Jyoti gosavi

Drama

2  

Jyoti gosavi

Drama

पौराणिक माता माता पार्वती

पौराणिक माता माता पार्वती

5 mins
52


मी दाक्षायणी दक्षाची मुलगी, त्या जन्मात शंकराशी विवाह केला खरा! पण माझ्या पित्याने माझ्या पतीचा अपमान केल्यामुळे मी यज्ञकुंडात उडी घेतली आणि स्वतःला संपवले. 

पुढे माझ्या पतीने माझे कलेवर हातात घेऊन तांडव नृत्य करण्यास सुरुवात केली. अगदी अखिल ब्रम्हांड डळमळले, शेवटी श्री विष्णू नी सुदर्शनाने माझ्या देहाचे 151 तुकडे करून पतीच्या हातातून माझा देह काढून घेतला. त्यानंतर माझ्या पतीला म्हणजे शंकरांना वैराग्य आलं विरक्ती आली.

एकदा शंकरांचे ओजस्वी वीर्य धरणीवर पडले ,तेव्हा मी तिला शाप दिला तू माझ्या नवऱ्याची अभिलाषा धरली त्यामुळे तुला अनेक पती होतील.

 त्यावर धरणी माता मला म्हणाली, 

"मी तुझ्या पतीची अभिलाषा धरलेली नव्हती, पण तू मला शाप दिलास तर मीही तुला शाप देते की तुला पतीपासून मूल होणार नाही"

त्यामुळे माता बनण्याचं माझं स्वप्न खरं तर भंग पावलं होतं .पण ज्यावेळी तारकासुर माजला आणि त्याने सर्व देवांचा पराभव केला, तेव्हा मात्र शंकर-पार्वतीच्या पोटी जन्म घेणारा पुत्र या तारका सुराचा वध करेल अशी भविष्यवाणी होती.

पण पुत्र होणार कसा माझे पती सदैव समाधिस्त आणि स्मशान वैराग्य असणारे.

 त्याच्यासाठी आम्हाला एकांत मिळायला हवा, आणि पतीच्या मनात काम जागायला हवा. 

शेवटी सर्वांनी मदनाला पुढे केले.

 शंकरांना समाधीतून जागे करण्याचे काम कोणाला तरी करायचे होते. वसंताने वन शृंगारले, मी देखील अगदी साज शृंगार करून पतीच्या संन्निध उभी राहिले, माझ्या पतीच्या मनात काम भावना जागृत झाली, अर्थात ती मदनाने केली पण त्यामुळे त्याला बिचाऱ्याला भस्म व्हावे लागले. आनंग व्हावे लागले.


त्याचवेळी माझे पती शंकर आणि मी एकांती असताना ,अग्नी भिक्षा मागण्यासाठी आला .

तो शिवाच्या तिसऱ्या नेत्रात राहतो, शिवाचा मित्र आहे, शिव त्याला काही करणार नाही या हेतूने देवांनी त्याला आत मध्ये पाठवला.

 त्याने मोठ्या आवाजाने हाक फोडून भिक्षा मागितली.

 तर स्वामी मला म्हणाले माझे ओजस्वी वीर्य तू त्याला भिक्षेमध्ये घाल.

 , त्यांच्या आज्ञेनुसार मी केले ,कारण माझ्या पोटी पुत्र प्रसवणार नाही हे मला पण ठाऊक होते, त्याचे थेंब जिथे सांडले तेथे रेत कुप झाले म्हणजेच पाऱ्याचे कण निर्माण झाले, जो पारा हातामध्ये येत नाही. 

मग त्यापासून अग्नी गरोदर राहिला त्याला लाज वाटू लागली .

आता काय करायचे? असा त्याला प्रश्न पडला. 

 तोच सहा कृतिका गंगेमध्ये स्नान करून अग्नीभोवती शेकत बसल्या होत्या, अग्नीने आपला गर्भ त्या साहिजणींच्या पोटात घातला.

 त्यांना देखील लाज वाटू लागली की, आपण अचानकच कसे काय गरोदर झालो?

मग त्या ऋषी पत्न्यांनी देखील त्या गर्भाचा त्याग केला, आणि बाहेर सहा डोक्याचे आणि बारा हाताचे बाळ तयार झाले.

