पौर्णिमा
पौर्णिमा


नेहमी प्रमाणेच जया त्याच्या आवडीच्या चिंचेच्या झाडाखाली अभ्यास करत बसला होता. कॉलेज वरून दुपारी घरी आल्यावर त्याचा बराचसा वेळ इथेच जायचा. त्याला ही जागा खुप आवडायची. गावापासून थोड्या अंतरावर एका शेताच्या भांदाला लागून हे भलं मोठं जुनाट चिंचेचं झाड होतं. त्या खाली एक लांबटसा दगड होता हेच जयाचं बसण्याचं ठिकाण. आजूबाजूला इतरही झाडे होतीच पण त्यातल्या त्यात या चिंचेच्या झाडाचा डौलच वेगळा.
कार्तिक महिना निघुन गेला होता. भात काढणी होऊन लोकांनी जागोजागी मळणी साठी खळी करून त्या भवती भाताची उडवी रचलेली दिसत होती. पावसाळ्यात हिरवंगार असणारं रान गवत वाळुन गेल्यामुळे पिवळसर दिसत होतं. भातखाचरात भात काढल्यानंतर नुसतीच त्याची धसकटे राहिलेली दिसत होती. त्यातूनच एखादं हिरवं भाताचं कोंब वर येत होतं. जिथे ओल होती ती खाचरे एव्हाना नांगरून हरबरा किंवा वाटाणा पेरून झालेली होती. लांबवर एखाद्या शेतात पेरणीचे काम चालू होतं त्यामुळे औत हाकणाऱ्या गड्याची किंकाळी कानावर पडत होती. सुनमाळाच्या अगदी मधुन ओढ्याकडे जाणारी वाट नजरेचा ठाव घेत होती. तिथेच मधोमध असणारं सोयरीचं झाड लाल जर्द फुलांनी भरून गेलं होतं. चिमण्यांची घरटे बनवण्यासाठी एक-एक काडी वेचून आणायची लगबग चालू होती मधेच एखादा कावळा काव काव करत उडून जात होता. आणि थोड्याच अंतरावर असलेल्या रस्त्याहुन एखाद दुसरी गाडी येत जात होती. वाळलेल्या पानांच्या ढिगाऱ्यातून सळसळ करत एखादा सरडा पुढे निघून जात होता.
या सर्वात जया मात्र चित्र काढण्यात दंग होता. अभ्यासाचा कंटाळा आला की रफ वहीत चित्र काढणे किंवा एखादी कविता लिहिणे हाच त्याचा छंद होता. जयानंद तसा खुप हुशार होता असं काही नाही. बारावीचं वर्ष असल्यामुळं तो अभ्यासाला यायचा इतकंच. हो पण अख्या कॉलेज मध्ये चित्रकलेत त्याचा हात कोणीच धरत नव्हतं. गव्हाळी रंग, डाव्या डोळ्याच्या बरोबर वरून असलेला त्याचा भांग त्याच्या गोल चेहऱ्याला शोभुन दिसायचा. शरीराने तिडतीडा असलेल्या जयाचा पोशाख मात्र साधाच होता. आणि या सर्वांमध्ये त्याच्या डोळ्यांवर असलेला सततचा चष्मा त्याची एक वेगळीच ओळख देऊन जायचा. तसं जयाचं नाव जयानंद होतं पण अख्खा गाव मात्र त्याला जयाच म्हणायचा.
चित्र काढण्यात पुर्णपणे रंगलेला असताना अचानकच जयाचं लक्ष विचलित झालं. मुख्य रस्ता सोडून सुनमाळाच्या रस्त्याला धुळीचे लोट बाजूला सारत एक मोटार येऊन थांबली. मोटारीतून दोन इसम आणि एक बाई उतरले. आपापसात काहीतरी कुजबुजत असतानाच गाडीतून एक सोळा-सतरा वर्षाची मुलगी उतरली. आणि जयाच्या भुवया उंचावल्या. सवयी प्रमाणे नाकावर आलेला चष्मा त्याने बोटाने मागे केला. देखणी आरसपाणी, गोरीपान, मध्यम बांध्याच्या त्या मुलीकडे पाहताच जयाला नेहमीचा शांत असलेला सुनमाळ आणखी शांत झाल्यासारखा भासला. तिच्या धनुष्यकृती ओठांकडे पाहुन त्याला मोहळातुन काढलेल्या मधाची आठवण झाली. ती मुलगी शांत उभी राहून समोरच्या भकासच पण प्रेमात पाडणाऱ्या निसर्गसौंदर्याला न्याहळत होती. वाऱ्याच्या झुळकीने अलगद उडणारी केसांची बट गालावरून ओठांकडे जाताना तिला त्रास देत होती. थोड्याशा तिरप्या झालेल्या उन्हात ती मुलगी सोन्यावानी चमकत होती.
