kanchan chabukswar

Drama Crime

4.0  

kanchan chabukswar

Drama Crime

फेसबुक ठकसेन...

फेसबुक ठकसेन...

4 mins
215


आधी फोन वरून काही वस्तू मागवायचा किंवा बँकेचे व्यवहार करायचे, अण्णांना काही जमतच नव्हतं. त्यांना प्रचंड भीती वाटायची, हे काय, भलतंच दाबले गेले तर, कुठे आपलावपासवर्ड लीक झाला तर, किंवा आपण काही भलतीच माहिती देऊन बसलो तर, हजार शंका.


माईंना मात्र या गोष्टीचं काही फारसं अप्रूप नव्हतं. अनुराधाने माईला व्यवस्थित शिकवलं होतं की मोबाईल कसा वापरायचा किंवा खरेदी कशी करायची ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा अजून कुठल्या ज्या व्यवस्थित चालणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून सामान कसं मागवायचं.


इतकेच काय तर, इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं, मोबाईल फोनचं बिल, अजून काही बिलं भागवायची असतील तर माई व्यवस्थितपणे आपला मोबाईल वापरत होत्या.


शेजारी राहणाऱ्या नेहाने तर माईबरोबर फेसबुक अकाउंट आणि बाकीचे अकाउंट पण तयार करून दिले होते.


सध्याच्या कुलूपबंद अवस्थेमध्ये माई आणि अण्णांना मोबाईलशिवाय दुसरा कुठला आधारच नव्हता. सुरुवातीचे दोन-तीन महिने सुरळीत चालू होतं. अनुराधादेखील दोन-तीन महिन्यांनी वडिलांना काही हवं नको बघ त्याप्रमाणे सामान मागवून देत असे. तिचं म्हणणं असं होतं की मोठाले व्यवहार माई आणि अण्णांनी अजिबातच करू नये. त्याच्यासाठी ती आणि समीर नेहमीच सज्ज असायचे.


सुरुवातीच्या काळामध्ये तर माई अण्णांची खरेदी झाल्यानंतर त्यांना काही कंपन्यांनी ऍमेझॉन फ्री मूव्ही बघण्यासाठीचं पॅकेज देऊ केलं. पण ते सिनेमे बघताना माईंच्या लक्षात आलं की ते फारच घाणेरडे क्वालिटीचे असून त्यांना त्याचाही खूप कंटाळा आला.


शेवटी माईने स्वतःला फेसबुकमध्ये गुंतवून घेतले. फेसबुकमधले काही कळप, नंतर काही निरोप, नंतर कोणी कोणी टाकलेली चित्रे बघण्यामध्ये त्यांचा खूपच सुंदर वेळ जाऊ लागला.


काही दिवसानंतर फेसबुकच्या एका कळपामध्ये काही गोष्टी विकण्यासाठी पण येऊ लागल्या. त्याची किंमत अतिशय कमी असे जसं काही एक सुंदर कप बशीचा सेट फक्त तीनशे रुपयाला किंवा सुंदर जूटची साडी फक्त नऊशे रुपयाला किंवा काही शर्ट, पॅन्ट किंवा घरातल्या शोभेच्या वस्तू असं काही फालतू फालतू सामान पण अगदी कमी किमतीमध्ये असायचं.

झालं! माईला नादच लागला.

वृद्ध असल्यामुळे त्यांना हे समजत नव्हतं की ज्या ज्या ठिकाणी ते परत परत जावून वस्तू बघत होते ते सगळं कुठे ना कुठेतरी नोंदवलं जात होतं. आणि त्याच्यानंतर त्या दोघांनाही त्या पद्धतीचे निरोप येऊ लागले. बघा तुम्ही काल हे बघत होता आता त्याची किंमत एवढी एवढी आहे घ्यायचं आहे का?

वगैरे वगैरे.


आता माई थोड्या भूलवल्यासारख्या झाल्या. आणि फेसबुकवरून एका कंपनीचं केस कापण्याचे यंत्र फक्त तीनशे रुपयाला मिळत होतं त्याची ऑर्डर दिली. कारण का सध्या अण्णांचे केस पण माईलाच कापावे लागत होते. त्याच्यानंतर सुंदर कपबशा सेट दिसला त्याच्याबरोबर एक फारच गोड आकाराची चहाची किटली देखील होती तीदेखील फक्त साडेतीनशे रुपयाची होती आणि लगेच आपलं कार्ड काढलं आणि दोन्ही गोष्टींचं पेमेंट देऊन टाकला.

हे सगळं अण्णापासून लपवून लपवून चाललं होतं. तरी बरं अनुराधाने आईच्या कार्डामध्ये फक्त पाच हजार ठेवले होते. तिने बजावून सांगितले होते की तुम्हाला जास्त रकमेचं काहीही घ्यायचं असेल तर अनुराधा त्याचं पेमेंट करेल. पण माईला फारच खुमखुमी चढली होती. सातशे रुपये तर होते, म्हणून एक केस कापायचे यंत्र आणि एक चहाच्या कपबशी आणि किटली सेट, दोघांचंही पेमेंट डेबिट कार्डवरून पटापट करून टाकलं.