 आता त्या ऋषी पत्न्या सोडून गेल्या आणि ते बाळ टाहो फोडू लागले, पण ते माझेच बाळ असल्यामुळे मी त्याला माझ्या स्तनाला लावले ,दूध पाजले, लाड केले नाहू माखु घातले. आणि त्या पराक्रमी बाळाने तारकासुराचा वध केला, 

पण त्याच्या लग्नाची गोष्ट मी त्याच्याजवळ काढली तर मला म्हणाला

आई लग्न म्हणजे काय ग? 

अरे बाळा तुला बायको करून आणायची

 बायको म्हणजे कोण?

 स्त्री 

आई स्त्री कशी असते मी पाहिली नाही.

अरे बाळा स्त्री माझ्यासारखी असते?

 

मग जगातल्या सगळ्या स्त्रिया मला मातेसमान आहेत

असे म्हणून मला शब्दात फसवून माझा बाळ दक्षिणेला निघून गेला.

 वर मी त्याच्या मागे जाऊ नये म्हणून ,.

"ज्या कोणी स्त्रिया माझ्या दर्शनाला येतील त्या सातजन्म विधवा होतील असा शाप ही दिला"

आणि मला कायमचा दुःखी करून निघून गेला .

एक तर पती कायम समाधिस्त अवस्थेत ,नाही तर स्मशान वैराग्यात, कार्तिकेय छोटा असताना त्याला खेळण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून मी अजून एक पुत्र निर्माण केला.

 एक दिवस विरंगुळा म्हणून , मी माझ्या अंगाच्या मळी पासून एक पुतळा तयार केला.

अंगची मळी म्हणजे काही मी एवढे वर्ष आंघोळ केली नव्हती की माझ्या अंगातून एवढा मळ तयार होईल?

 असे नाही.

 तर अंगाला लावलेली उटी, हळद, चिकण माती आणि लोणी, यापासून मी एक पुतळा तयार केला. त्याच्यामध्ये प्राण फुंकला ,आणि माझे एक सुंदर बाळ निर्माण झाले. मला पोटचा पुत्र असणार नाही हा शापच होता ना!

 त्यामुळे मी अशा रीतीने एक बाळ तयार केले.

मी आंघोळीला गेले आणि दरवाजा वरती माझ्या बाळाला राखण करण्यास सांगितले .

तेवढ्यात स्वामी आले आणि सदनात शिरू लागले. माझ्या पुत्राने त्यांना अडवले, शिवाने काही त्याला ओळखले नाही आणि माझं एवढूस बाळ ते, पण त्या अखिल ब्रम्हांडाच्या बापाशी ,म्हणजेच आपल्याच बापाशी त्याने प्राणपणाने लढाई केली. त्यात माझं एवढुसं बाळ हरलं हरणारच होतं त्याला कुठे माहित शंकरांचा महापराक्रम, 

शंकराने रागाने त्याचा शिरच्छेद केला. आणि बाहेरचा कालवा गडबड ऐकून मी बाहेर आले ,

पहा ते तर शीर नसणारे माझं बाळ लढाईच्या पवित्रात उभं होतं.

मला तर अगदी भोवळ आली सगळं ब्रह्मांड आठवलं आणि पुत्र प्रेमाने मी टाहो फोडला. 

स्वामी हे काय केलंत?

 एक तर मला एवढ्या मोठ्या हिमालयावर एकाकी वाटतं ,एकटं वाटतं होतं.

माझ्या विरंगुळ्यासाठी मी एक पुत्र निर्माण केला होता, स्वामी तुम्ही त्याला पण मारलं?

 त्याचा पण शिरच्छेद केला?

 मला काही माहीत नाही माझं बाळ मला जिवंत करून द्या.

या माझ्या टाहो फोडण्याने स्वामींना पण फार वाईट वाटलं,

पार्वती मला माहित नव्हतं की हे तुझं बाळ आहे.

 स्वामी माझ्या एकटीच नाही आपलं बाळ होतं ते !

हो !माझ्या हातून चुकून त्याचा शिरच्छेद झाला पण त्याला मी जिवंत करतो.

मग स्वामींनी गणांना आज्ञा केली. पृथ्वीवर चारी दिशांना जा आणि जिकडे माता आपल्या बाळाकडे पाठ करून झोपलेली आहे त्या बाळाचे शिरच्छेदून इकडे घेऊन या अखेर एक हत्ती आपल्या पिल्ला कडे पाठ करून झोपली होती. त्याचं शिर आणून माझ्या गजाननाला लावलं. 