"बाळा इथे गणपतरावची माणसं कुठल्या शेतात असतील रे" कानावर पडलेल्या या आवाजाने जया भानावर आला.
मांडीवरच्या वहीला बाजूला करत जया उठून उभा राहीला आणि त्यांच्या जवळ गेला. काळवटीच्या बाजूला बोट करून त्याने सांगितले " त्या तिकडं काळवटीत असतील वरच्या अंगाला पांदीने वर गेलं की मग, इकडं तर नाय दिसली" हे बोलत असताना मात्र जयाचं लक्ष त्या मुलीकडेच होतं. ठीक आहे म्हणत ती लोकं गाडीत बसून गाडी वळवून निघून गेली तरी जया गाडीकडेच पाहत होता. गाडी गावातच वळलेली त्याने पाहिलं.
आत्ता त्याचं लक्ष चित्रातही लागेना. तो चेहरा त्याच्या समोर तरळत होता. का कोणास ठाऊक पण या आधी तिला पाहिलंय असं त्याला राहुन राहुन वाटत होतं. मग त्याला आठवलं की अरे ही तर पौर्णिमा गणपतरावच्या पुण्याला असणाऱ्या चुलत भावाची मुलगी. आणि तो इसम म्हणजे त्याचा चुलत भाऊ होता. ती लोकं बरीच वर्षे झाली पुण्यातच राहतात काही वर्षांपूर्वी त्यांचं येणं-जाणं व्हायचं पण मधल्या काही वर्षात त्यांचं येणं बंद झालं होतं. पौर्णिमा पण यायची सुट्टीला अधुन-मधुन आता खुप दिवसांनी ती गावाला आली होती. मनोमन जया खुश झाला होता. आणि नकळत चित्राच्या ऐवजी त्याच्या लेखणीतून एक कविता उतरली.
भर उन्हात भकास या रानी
आली कुठूनशी ही फुलपरी..
पुनवेचा चांद शोभतो तारांगणी
अशीच भासे अप्सरा ही सुंदरी..
तिच्या गालावरची गोड खळी
मन हे घायाळ करी...
घाव हा भरतो तोच
नजर तिची पलटवार करी....
कविता मनातल्या मनात गुणगुणत जया गावात शिरला. घरी गेल्यावर हात पाय धुवून जया देवळापुढे गेला. एव्हाना शाळा सुटलेली होती सगळी पोरं घरी आली होती. जया देवळाच्या पायरीवर बसून गणपत रावच्या घराकडेच पाहत होता. तेवढ्यात तिथे आब्या आला आब्या म्हणजे जयाचा खास जिगरी होता. तसा तो जयापेक्षा वयाने खुपच लहान होता जया बारावीत तर आब्या आठवी नववीत असेल. पण तरीही शेजारी शेजारी घर असल्याने त्यांच चांगलं जमायचं. सुट्टीच्या दिवशी ओढ्यावर पोहण्यापासून रानात भटकण्या पर्यंत ही जोडगोळीच एकत्र असायची. गावातलं तिसरं कोणी त्यांच्या सोबत नसलं तरी त्यांना चालायचं. जयाच्या सगळ्या गोष्टी आब्यालाच माहीत असायच्या. मग मघाशी घडलेला प्रसंग लपणार आहे का..?
आल्या आल्या आब्या जयाला म्हणाला "मग आज काय करणार संध्याकाळी..?"
"काय नाय का रे.?" जया बोलला
"जायचं का राजा अन्नाच्या मळनीवर?"
"जाऊ की पण....." जया थोडासा अडखळत बोलला
"पण काय आता "
मग जयाने मघाशी पौर्णिमा आली वगैरे प्रसंग सांगितला आणि एवढ्या वेळ तो तिला पहाण्यासाठी थांबलाय हे सांगितलं. त्यावर आब्या मोठा आ वासून हसत सुटला आणि म्हणाला "अरे आपण गावठी पोरं ती शहरातली पोरगी जमेल कसं.?"
थोडावेळ वाट पाहूनही पौर्णिमा काही बाहेर आलेली दिसत नाही म्हंटल्यावर मग अंधार पडायच्या वेळेला दोघे खळ्याच्या दिशेने चालू लागले. थंडीचे दिवस असल्याने वातावरणात चांगलाच गारवा पसरला होता. खळ्यावर नुकतीच पात जोडली होती. भात अंथरून बैलांच्या पायाखाली तुडवले की त्यातून धान्य वेगळं होतं आणि पेंढा वेगळा होतो मग उन्हाळ दिवसाला तोच पेंढा गुरांना खायला होतो. खळ्यात गोल गोल बैलांची पात हकलत कोलांट्या उड्या मारायची मज्जाच काही वेगळी आणि फक्त हीच मज्जा घेण्यासाठी हे दोन बहाद्दर कडाक्याच्या थंडीतही मळणीला आले होते. मळणी आटोपात आल्यानंतर दोघंही घरच्या वाटेकडे रवाना झाली.
