पहिली कमाई
पहिली कमाई


दिवाळीच्या सुट्टीमध्ये काय करायचे असे मी आणि माझा मित्र विचार करत होतो. सुट्टीत मोकळे बसण्यापेक्षा काही तरी केले तर तेवढेच दिवाळीचा खर्च निघेल आणि सुट्टीचा वेळे सोबत अनुभव ही येईल या उद्देशाने आम्ही दोघांनी काही तरी करायचे ठरविले. आम्ही विचार केला की याच दिवाळीच्या दिवसात कोणते काम करता येईल याचा तीन चार दिवस विचार केला आणि आम्हला लक्ष्यात आले की याच काळात सगळे लोक रांगोळी घालतात आणि याची विक्री खूप होते. याचा आधार घेत आम्ही दोघांनी इ ८ च्या दिवाळी सुट्टी मध्ये होलसेल भावात रांगोळी आणायची ठरविली. प्लॅन तर झाला पण हीच रांगोळी आणायची कशी कारण आमच्या कडे पैसेच न्हवते. आमच्या समोर हा आभाळ एवढा मोठा प्रश्न पडला. अजून दोन दिवस याच गोष्टीवर विचार केला दोघांनी आपल्या घरी पैश्याची मागणी केली पण काही म्हणावा तसा रिस्पॉन्स भेटला नाही.
असेच आम्ही दोघे बाजारात फिरून अजून काही पर्याय भेटतो का हे पाहण्यासाठी गेलो. पूर्ण मार्केट फिरलो वेगळ्या वेगळ्या आयडिया भेटत होत्या पण पैसे नसल्या मूळे काहीच करू शकत न्हवतो. परत पुढच्या दिवशी आम्ही दोघे सायकलवर बाजारात गेलो सगळा बाजार फिरून अजून काही ऑप्शन भेटेल का बघत होतो तिथेच आम्हाला एक रांगोळीचा स्टॉल दिसला खूप रंगेबेरंगी रांगोळी मांडून ठेवली होती ती सर्व लोकांना आकर्षित करीत होती. तसेच ती आम्हालाही आकर्षित केली आणि आम्ही दोघे तिथे जाऊन बघत बसलो. तेवढ्यात तिथे त्या स्टॉलचे मालक आले आणि आम्हा दोघाना बघून विचारले की अरे काय करता आहे तुम्ही दोघे इकडे... तसे ते मालक आमच्या थोड्याफार ओळखीचे होते. त्यांनी हसतहसत आम्हाला विचारले की स्टॉलवर काम करण्यासाठी आमच्याकडे याल का माणसे कमी आहेत. हे ऐकताच आम्हाला काही समजले नाही आम्ही दोघे बघत राहिलो आणि थोड्या वेळात आम्ही त्यांना बोललो की काका आमच्याकडे एक प्लॅन आहे तो तुम्हाला सांगू का? ते बोलले हा सांगा आम्ही त्याना सांगितले की रांगोळी ही दिवाळीमध्ये सगळ्या घरांमध्ये खरेदी केली जाते आणि आम्ही विचार केला आहे की कमीत कमी आमच्या गल्लीमध्ये प्रत्येक घरी जाऊन त्यांना रांगोळी विकायची पण.
काका: बोलले पण काय??
आम्ही: आमच्या कडे रांगोळी घेण्यासाठी पैसे नाहीत.
काका: जोरात हसायला लागले. थोड्यावेळात ते बोलले हे कसे काय तुम्हला सुचले??
आम्ही: आम्ही विचार केला सुट्टीमध्ये घरी बसून काय करायचे तर निदान हे तर करू.
काका: हसून बोलले मुलांनो मी तुम्हाला मदत करतो.
आम्ही: मनातल्या मनात खुश झालो आणि पुन्हा त्यांना सांगितले आमच्या कडे पैसे नाहीत पण काम करण्याची ईच्या आहे.
काका: छान, मी मदत करेल तुम्हला.
त्या काकांनी आम्हाला क्रेडिटवर रांगोळी ५-५ किलो वजनाने बांधून दिली आणि सांगितले की ही रांगोळी विक्री झाली की तुम्ही मला पैसे आणून द्या. त्यांनी इतकेच नाही तर होलसेल भाव किती आणि तुम्ही किती रूपयाला किरकोळ विक्री करायची हे सगळे समजावून सांगितले. तसे आम्ही दोघे रांगोळी घेऊन खुश होऊन निघालो. मित्राच्या घरी जाऊन त्याचे छोटे छोटे वेगळ्या वेगळ्या रंगाचे पाकीट बनविले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पासून आम्ही दोघे गल्लीत सगळ्या घरा मध्ये जाऊन विचारायचो की रांगोळी हवी आहे का? काही लोकांकडून चांगला प्रतिसाद भेटला तर काही ठिकाणी आम्हाला बघून हसायला लागले. तर काही ठिकाणी बोलले की अशी वेळ आली तुमच्यावर तर काही ठिकाणी बोलले की तुमचे पालक असे करण्यासाठी तुम्हाला कसे प्रवृत्त करतात. आम्ही या कोणाचा विचार न करता तसेच सुरू ठेवले. पहिला दिवस काही इतका रिस्पॉन्स चांगला नाही भेटला. मग आम्ही परत दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवले हळूहळू आम्हाला कॉन्फिडन्स येऊ लागला आणि पहिला आणलेला माल आम्ही ५ दिवसात संपविला. सहाव्या दिवशी आम्ही त्या काकांकडे गेलो आणि त्यांचे पहिले आभार मानून त्यांचे पैसे दिले आणि पुढची ऑर्डर घेऊन आलो. परत पॅकेट बनवून तयार केले आणि असेच १० दिवस आम्ही मस्त मजा केली. यातून आलेले सगळे पैसे हे आम्ही त्या मित्राच्या घरी ठेवायचो. सरतेशेवटी आम्ही नफा मोजण्यासाठी बसलो आणि तेव्हा मज्जा अशी झाली की त्या मित्रांनी नफ्यातील पैसे मला न समजता स्वतःसाठी खर्च केले होते आणि मला त्याने दगा दिला.
फायनली यातून माझी कमाई म्हणजे घरी घेऊन गेलेली रांगोळी आणि मित्रापासून भेटलेला अप्रतिम अनुभव.
अशी ही माझी पहिली कमाई...