सुरुवातीला मला ते आवडलंच नाही. काय हे‌ स्वामी! अहो येवडूश्या बाळाला एवढं मोठं शीर झेपणार आहे का?

अगं पार्वती तो आपला पुत्र आहे .

तो जगाचा अधिपती होईल, गणाधीश होईल ,सर्वांचा आवडता आणि लाडका होईल.

 दरवर्षी तो पृथ्वीतला वरती आपल्या भक्तांच्या भेटीला जाईल,

अहो त्याला सगळं काही झेपेल!

 का नाही झेपणार? प्रत्येक पूजेच्या आधी प्रारंभी त्याचं नाव घ्यावंच लागेल.

 बघ त्याचं हे रूप पण किती गोंडस दिसत आहे.

मग त्या छोट्या गणुल्याने मोठ्या प्रेमाने आपली सोंड हलवली ,आणि माझ्या पाठीवर फिरवली, त्याचा तो मुलायम स्पर्श मला गुदगुल्या करून गेला ,आणि खूप छान वाटले त्या माझ्या बाळाला मी जवळ घेतले.,

 

माझ्या गणूच्या बुद्धिमत्तेचा एक प्रसंग सांगते

एकदा माझ्या दोन बाळांमध्ये आम्ही गंमत म्हणून स्पर्धा लावली, सगळ्यात आधी जो पृथ्वीप्रदक्षिणा करून येईल त्याला श्रेष्ठ म्हणून मान मिळेल.

षडानन माझा हुशार! लगेच मोरावर स्वार झाला आणि पृथ्वीप्रदक्षिणेला निघून गेला.

 मला काळजी गणेशाची कारण एक तर त्याचं वाहन उंदीर, शिवाय एवढं मोठं पोट ,आणि सोंड त्या उंदीर मामाला पण झेपले पाहिजे ना!

 आता षडानन जिंकणार हे सर्वांना माहीत होतं ,कारण तो प्रदक्षिणेला निघून गेला सुद्धा! तरी गजानन अजून इथेच लुडबुड करीत होता. आता हा उंदरावर बसणार कधी आणि अख्ख्या पृथ्वीची प्रदक्षिणा करणार कधी ?

माझं बाळ हरणार याचं मला वाईट वाटत होतं. आईला सगळी मुलं सारखीच असतात, एक पृथ्वी प्रदक्षिणेला गेला याचा आनंद होता. पण दुसरा हरणार याचं वाईटही वाटत होतं. 

गणेशाने काय केले आम्हा दोघांना उभे केले आणि आमच्या भोवती तीन प्रदक्षिणा मारल्या.

 म्हणाला तुम्हीच माझे जग आहात! माता पिता यांच्यामध्ये साऱ्या पृथ्वीचा सौख्य आहे. झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण !एकच काय तीन झाल्या.

 माझ्या बाळाने बुद्धीचातुर्याने षडाननाला हरविले, आणि तो श्रेष्ठ झाला म्हणून अग्र पूजेचा मान त्याला दिला जातो.

असं माझं ते गणुल बाळ तुमच्या भेटीला पाठवत आहे .

 अहो तो ऐकतच नाही दहा दिवस त्याला खाली पृथ्वीवर तुमच्या भेटीला यायचंच असतं. म्हणजे आजोळी मामाकडे त्याला जायचं असतं तुम्ही कसे दहा दिवस सुट्टीला मामाकडे जात होता तसाच तो पण येतो.असाही तो कायम तुमच्याकडेच असतो म्हणा!

काळजी घ्या त्याची, त्याला मोदक लाडू फार आवडतात म्हणून मी नेहमी तयार करून देते.

 त्याच्यासाठी ठेवतेच तयार करून. अहो त्याला ना फार फार भूक लागते बरं !

अहो एवढी ब्रह्मांड त्याच्या पोटात मावतात भूक नाही का लागणार? एवढं मोठं पोट त्याचं,

आता दोन दिवसात माझं गणू बाळ येईलच पृथ्वीवरती .त्याची काळजी घ्या, नाहीतर त्याच्या पाठोपाठ मी येणारच आहे. 

लक्षात आहे ना?


 चला तर मग

 लागा तयारीला 

आम्ही येतो आहोत

 तुमच्या भेटीला


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama