हवा. म्हणजे मग दोघेही नवरा आणि बायको नोकरी करतात. असं चित्र दिसतं गोष्ट तशी चांगली पण, जर दोघही एकाच वेळी घरी आल्यावर काय होत सांगू का? हे बघ. जर पाणी देण्या-घेण्याचा प्रश्न आला तर, प्रथम घरी आल्यावर पाणी आणि चहा देत. आता इथं संस्कार सुरु होतात. मग बायकोच करून देते. हे तिला सांगावं लागत नाही. याला एखादे जोडपं अपवाद असेलही पण, सारासरी सगळीकडे असच असतं. हे संस्कार कोणाचे तुमचे ना. म्हणून असं होतं. असो, आज ९ मार्च म्हणजे महिला दिन आहे. लोक तुम्हाला दुबळ्या, अबला म्हणतात. समजतात, पण मी, तुम्हाला कधीच अबला आणि दुबळा समजत नाही आणि समजणार नाही. तुम्ही बायका फार सोशिक असता. नाही आहेत, म्हणून हे जग आहे. ज्या भूमीवर आपण सारे उभे आहोत ती ही माता म्हणजे एक स्त्रीच आहे. तिच्या अंगा खांद्यावर आपण सारे काय काय तमाशे करतो. ती पाहते आहे. पण तीच दुःख आपण जाणतो काय? नाही. तसं तुमचं आहे. तुमच्या कष्टाच्या कामाची मोजदाद होत नाही, ती व्हावी. तुमचाही घरीदारी मान सन्मान व्हावा. नुसते मंदिरातल्या देवता पूजनाने हे होणार नाही. म्हणून आज हा पत्र प्रपंच. बायको हसू नकोस, आणि पत्र वाच ईश बिश काही म्हणू नकोस. आणखी एक लगेच कुणा मैत्रिणीला हे पत्र दाखवू नकोस. नाही तर हसतील फिदी फिदी. तुला नाही, मला हसतील. खरं सांगू कां तुझ्या समोर हे सारं कबूल करायला मला धाडस होत नाही म्हणून हे पत्र लिहीत आहे.
तुला महिला दिनाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा!
तुझा
राज
टीप- बायको पत्रातल्या कान मात्रांच्या चुका काढत बसू नकोस. फक्त त्यातला आशय आणि भावना समजून घे. उगाच जात येता फिदी फिदी हसू नकोस. काय समजले.
सदैव अशीच हसत आणि आनंदी रहा.
तुझा
राज.....