घरी जाऊन जेवण करून जया देवळाकडे गेला. पोरांनी शेकोटी करूनच ठेवली होती. रात्री थोडावेळ शेकोटी पुढे गप्पा मारल्यावर मग आपापल्या घरी जाऊन जो तो झोपत असे. काही तरुण पोरं देवळातच झोपायचे. त्यात हे आब्या आणि जया नसेल तर नवलच. शेकोटी सुद्धा तीन हिस्यांमध्ये वाटलेली असायची. वयस्क लोक, म्हातारी माणसं आणि पोरं पोरी या सगळ्यांची शेकोटी वेगवेगळी असायची. आज मात्र पोरा पोरींच्या शेकोटी मध्ये एक सदस्य वाढलेला होता ती म्हणजे पौर्णिमा. ती तिच्या चुलत बहिणीबरोबर आली होती. जया एक सारखा तिच्याकडे पाहत होता. तिचे डोळे आणि थोडयाशा विनोदावर तिचं गालातल्या गालात हसणं न्याहळत होता. हजारो ताऱ्यांमध्ये पौर्णिमेला जसा चंद्र उठून दिसतो तशीच या सगळ्या गर्दीत पौर्णिमा दिसत होती. तिने मस्त लोकरी स्वेटर घातलं होतं. तिच्या कपड्याना असलेला अत्तराचा सुवास वातावरणात दरवळत होता. आब्या काहीतरी बोलत होता. आणि गणपत रावाची आकडू सुशी त्याच्याशी उलट तंडत होती. हे भांडण त्यांचं नेहमीचंच असे.
पौर्णिमेला जया आपल्याकडे पहातोय हे कळायला वेळ लागला नाही. दुपारी आपले वडील याच मुलाशी बोलले हे ही तिने ओळखलं होतं.
"तू जया ना रे..? किती बदलला आहेस..? कसा होतास लहानपणी अजूनही तसाच आहेस का भांडखोर" अचानक पौर्णिमेच्या या शब्दांनी जयाच्या मनात धस्स झालं.
"ओळखलं की तू..? मला वाटलं विसरली असंशील" जया बोलला. आता मात्र जया नेम साधणार हे आबाला कळून चुकलं. मग काय त्यांच्या गप्पांना उधाण आलं.
इतक्यात सुशीप्रमाणेच आकडू असणाऱ्या तिच्या आईने त्यांना आवाज देत बोलावून घेतले. जया आणि आब्या पण देवळात शिरले. गप्पा अजून संपलेल्या नव्हत्या पण मळणीत वाकड्या तिकड्या उड्या मारून दमलेलेल्या दोघांच्याही डोळ्यांवर झोप आली होती. रात्र वाढत होती हवेत गारवा चढत होता आणि पेटवलेल्या शेकोट्या हळू हळू विझत होत्या. जयाच्या चेहऱ्यासमोर पौर्णिमेचा चंद्र घिरट्या घालत होता. तिचा तो घोगरा आवाज त्याच्या कानावर अजूनही धडका देत होता.
सकाळ झाल्यावर रोजच्या नियमानुसार जया कॉलेजला गेला. कॉलेज संपेपर्यंत तो पौर्णिमेच्या विचारातच गुंग होता. सुटल्यावर तो घाईने घरी आला पण त्याला काही पौर्णिमा दिसली नाही. त्यांची मोटरही तिथे नव्हती. त्याला वाटलं ती निघून गेली असेल, थोडासा नाराज होत तो जेऊन अभ्यासाची पुस्तके आणि कवितेची वही घेऊन रोजच्या ठिकाणी जाऊन बसला. आज त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. आब्याशी बोलून मन हलकं करावं तर तोही शाळेत गेलेला. एखाद्या परीच्या कथेतील परी यावी काही तरी जादू करून निघूनही जावी असंच काहीसं त्याच्या मनात चाललं होतं. विचारांच्या धुंदीत असतानाच जयाचे डोळे चमकले कारण समोरून पौर्णिमा त्याच्या रोखाने येताना त्याला दिसली. तिच्या त्या नाजूक पायांना तशा ढेकळातुन चालायची सवय नव्हती त्यात तिच्या उंच टाच असलेल्या चपला त्यावरून सरकत होत्या. उन्हात चालत आल्याने तिचा नेहमीचा गौर वर्ण लालसर दिसत होता. आणि कपाळाहुन खाली गालावर आलेला घामाचा बिंदू त्या उन्हात चमकत होता. ती जवळ येताच जया थोडंस आश्चर्याने बोलला
" तू..? तू इथे कशी..?"
"आले अशीच फिरत फिरत"
"पण अशी एकटीच कशी काय?"
"अरे सुशीला शाळेत गेलीय आणि मला कंटाळा आला होता म्हणून मग आले इकडे आणि तसंही मला वाटलं कदाचित तू इथे असशील म्हणून." थोडीशी मिश्कीलपणे पौर्णिमा बोलली
"मला वाटलं गेली असशील पुण्याला पण तू तर आहेस अजून इथेच" मनातून खुश होत जया बोलला
"निघायचं आहे थोड्या वेळात. काका आणि पप्पा बोलत आहेत ते जमिनी बद्दल काहीतरी म्हणूनच तर आलेलो"
नुसताच हुंकार देत जया खाली बघत पुस्तकाची पाने पलटत होता.
"लहानपणी किती मज्जा यायची ना रे खुप धमाल करायचो नाही का..? आता बदलल असेल सगळं..?"
"नाही सगळं अगदी आहे तसेच आहे फक्त आपण मोठे होत चाललोय"
थोडा वेळ शांततेत गेला मग वर झाडाच्या शेंड्याकडे पाहत पौर्णिमा म्हणाली
"ये मला चिंचा काढून दे ना"
"अगं कच्च्या आहेत त्या अजून..! आजारी पडशील"
"ये दे रे काही नाही होत"
मग काय डोळ्याचं पात लवतं न लवतं तोच जया वर झाडावर चढून चिंचा तोडू लागला. झाडावर चढण्याची कला गावाकडच्या मुलांना शिकवायला लागत नाही आणि त्यांना कोणी शिकवतही नाही. खाली पौर्णिमा त्याची ती रफ वही चाळू लागली. वरून जया हे सर्व पहात होता. एखादया कलाकाराला त्याच्या कलेला मिळालेली दाद ही खुप महत्वाची असते आपली चित्र इतरांनी पहावी कविता वाचाव्यात असं नेहमीच एका कलाकाराला वाटत असतं. आब्या नंतर त्याची ही वही दुसरं कोणीही चाळली नव्हती. जया खाली आल्यानंतर त्याच्याकडे हसत पौर्णिमा म्हणाली "ये मस्त लिहितोस रे कविता..! छान आहेत, आणि ही चित्र सुद्धा तूच काढली आहेस का..? तू इथे नक्की अभ्यासच करतोस ना.?"
थोडंस लाजत जया उत्तरला " नाही ग कंटाळा आला की असच काही तरी लिहितो."
वेळेचं भान आल्यावर पौर्णिमा घाईतच त्याला म्हणाली "ये चल जाते मी भेटू परत दादा आले असतील आणि हो बारावी झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी पुण्यालाच ये बरं का? हे वाक्य संपेपर्यंत पौर्णिमा बरीच पुढे निघून गेली होती. नंतर जयाच्या लक्षात आलं की त्याची कवितेची वही पौर्णिमा घेऊन चालली होती.
ती निघून चालली या विचाराने जयाच्या मनाची घालमेल झाली. तो आतून चलबिचल झाला. तो पळतच पुण्याला जाणाऱ्या गाडी रस्त्यावर जाऊन उभा राहिला. जवळपास अर्धा पाऊण तासात पौर्णिमेची मोटार तिथून निघून गेली. पौर्णिमेने जयाकडे एक कटाक्ष फेकला तेंव्हा त्याच्या मनावर असंख्य जखमा झाल्यासारखं त्याला वाटलं. त्याची ती कवितेची वही अजूनही तिच्याच हातात होती.
संध्याकाळी आब्याला जया वेगळाच दिसला. कधी नव्हे तो आज जया नाराज होता. मग नंतर ते दोघे या विषयावर खुप वेळ बोलत राहिले. वयाच्या मानाने खुप लहान असणाऱ्या आब्याने शक्य तेवढया परीने जयाला सावरलं. हळू हळू शेकोट्या विझत गेल्या रात्र वाढत होती. वातावरणात गारवा जाणवत होता. थोडे दिवस हे असंच चालू राहील काही दिवसानंतर मात्र पौर्णिमा जयाच्या आकाशासारख्या मनातून हरवत गेली. काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्री चंद्र हरवतो ना अगदी तशीच.