Smita Bhoskar Chidrawar

Drama Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Drama Inspirational

प्राधान्य नोकरीला की घराला...

प्राधान्य नोकरीला की घराला...

4 mins
282


राधा आणि माधव अगदी दृष्ट लागेल अशी जोडी... नुकतेच आपल्या प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलणारे दोन जीव लग्नाच्या प्रेमळ बंधनात बांधले गेले होते.

नव्याची नवलाई संपली आणि नवीन संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.


मध्यमवर्गीय कुटुंबातील काटकसरीचा संसार राधा आणि माधवच्या कष्टाने हळूहळू आकार घेत होता. माधवचे आई-बाबा प्रेमळ आणि काटकसरी होते. सेवानिवृत्त होऊन आता ते मुलाच्या संसारात रमण्याचे स्वप्न बघत होते.


राधाला संसाराची खूप आवड होती.घरीच राहून घरातच रमावेसे तिला खूप वाटे...पण परिस्थितीमुळे तिला नोकरी करावी लागे.

संसाराचा रथ योग्य मार्गाला लागेपर्यंत मुलं नको असा माधवचा आग्रह होता.


पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते..एक दिवस घाई घाईने ऑफिसला निघालेली राधा चक्कर येऊन पडली..सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले...डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली.राधा आई होणार होती.पण माधव मात्र खुश नव्हता पण हे मूल या जगात यावं अशी देवाचीच इच्छा होती...काही विपरीत करण्याने राधाच्या जीवाला धोका होता.


हळूहळू माधवसुद्धा येणाऱ्या जीवाची वाट पाहू लागला.. राधाची काळजी घेऊ लागला.


अगदी शेवटपर्यंत नोकरी करायची हिंमत राधाने ठेवली होती ...घरच्या सगळ्यांचीच तिला मदत आणि आधारही होता.सासू-सासरे तिची अगदी मायेने काळजी करत.

पण दोन महिन्यातच राधाला बेड रेस्ट घायचा सल्ला डॉक्टरने दिला...माधव पुन्हा हताश झाला.आता कसे होणार...? या होणाऱ्या बाळाचे संगोपन नीट करू शकू का आपण? असे एक ना अनेक विचार माधवचे मन कुर्तडू लागले होते...राधाच्या ट्रीटमेंटचा खर्चही वाढत चालला होता...


दिवस पूर्ण भरले आणि एक चिमुकली परी त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद घेऊन आली...तिला पाहताच माधव आपले सगळे दुःख विसरला...


'आनंदी' खरंच त्यांच्या आयुष्यात नवीन उत्साह घेऊन आली होती.लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या आनंदीच्या पायगुणामुळे पुन्हा एकदा घरात चैतन्य आलं होतं...तिच्या बाललीलांमध्ये घर बहरत होतं...


आनंदी मोठी होऊ लागली तशी माधवने राधाला पुन्हा नोकरी करण्याची गरज दाखवली....आजी-आजोबा सोबत आनंदी अगदी छान राहत असे त्यामुळे राधाला तशी काळजी नव्हती पण तरीही तिचा पाय घरातून निघायला तयार नव्हता...माधवच्या हट्टापुढे अखेर माघार घेऊन राधा पुन्हा एकदा कामावर जाऊ लागली.


सुरुवातीचे दिवस राधा आणि आनंदी दोघींसाठी खूपच कठीण होते. आजी-आजोबासुद्धा थकत चालले होते.छोट्या आनंदीला सांभाळणे त्यांनासुद्धा अवघड जात होते पण माधवच्या आग्रहाखातर बिचारे सगळं निभावून नेत असत.


एक दिवस रात्री राधा खोलीबाहेर आली तर आई-बाबांना वेदनेने कण्हत असल्याचे तिने ऐकले...आनंदीमुळे दोघांची खूपच दमछाक होत होती.राधाला सध्या खूप काम असल्यामुळे घराकडे लक्ष देणे तितकेसे जमत नव्हते पण तरीही ती तिच्यापरीने प्रयत्न करत होती.पण आजकाल तिलाही तब्येतीच्या तक्रारी होत होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करून ती एक एक दिवस ढकलत होती....पण आई बाबांची अवस्था बघून तिचं मन हेलावून गेलं...एक निर्णय घेऊन ती खोलीत आली...माधवला उठवलं.बळेच आई-बाबांच्या खोलीत नेलं...आणि स्पष्टच सांगितलं "या पुढे मला नोकरी करणं शक्य नाही.आई-बाबा आणि आनंदीची ओढाताण मी आता नाही सहन करू शकत.मी उद्याच राजीनामा देतेय..."


