Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

गोविंद ठोंबरे

Inspirational Tragedy


3  

गोविंद ठोंबरे

Inspirational Tragedy


पोरका

पोरका

2 mins 16.8K 2 mins 16.8K   उन्हाची आज खूप रखरख वाटत होती. सूर्य अगदी आग ओकत तापला होता. जणू तो खूप रागावला असावा कोणावर तरी!अंगाची अगदी लाही लाही होत होती. जमिनीच्या अंगाला भेगा पडून ती खूपच निर्जीव अवस्थेत दाह फोडत असावी अशी दिसत होती. कुठेच चितपाखरू दिसत नव्हतं. पाखरांनी कदाचीत झाडांच्या कुशीत विसावा घेतला असावा. वाऱ्याची तप्त झुळूक मधूनच यायची.जसं काही वाऱ्याचं भान गेलं आहे की काय आणि ते उगीच रानमाळावर भटकायला निघालं आहे असं जाणवत होतं! एवढ्या जालीम उन्हात भानू मामा धोतराचा कोचा खोवून झप झप पावलांनी कुठेतरी वाट फोडत निघाला होता.घामानं कुडत्याला वास सुटला होता आणि डोक्याचा मळकट गमजा भानू मामाचं डोकं आवळून गप गुमान भानू मामाच्या वाटेकडे बघत सोबत निघाला होता. कदाचित त्याला काहीतरी माहीत असावं! मामाच्या पायात पायतान होतं पण ते खूप जीर्ण झालं होतं.भानू मामाची दरिद्री बोंब मारून सांगत होतं ते! भानू मामा लगबगीनं वेग वाढवत पायात अवसान आणून पुढे चालतच होता. पुढच्या वळणावर तो वळण घेऊन अजूनच वेगाने निघाला.
    थोड्याश्या अंतरावर पोहचल्यावर भानू मामा एका आंब्याच्या झाडाकडं निघाला.झाड जवळ करत त्यानं झाडाच्या खोडाला मिठी मारली अन ओक्साबोक्सी रडायला चालू केलं. भानू मामा का रडत आहे काही समजतच नव्हतं!खोडाला पाठ देत मामा रडतच खाली बसला. आपल्या कोरड्या पडलेल्या गळ्यावर हाथ फिरवत भानू मामानं स्वतःचीच समजूत काढावी अशी भावनिक नजर दिली.डोळे मिटवून भानू मामानं खोडावर डोकं टेकवलं.अन दोन्ही हाथ गुडघ्यावर टेकवून भानू मामा मोठयाने श्वास घेऊ लागला. भानू मामाच्या डोळ्यावर झापड आल्यासारखं झालं.मामा भूतकाळानं झपाटलेल्या अवदसेच्या मागं 'आ' वासून वाऱ्यासारखा निघून गेला होता. 
    "ये वांझुट्या पायाचे..हु मागं! वर तोंड करून कुठं निघाली? वांझ बाईनं लोकाच्या लेकराचा पाळणा झुलवू बी नाय आन कधी कुणाच्या बारश्याला काय घेऊन जाऊ बी नाय! एवढं साधं कळत नाय व्हय तुला?" झेलबा अण्णाच्या बायकोनं तोंड फोडून भानू मामाच्या बायकोचा समाचार जनाबाईच्या लेकराच्या बारश्याला घेतला होता. त्या वेळेला भानू मामाची बायको तोंडाला पदर लावून लहान लेकरागत पळत घरी आली होती. तिनं भानू मामाच्या खांद्यावर साक्षात आसवांचा अभिषेक त्या दिवशी घातला होता. भानू मामा उसनं आवसान आणून नेहमीप्रमाणेच बायकोला दिलासा द्यायला गेला पण त्याचा उपयोग झाला नाही.भानू मामाच्या बायकोनं अख्खी रात्र उसनी घेऊन तिच्या पोटाचा पीळ भानू मामाला दाखवला! ती रात्र डोळ्याला भगदाड पडलेल्या पुरासारखी आसवात वाहून गेली.
    भानू मामाच्या लग्नाला नाही म्हणलं तरी अकरा वर्ष होऊन गेली असतील.तरी त्याच्या घरात वंशाचा दिवा पेटला नव्हता. लेकरासाठी वाऱ्या केल्या,नवसं केली आणि आशेच्या मायला सतरा भोकं असतात म्हणून माळकरी असून पण भानू मामानं बघणाऱ्या जाणत्याचं ऐकून बकरं आणि कोंबडं पण कापली होती. शेवटी कुठला देव दगड होऊन भानू मामाला पावलाच नाही! खऱ्या माणसाच्या जिवंत देवाला काळजावर दगड ठेवून एकदा पावायला काय बरं झालं असेल,ते त्या देवाच्या मायलाच माहीत!
    भानू मामाच्या बापानं तर लहानपणीच दगा दिला होता कुटुंबाला! कुटुंब? छे.. छे..! भानू मामा आणि त्याची माय या दोघाव्यतिरिक्त आता कुटुंबात कोणीच नव्हतं. त्याला कुटुंब तरी काय म्हणावं? पोटाची खळगी भरण्यात बधीर झालेल्या या दोन जीवाला कुटुंब काय असतं हे कधी जाणवलं पण नसेल.भानू मामा पण नवसाच्या मायला पाऊनच झाला होता. भानू मामाच्या मायनं पण गरदाडं खंदून, बराशी उकरून स्वतःचं आणि भानूचं पोट जगवलं होतं. दरिद्रीत जन्मलेल्या भानू मामाचं पुढचं आयुष्य पण दरिद्रीच निघालं याचं नवल कोणालाच वाटायला नको! 
    "आवं कारभारी!ह्या आंब्याच्या रोपाला जरा पाणी घाला की,लय जीव लावून लावलंय म्या ह्य झाड! मला माझ्या लेकरावानी हाई ह्ये ! माझ्या पोटावर तर देवानं कधी इस्तू ठेवला नाय, आन दलिंदर-वांझुट्या घरात कुणी लेकरू बी वटीत घालणार नाय! त्या बिगर ह्ये झाड आपण लेकरू म्हणून वाढवू, जपू! मोठं झाल्यावर त्याच्या आंब्याच्या आंबरसानं समद्या मंचंद्या बायांचे तोंडं बांधू.माझ्या मागं-म्होरं ह्या झाडाला जपा बघा!" चांगलं खडसावून सांगितलं होतं भानू मामाच्या बायकोनं भानू मामाला! सगळं-सगळं ध्यानी-मनी कोरून ठेवलं होतं भानू मामानं आणि तोंड वासून,अर्ध्यात संसार सोडून गेलेल्या त्याच्या बायकोच्या आठवणीत झाड पण स्वतःची केसं पांढरी होईपर्यंत सांभाळलं होतं. बायकोनं मरताना भानू मामाच्या गालावरून हात फिरवत मुका घेतलेला क्षण जिव्हारी लागणारा होता! सुरकुत्या पडलेल्या हातावरची गोंदनं मुका घेताना लाजत होती.
    "अय भानू ह्यच झाड हाई का रं? ह्यच तोडायचं हाई नं? या आवाजाबरोबर भानू मामा भानावर आला.डोळ्याची झापड उघडत मामा वारं फिरवून परत वर्तमानात अवतरला होता. "व्हय..ह्यच हाई!" एवढंच बोलून भानू मामा बाजूला सरकला. इतक्यात झाडावर जोरात कुऱ्हाडीचा घाव बसला अन भानू मामा गपकन खाली बसला! डोळे पाणावले होते मामाचे! डोक्यावरचा गमजा तोंडावर ठेऊन मामा गप गुमान पहात राहीला. एका एका घावाबरोबर झाड कोसळत गेलं अन भानू मामाचा जीव पण तीळ तीळ तुटू लागला.काळजाला आता पीळ बसला होता. भयाण स्मशान झालेल्या अंतःकरणात वादळ उठलं होतं.पोटात कळ यावी इतका गोळा आला होता.भानू मामाच्या मागं कुणाचं तरी देणं होतं अन ते गळ्यापर्यंत आलं होतं म्हणून बायकोच्या आठवणींचा घोट घ्यावा लागला भानू मामाला ! भानू मामा मयतीला आल्यासारखा बसून राहीला आणि झाडाचं खांडकं पडेपर्यंत रक्ताळलेले डोळे विस्फारून पाहत राहिला. मामा आज खरंच पोरका झाला होता.


Rate this content
Log in

More marathi story from गोविंद ठोंबरे

Similar marathi story from Inspirational