एक आठवड्यानंतर एक छोटसं पार्सल आलं. उघडून बघितलं तर लहान मुलींच्या खेळण्यातला सेट असतो तसा अगदी छोट्या छोट्या कपबशा आणि चहाची छोटीशी किटली पार्सलमध्ये आली होती.

झालं की नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. असला फालतू सेट तुळशी बागेमध्ये पन्नास रुपयाला पण मिळाला असता. बरं परत करायची चोरी. कुठली कंपनी, कुठलं काय-काय पाठवलंय कशाची काहीही गॅरंटी नव्हती.


माई गप्पच बसली. तिला वाटलं ठीक आहे निदान केस कापायचे तरी मशीन व्यवस्थित येईल.

अजून एका आठवड्याने एक छोटे पार्सल माईला आले. घाईघाईने उघडून बघितले तर त्याच्यामध्ये फक्त एक कात्री आणि कंगवा होता. आणि एक बरोबर प्लास्टिक मशीन होतं जे खेळण्यातलंसारखं दिसत होतं.

एक छोटी कात्री आणि एक दहा रुपयाचा कंगवा चारशे रुपयेला पडला होता.


आता मात्र माई संतापली, तिला अतिशय मनस्ताप झाला, संताप- संताप झाला. दिवसा ढवळ्या फसवणूक?

शेवटी तिने अनुराधाला सांगितले.

अनुराधा गालातल्या गालात हसली आणि म्हणाली,"माई असलं काही घ्यायचं नसतं बरं. त्याची किंमत तेवढी कमी आहे त्या गोष्टीची क्वालिटी पण तेवढीच घाणेरडी असते." आणि आता आपल्याला हे सामान परत नाही करता येणार नाही कारण तू घेतलं की कंपनी लगेचच त्या दिवशी फेसबुकवरून नाहीशी झाली. अशा वेळेला नेहमी सीओडीचा पर्याय निवडायचा. सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. आपल्याला वस्तू पटली तर ठेवून घ्यायची नाहीतर पैसे न देता परत पाठवायची.


सध्या कुलूप बंदच्या काळामध्ये अशा प्रकारे फसविण्याच्या प्रकारांचा इंटरनेटवरती सुळसुळाट झालेला आहे. अगं मोत्याची नक्षीकारी दाखवतात आणि कुठलीशी नक्षीकार्य असलेले कपडे पाठवून देतात. आपण उगीचच बोलतो ना, ठीक आहे बाबा कमी किमतीमध्ये चांगली वस्तू मिळते. बरोबर, लोक भराभर पैसे देतात तीनशे रुपये, चारशे रुपये, विचार कर ना जर का 200 लोकांनी तीनशे रुपये दिले तर त्या माणसाला घरबसल्या कितीतरी हजार रुपये मिळवता येतात आणि अशा काही फालतू कंपन्यांची फारच जाहिरात चालते. असेच आजारी आहे म्हणून निदान पन्नास रुपये तरी द्या असे पण लोकं फेसबुकवरती भेटतात, सगळं काही खरं खोटं पडताळून बघण्याचा आपला दृष्टिकोनही नसतो आणि आपल्याला वेळ नसतो आणि आपल्याला वाटतं ठीक आहे बाबा 50 रुपये तर लहानशीच रक्कम, देऊन टाकावी, पण काही लोक असे हजारो लोकांकडून पन्नास पन्नास रुपये गोळा करतात आणि घरबसल्या पैसे मिळवतात. आपण पांढरपेशे लोक अशा भूलथापांना अगदी सहजपणे बळी पडतो म्हणून एक लक्षात ठेवायचं चांगल्या कंपन्या असतील तरच इंटरनेटवरून वस्तू मागवायच्या नाही तर जेव्हा दुकाने उघडतील तेव्हा आपण जाऊ आणि घेऊन येऊ."


खरं म्हणजे माईच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. झालेली फसवणूक म्हणजे जणू काही तिला अपमान वाटत होता. अण्णा शांतपणे बसून दोघींचं बोलणं ऐकत होते. माईंच्या पाठीवर हात ठेवून अण्णा म्हणाले,"अहो! तुम्ही अतिशय निगुतीने आत्तापर्यंत संसार केला आहे, कधी एका पैशाचीदेखील निष्काळजी केली नाही. जाऊ द्या, एखाद्याला असेल गरज, आपण थोडी कुठे जाऊन दान करत आहोत, असं समजा की एखाद्या गरजू माणसाला तुम्ही सातशे रुपये मदत म्हणून दिली. आता संताप करू नका, आणि आपली अनु आहे ना, तुम्हाला जेव्हा केव्हा फार इच्छा होईल ना तेव्हा अनुला सांगत जा."

अण्णांनी प्रेमाने माईचे अश्रू पुसले. माई खुदकन हसून म्हणाल्या,"बस हो अनु, छानसा चहा करते."

अण्णा म्हणाले," माई, काढा हो, नवीन टीसेट, चला आज आपण भातुकलीचा डाव मांडू."

सगळेजण मोकळेपणाने हसले आणि जसं जणूकाही कुटुंबावरती आलेलं फसवणुकीचे काळे ढग पांगले गेले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama