पहिला पाऊस
पहिला पाऊस
प्रत्येक ऋतूचे वेगळे महत्त्व असते पण मला पावसाळा सर्वात जास्त आवडतो. मी माझ्या आयुष्यात अनेक पावसाळी दिवस अनुभवले आहेत, मजा केली आहे पण त्या सर्वांपैकी हा पावसाळ्यातील एक दिवस माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.
पावसाळ्याला ऋतूंचा राजा म्हटले जाते. उन्हाळ्यात पडणाऱ्या भयंकर उष्णता आणि गर्मी पासून पावसाच्या शितल लहरी आपली सुटका करतात. व संपूर्ण वातावरण सुखद गारव्याने भरून देतात. भारतात पावसाळा जुलै महिन्यात सुरू होऊन सप्टेंबर पर्यंत राहतो. या दरम्यान काही भागात अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी पाऊसच येत नाही.
मला एक पावसाळी दिवस आठवतो ज्याने मला एक विलक्षण अनुभव दिला. तो सोमवार होता आणि माझ्या गणिताच्या शिक्षकांनी गणिताची परीक्षा ठेवली होती. मी परीक्षेसाठी तयार नव्हते . मला वाटत होते की, परीक्षा रद्द झाली पाहिजे. मी देवाकडे प्रार्थना केली की, ‘देवा, आज परीक्षा रद्द होऊ दे.’ जुलै महिना असूनही पाऊस पडेल असे वाटत नव्हते. सूर्य दिसत होता आणि ऊनही पडले होते. मी घाईघाईने शाळेची तयारी केली आणि वेळेवर शाळेत पोहोचले .
पहिल्या तासानंतरच अचानक काळे ढग दाटून यायला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा सुटला. ढगांचा गडगडाट सुरू झाला. आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागला. आमचा खेळाचा तास सुरू झाला. पाऊस पडत असल्याने शिक्षकांनी आम्हाला मैदानावर खेळायला सोडण्यास नकार दिला. पण मग आम्ही खूप हट्ट केल्यामुळे शेवटी त्यांनी आम्हाला पावसात खेळायला सोडले.
आम्ही वीर योद्ध्यांसारखे मैदानात उतरलो आणि अंगावर पावसाच्या सरींचा आनंद घेतला. जेव्हा पाण्याचा थेंब तुमच्या गालाला स्पर्श करतो तेव्हा हा एक विलक्षण अनुभव असतो. लहान मुलांप्रमाणे आम्हीही कागदी होड्या बनवल्या आणि पावसाच्या पाण्यात सोडल्या. आम्ही एवढ्या पावसात, चिखलात कबड्डी खेळलो. कित्येक मुलं तर घसरून पडली देखील पण तरीही पुन्हा खेळायला आली आणि आम्ही खूप मजा केली. आम्ही पावसात चिंब भिजलो होतो.
अचानक पावसाचा वेग वाढला. मोठे मोठे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. मग मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून शिक्षकांनी आम्हाला वर्गात बोलावले. आम्ही पूर्णपणे भिजलो होतो त्यामुळे तसेच आम्ही वर्गात बसलो. गणवेश ओला झाल्यामुळे थंडीही वाजू लागली. पुढचा तास गणिताचा होता. परीक्षेच्या भीतीने आणखी थंडी वाजू लागली.
तेवढ्यात गणिताचे सर वर्गात आले. त्यांनी बघितलं की आम्ही भिजलो आहोत. मग त्यांचाही मूड बदलला आणि त्यांनी परीक्षा रद्द केली. सर्व मुलं खूप आनंदी झाली. पाऊस खूप असल्याने चार तासानंतरच आमची शाळा सोडून दिली. आम्ही घरी परतलो. घरी जाताना रस्ते पाण्याने भरलेले दिसले. सगळीकडे चिखल झाला होता. वाऱ्यामुळे माझ्या मैत्रिणीची तर छत्रीच उडून गेली. मग मी तिला माझ्या छत्रीत घेतले. काही पिल्ले रस्ता ओलांडण्यासाठी धडपडत होती, आम्ही त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत केली. चपलीने पाणी उडवत मी घरी पोहोचले . त्या संपूर्ण आठवड्यात खूप मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे मला शाळेलाही एक आठवडा सुट्टी मिळाली.
केवढा किमयागार हा पहिला पाऊस ! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टवटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! पावसाळ्याचा तो पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही. असा हा किमयागार पहिला पाऊस!