माधव खूप रागावला..."असा काय मोठा तीर मारतेयेस गं तू... कितीतरी बायका नोकरी करून सगळं मॅनेज करतात ना मग तू का नाही करू शकत?उद्यापासून घरातली सगळी कामं उरकून जात जा तू म्हणजे आई-बाबांना त्रास होणार नाही...ते काही नाही आधीच तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप खर्च झालाय.सध्या नोकरी सोडणं परवडणार नाही आपल्याला...विषय संपला. तुझ्याकडून मला महिन्याला पैसे हे मिळालेच पाहिजेत..." असं स्पष्ट बजावून माधव झोपी गेला...

डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारा काही केल्या थांबत नव्हत्या...पण राधाने मनाशी एक निश्चय केला आणि ती झोपली.


दुसऱ्या दिवशी देवाचा आणि सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन ती बाहेर पडली...


जवळच्या लहान मुलांच्या शाळेत अर्जंट शिक्षिका पाहिजे अशी पाटी तिने वाचली होती.तिथे चौकशी केल्यावर त्यांनी लगेच तिचा इंटरव्ह्यू घेतला..आणि हसतमुख उत्साही अशा नवीन राधा ताईचं स्वागत केलं.राधाने लगेच घरी जाऊन आई-बाबांना ही बातमी दिली.तसा पगार कमी होता पण फक्त चारच तास जावं लागणार होतं त्यामुळे त्यांनीही आनंदाने होकार दिला आणि त्याच बरोबर माधवला हे काहीच सांगायचं नाही असं तिघांनी ठरवलं.


चारच दिवसात राधा सगळ्यांची लाडकी राधा ताई झाली.शाळेत तिने काही मुलांच्या आयांना पळणाघराबद्दल बोलताना ऐकलं आणि चौकशी केल्यावर त्यांची दुपारच्या वेळी मुलांना सांभाळायला कोणी नसल्यामुळे होणारी पंचाईत समजली.


लगेच तिने आई-बाबांशी या विषयावर बोलून घरीच काही मुलांना सांभाळण्याची तयारी दाखवली.सगळे अगदी आनंदाने तयार झाले...राधा होतीच अशी मनमिळावू आणि मुलांना तर तिचा विशेष लळा होताच.कितीही पैसे द्यायला तयार असलेल्या गरजू स्त्रिया राधाकडे मुलांना ठेवायला बिनधास्तपणे तयार झाल्या.


बघता बघता राधाचे "आनंदी घर" अगदी फुलून गेले...आता जागा कमी पडू लागली म्हणून राधाने जवळचा एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि सोबत दोन मदतनीस मुलीही कामाला ठेवल्या.आता राधाचं आयुष्य खूपच छान चाललं होतं.आनंदीसुद्धा तिच्या छोट्या मित्रांसोबत मजेत होती.आजी-आजोबा सुद्धा इतक्या नातवंडाबरोबर रमले होते. सगळ्यांचाच वेळ आता आनंदाने जाऊ लागला. मुख्य म्हणजे राधाची कमाई पहिल्यापेक्षा दुपटीने वाढली आणि आनंद तर कैकपटीने वाढला.

एक दिवस माधव अचानक लवकर घरी आला...आणि समोरचं दृश्य बघून आश्चर्यचकित झाला...आजी आजोबा आणि बाळ गोपाळांचा अगदी मेळाच भरला होता. आनंदी आणि राधाच्या चेहऱ्यावर तर खुशी अगदी ओसंडून वाहत होती.गेल्या कित्येक दिवसात त्याने असे आनंदी चेहरे बघितलेच नव्हते...


राधाने सगळा प्रकार माधवला सांगितला आणि लगेच कपाटातून पैशांचं एक थोरलं बंडल काढून माधवच्या हातात दिलं... माधवचे डोळे भरून आले...त्यांनी आई बाबा राधा आणि आपल्या आनंदीचीसुद्धा माफी मागितली...

राधाच्या घराला प्राधान्य देण्याच्या निर्णयामुळे आज त्यांच्या घरात खऱ्या अर्थाने आनंद भरून राहिला होता....!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama